Your Alt Text

महिलांनी टॉयलेटला जायचं कुठं ? ग्रामपंचायत आठवडी बाजारातून हजारो रूपयांचा टॅक्‍स घेते, शासनाचा निधीही येतो, तरीही महिला व नागरिकांसाठी साधं सार्वजनिक शौचालय का नाही ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
वर्षानुवर्षे सर्वसामान्‍य नागरिकांकडून टॅक्‍स तर घ्‍यायचे, शासनाचाही लाखो रूपये निधी सुध्‍दा मनमर्जीप्रमाणे खर्च करायचा मात्र महिलांसह नागरिकांना मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवायचे हे योग्‍य आहे का ? असा सवाल सर्वसामान्‍य नागरिक करत आहेत.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरत असतो. जालना जिल्‍ह्यालगतच्‍या जवळपास सर्व जिल्‍ह्यातून छोटे मोठे व्‍यापारी या बाजारात येत असतात. येथे भरणारा आठवडी बाजार हा तालुक्‍यातील सर्वात मोठा बाजार असून आसपासच्‍या जवळपास 50 ते 60 गावातील नागरिक बाजारासाठी येत असतात. या बाजारात अंदाजे 40 ते 50 हजार नागरिक येत असतात.

बाजारात येणाऱ्यांमध्‍ये महिलांची संख्‍याही लक्षणीय असते, हजारो महिला, मुली व लहान मुले बाजार येत असतांना मात्र त्‍यांना टॉयलेटला जाण्‍यासाठी कोणतीही सुविधा उपलब्‍ध नाही. एवढंच नव्‍हे तर ज्‍या बाजारात बसणाऱ्या व्‍यापाऱ्यांकडून व शेतकऱ्यांकडून ग्रामपंचायत (बाजार हराशीच्‍या माध्‍यमातून) टॅक्‍स वसूल करते त्‍यांनाही टॉयलेट किंवा शौचालयाची सुविधा नाही. मग या महिला, माता-भगीनी व नागरिकांनी टॉयलेट किंवा शौचास जायचे कुठे ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सार्वजनिक शौचालय नाही !

एकीकडे ग्रामपंचायत हजारो रूपये टॅक्‍सच्‍या माध्‍यमातून बाजारातील व्‍यापारी व शेतकऱ्यांकडून घेते, शिवाय शासनाचा लाखो रूपये निधी सुध्‍दा स्‍वच्‍छतेसाठी येतो मात्र आश्‍चर्य म्‍हणजे एवढ़्या वर्षात गावात एकही सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायतला बांधता आले नाही ? मग वसूल होणारा निधी व स्‍वच्‍छतेसाठी येणारा निधी योग्‍य ठिकाणी वापरला जात नाही का ? असाही प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

टायलेटला जायचे कुठे ?

काही वर्षांपूर्वी कुंभार पिंपळगाव आठवडी बाजाराच्‍या आजूबाजुला व इतर रस्‍त्‍यांच्‍या बाजुला शेतजमीन व झाडेझुडपे होते, त्‍यावेळेस किमान शेतात उघड्यावर का असेना टॉयलेटला जाणे शक्‍य होते, परंतू आता आठवडी बाजार असो किंवा इतर कोणतेही रस्‍ते असो सर्व बाजूने घर व दुकाने झाली आहेत, मग अशा वेळी महिलांना टॉयलेटला जायचे असल्‍यास त्‍यांनी जायचे कोठे ? ही एक प्रकारे महिला व मुलींची कुचंबना नाही का ? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कुठेच सुविधा नाही !

कुंभार पिंपळगांव 20 ते 25 हजार लोकसंख्‍येचे गांव (शहर) आहे. परंतू येथे मागील एवढ्या वर्षात ग्रामपंचायतला एकही सार्वजनिक शौचालय बांधता आले नाही. बस स्‍थानकातही अशी सुविधा नाही अन ग्रामपंचायतनेही कुठे सार्वजनिक शौचालय बांधले नाहीत, त्‍यामुळे कुंभार पिंपळगावसह परिसरातून येणाऱ्या नागरिकांनाही नाहक त्रास होत आहे. ग्रामपंचायतच्‍या दुर्लक्षामुळे स्‍थानिक नागरिकांसह बाहेरून गावात येणाऱ्या नागरिकांमध्‍येही नाराजी दिसून येत आहे.

पाहुण्‍यांची अडचण !

कुंभार पिंपळगांवसह परिसरातील 30 ते 40 गावातील नागरिक बाहेरगावी येण्‍याजाण्‍यासाठी कुंभार पिंपळगांवात येत असतात. शिवाय परिसरातील नागरिकांचे पाहुणे सुध्‍दा या भागात येत असतात किंवा भेटून परत जात असतात परंतू कुंभार पिंपळगांव शहरात आल्‍यावर त्‍यांना टॉयलेटची सुविधाच दिसत नाही. एवढं मोठं शहर, हजारोची लोकसंख्‍या, हजारो दुकाने, मोठमोठ्या बिल्‍डींग, हायवे रस्‍ता, गाजलेले नेते, प्रसिध्‍द पदाधिकारी, लाखोंच्‍या आणि कोटींच्‍या गप्‍पा, एवढं काही असतांना मात्र गावात (शहरात) एकही सार्वजनिक शौचालय का नाही ? असा प्रश्‍न त्‍यांना पडत आहे.

पैसे घ्‍या पण सुविधा द्या !

ग्रामपंचायतला टॅक्‍स वसुलीतून मिळणारे पैसे, शासनाचा लाखो रूपयांचा येणारा निधी कमी पडत असावा त्‍यामुळेच कदाचित ग्रामपंचायत या महत्‍वाच्‍या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असेल. मात्र जर ग्रामपंचायतने इतरत्र बसस्‍थानकात ज्‍या प्रमाणे टॉयलेटची सुविधा असते त्‍याच प्रमाणे टायलेट बांधल्‍यास व कोणाला वार्षिक कराराने चालवायला दिल्‍यास नागरिक पैसे देवून टॉयलेट सुविधेचा वापर करू शकतील.

ग्रामसेवकाचे लक्ष आहे का ?

सद्यस्थितीत असलेले ग्रामसेवक गेल्‍या अनेक वर्षांपासून कुंभार पिंपळगावला कार्यरत आहेत. परंतू त्‍यांना महिला व नागरिकांसाठी महत्‍वाचा असलेला हा प्रश्‍न सोडवावा असे कधी वाटलेच नाही असेच दिसते. त्‍याचे महत्‍वाचे कारण म्‍हणजे सन्‍माननीय ग्रामसेवक हे महिना पंधरा दिवसात कधीतरी दिसतात. बरं ते येतात अन काही क्षणातच त्‍यांना काहीतरी होतंय त्‍यामुळे ते तातडीने गाव सोडतात असेही नागरिक सांगत आहेत. जर ग्रामसेवक महिना, पंधरा दिवसाला किंवा आठवड्याला एखाद्यावेळी गावाला दर्शन देत असतील तर गावाचं कल्‍याण कसं होणार आणि असे महत्‍वाचे प्रश्‍न सुटणार कसे ? असा सवालही नागरिक करत आहेत.


इतर बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!