एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे भिषण पाणी टंचाई आहे, नागरिकंची मागणी लक्षात घेता प्रशासन व ग्रामपंचायतच्या वतीने पाण्याचे टँकरही सुरू करण्यात आले, परंतू आजही अनेक भागात पाणी पोहचत नसल्यामुळ नागरिक पाण्या पासून वचित राहत आहेत. पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतच्या एका कर्मचाऱ्याला नागरिकांनी टँकर आमच्याकडे पाठवा म्हणून सांगितल्यानंतर सदरील कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे पाणी टंचाईमुळे टँकर सुरू करण्यात आले आहे, परंत सदरील टँकर अजूनही अनेक भागात पोहचत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पाणी देण्याबाबत नियोजन करण्याऐवजी अरेरावीची भाषा वापरली जात आहे.
पाणी पुरवठाही बंद !
कुंभार पिंपळगांव शहरातील काही भागात ज्या पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जातो त्या पाईपर्लानची मोटर मागील जवळपास 15 दिवसांपासून खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. एवढे दिवस उलटूनही अद्याप मोटर दुरूस्ती करून बसवण्यात आली नाही. दि.19 रोजी मोटर बसवण्यात आल्याचे ग्रामसेवक यांनी सांगितले, परंतू दि.20 रोजी मोटर जळाल्याचे समोर आले. त्यामुळे आता पुन्हा मोटर दुरूस्ती करून केव्हा सुरू केली जाणार हा एक प्रश्नच आहे. एवढे दिवस मोटर दुरूस्तीसाठी का लागले असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.
अरेरावीची भाषा !
अनेक दिवसांपासून पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामसेवक यांना याबाबत कळविण्यात आले, त्यानुसार दि.20 रोजी टँकरवर असलेल्या ग्रामपंचायतच्या एका कर्मचाऱ्याला कुरेशी मोहल्ल्यातून मागे जाणाऱ्या परिसरातील नागरिकांनी पाण्याबाबत विनंती केली असता, संबंधित कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा वापरली, शिवाय सरपंच (प्र.) यांना काय बोलायचे ते बोला, मला सांगू नका असे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरपंच (प्रतिनिधी) पाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे मात्र ग्रा.पं.कर्मचारी अशी अरेरावीची भाषा का करत आहे ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रस्त्याचे काम अर्धवट !
कुरेशी मोहल्ल्यातून एस.बी.शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आल्याचे दिसून आले. सदरील झालेल्या कामाचे इस्टीमेट जर अर्ध्या रस्त्यापर्यंतच असेल तरीही मग उर्वरित रस्त्याचे काम का करण्यात आले नाही. सदरील रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे या भागातून वाहन घेवून जातांना अडचण येत आहे आणि हेच कारण देवून पाण्याचे टँकर संबंधित भागात घेवून जाण्यास टाळाटाळ केली जात आहे. सदरील उर्वरित राहीलेला सिमेंट रस्ता लवकर होणे आवश्यक तर आहेच, मात्र सदरील रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात 4 ते 5 मुरूमच्या ट्रीप टाकल्यास रस्त्यावर सहज वाहन जावू शकते, मात्र याबाबत ग्रामपंचायतला गांभीर्य आहे का ? आणि लवकर हे काम होईल का असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे.
ग्रामसेवक गैरहजर !
कुंभार पिंपळगांव येथील नागरिकांना विचारणा केली असता, या महिन्यात फक्त एकदा ग्रामसेवक दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामसेवकांना या बाबत विचारले असता सध्या निवडणुकीच्या कामामुळे व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. परंतू अधिकारीच जागेवर नसल्यामुळे कुंभार पिंपळगांवातील पाणी टंचाई आणि इतर समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. सुविधा तर सोडाच कर्मचाऱ्याकडून अरेरावीची भाषा वापरण्यात येत असेल तर नागरिकांनी आपली समस्या मांडावी किंवा नाही असा प्रश्न त्यांना पडला आहे. ग्रामपंचायतला गावातील प्रत्येक भागाची माहिती आहे तरीही असंख्य नागरिकांपर्यंत पाणी पोहोचलेले नाही ही वस्तुस्थिती आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.