Your Alt Text

खुदी को करके बुलंद इतना सरकारने एक्‍सप्रेस रस्‍ता बनाया जैसे तैसे, लेकीन लोग पूछ रहे है की, एस.टी. बस ही नही है फिर यहां से आगे जाएंगे कैसे ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
शासनाने चांगल्‍या भावनेतून रस्‍ता बनवला असेल तर शासनाच्‍याच अधिपत्‍याखाली असलेल्‍या एस.टी. महामंडळाला त्‍याच मार्गावर बसेस चालवण्‍यास काही अडचण नसावी. एस.टी.महामंडळच जनतेच्‍या हितासाठीच असून जनतेचा सर्व मार्गावरील प्रवास सुखकर व्‍हावा म्‍हणून या महामंडळाची स्‍थापना करण्‍यात आलेली आहे, परंतू अंबड आगार, परतूर आगार (जि.जालना) यांना कदाचित याचा विसर पडला असावा त्‍यामुळेच की काय अनेक मार्गांवर बसेस नसल्‍याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

रस्‍ता तर आहे परंतू त्‍या रस्‍त्‍यावर प्रवास करण्‍यासाठी गोरगरीब व सर्वसामान्‍य जनतेला एस.टी. बसेस नाहीत अशी सध्‍याची परिस्थिती अनेक मार्गांवर दिसून येत आहे. त्‍यामुळेच की काय शायरी प्रमाणे एक वाक्‍य येथे लागू पडत असावे ते म्‍हणजे…. खुदही को करके बुलंद इतना एक्‍सप्रेस रस्‍ता बनाया जैसे तैसे, लेकीन लोग पूछ रहे है की, एस.टी.बस ही नही है फिर यहां से आगे जाएंगे कैसे ?

मुख्‍य मार्गांचे काम !

काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की, जिकडे तिकडे रस्‍ते अत्‍यंत खराब होते. रस्‍त्‍यावर खड्डे की खड्यावर रस्‍ते अशी परिस्थिती होती, त्‍यामुळे एस.टी. महामंडळाची बस या रस्‍त्‍यावर पाठवणे शक्‍य नाही असे त्‍यावेळी संबंधित आगाराचे म्‍हणणे होते. आजही असंख्‍य गावांना जोडणारे रस्‍ते झालेले नाहीत हे सत्‍य असले तरी जे मुख्‍य मार्ग किंवा महामार्ग आहेत ते आता चांगले झाले आहेत.

मागील काळात अंबड ते कुंभार पिंपळगांव – आष्‍टी – पाथरी पर्यंत रस्‍ता अत्‍यंत खराब होता, परंतू पाचोड- अंबड- घनसावंगी- आष्‍टी या महामार्गाचे काम झाल्‍याने अर्थातच अंबड ते कुंभार पिंपळगांव – आष्‍टी – पाथरी या मार्गावर एस.टी.बस. चालवण्‍यास अडचण नाही.

तसेच मागील काळात कुंभार पिंपळगांव ते परतूर हा रस्‍ता अत्‍यंत खराब होता, मात्र या रस्‍त्‍याचेही काम झाल्‍याने एस.टी. बस चालवण्‍यास काहीही अडचण नाही. असे असतांनाही कुंभार पिंपळगांव ते आष्‍टी आणि कुंभार पिंपळगांव ते परतूर या मार्गावर अपवाद सोडल्‍यास एस.टी. बस नसल्‍याने वयोवृध्‍द नागरिक, महिला व लहान मुलांसह प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रवाशांची मागणी काय ?

  • अंबड आगाराकडून अंबड ते आष्‍टी पर्यंत काही बसेस सुरू करण्‍यात याव्‍यात तसेच अंबड ते कुं.पिंपळगांव – आष्‍टी- माजलगाव, अंबड ते कुंभार पिंपळगांव – पाथरी, अंबड ते कुंभार पिंपळगांव – परतूर या मार्गावरही बसेस सुरू करण्‍यात याव्‍यात. शिवाय अंबड ते कुंभार पिंपळगांव मार्गावर दिवसभरात नियमित चालणाऱ्या बसेस पैकी एक किंवा दोन बसेस रिटर्न (परत) जातांना तिर्थपुरी मार्गे सुध्‍दा अंबडला असाव्‍यात.
  • परतूर आगाराकडून परतूर ते कुंभार पिंपळगांव – अंबड नियमित बसेस सुरू करण्‍यात याव्‍यात, शिवाय परतूर – कुंभार पिंपळगांव – जालना, परतूर – कुंभार पिंपळगांव – गेवराई या मार्गावरही बसेस सुरू करण्‍यात याव्‍यात.
  • तसेच जालना आगाराने जालना – राणी उंचेगांव -घनसावंगी – कुंभार पिंपळगांव – आष्‍टी – माजलगाव पर्यंत किमान एक बस नियमित सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

कुंभार पिंपळगांव- जालना बस हवी !

मागील काळात कुंभार पिंपळगांव ते घनसावंगी – राणी उंचेगाव – जालना हा रस्‍ता जालना जाण्‍यासाठी जवळचा असतांनाही सदरील रस्‍ता अत्‍यंत खराब असल्‍याने प्रवाशांना किंवा वाहनधारकांना कुंभार पिंपळगांव ते अंबड व जालना असा लांबचा प्रवास करावा लागत होता, परंतू काही वर्षांपूर्वी कुंभार पिंपळगांव ते घनसावंगी – राणी उंचेगाव – जालना हा कोट्यावधी रूपये खर्चून सिमेंट कॉंक्रीटचा रस्‍ता झाला आहे. ज्‍यांच्‍याकडे वाहने आहेत ते याच मार्गाने जालना जात आहेत, परंतू गोरगरीब व सर्वसामान्‍य प्रवाशांना या मार्गावरून जाण्‍यासाठी बस नसल्‍याने वयोवृध्‍द, महिला, लहान मुलांसह प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय जास्‍तीचे पैसे खर्चून अंबड मार्गे लांबचा प्रवास करावा लागत आहे. त्‍यामुळे जालना आगाराने जालना ते घनसावंगी-कुंभार पिंपळगांव – आष्‍टी आणि शक्‍य असल्‍यास माजलगांव पर्यंत गाडी सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

कुंभार पिंपळगांव हे 20 ते 25 हजार लोकसंख्‍येचे शहर असून मोठी व्‍यापारीपेठ आहे. शिवाय 25 ते 30 गावांचा केंद्रबिंदू आहे, या भागातून दररोज जालना जाणाऱ्या व्‍यापारी व प्रवाशांची संख्‍या मोठी आहे. सदरील गाडी माजलगांव पर्यंत सुरू झाल्‍यास, सकाळी माजलगांव पासून आष्‍टी मार्गे कुंभार पिंपळगांव येथे 9 ते 10 च्‍या दरम्‍यान आल्‍यास जालना येथे जाण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवासी मिळू शकतात, शिवाय रिटर्न मध्‍ये जालना येथून 4 वाजता निघून कुंभार पिंपळगांव मार्गे माजलगांव मुक्‍कामी पाठवल्‍यास प्रवासीही मिळतील आणि प्रवाशांचीही अडचण दूर होईल.

जबाबदारी झटकण्‍याचा प्रकार !

अंबड – कुंभार पिंपळगांव या मार्गावर अंबड आगाराच्‍या बसेस नेहमी फुल्‍ल म्‍हणजेच भरलेल्‍या असतात, अर्थातच वर्षभरात आगाराला या मार्गावर कोट्यावधी रूपये या मार्गावरून मिळतात, परंतू तरीही काही तरी कारण देवून पुढे बसेस पाठवल्‍या जात नाहीत.


काही वर्षांपूर्वी रस्‍ते खराब असतांनाही अंबड आगाराच्‍या अंबड-कुंभार पिंपळगांव ते परतूर या मार्गावर बसेस होत्‍या, अंबड ते आष्‍टी – माजलगांव तसेच अंबड ते पाथरी या मार्गावर बसेस सुरू होत्‍या, तसेच परतूर आगाराकडूनही परतूर-कुंभार पिंपळगांव ते अंबड या मार्गावर बसेस सुरू होत्‍या, कालांतराने रस्‍ते खराब असल्‍याचे कारण देवून या गाड्या बंद करण्‍यात आल्‍या, परंतू आता या सर्व मार्गावरील रस्‍त्‍यांचे काम झाले असल्‍याने एस.टी.बसेस चालवण्‍यास काहीच अडचण नाही, तरीही दोन्‍ही आगाराकडून एकमेकांकडे बोट दाखवण्‍यात येत आहे, तसेच नवीन बसेस चालू करण्‍यासाठी वरिष्‍ठांची परवानगी घ्‍यावी लागेल म्‍हणजेच जालना येथील विभागीय कार्यालयाची परवानगी घ्‍यावी लागेल असे सांगून जबाबदारी झटकण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत आहे.

खाजगी वाहनाने दुपप्‍ट पैसे !

कुंभार पिंपळगांव येथून आष्‍टी (18 km), परतूर (35 km), पाथरी (42 km), तिर्थपुरी (14 km), माजलगाव (50 km) या मार्गांवर बसेस नसल्‍याने खाजगी वाहनाने (त्‍यांचे वाहन भरत नाही तोपर्यंत बसून) दुप्‍पट पैसे देवून प्रवास करावा लागत आहे. सर्वसामान्‍य प्रवाशांना बसेस नसल्‍याने नाईलाजाने जास्‍तीचे पैसे देवून भुर्दंड सोसावा लागत असल्‍याने प्रवाशांमध्‍ये नाराजी आहे.

एसटी आता नफ्यात !

मागील काळात एस.टी.तोट्यात असल्‍याचे कारण सांगून संबंधित आगाराकडून कमी प्रवासी असलेल्‍या मार्गांवर बसेस बंद करण्‍यात आल्‍या, मात्र आता रस्‍ते चांगले झाल्‍याने नियमित प्रवासीही वाढले आहेत, शिवाय महिलांना अर्धे तिकीट करण्‍यात आल्‍याने सर्वच मार्गांवर एस.टी. मध्‍ये प्रवाशांची संख्‍या प्रचंड प्रमाणात वाढली आहे, एस.टी.महामंडळ तोट्यातून फायद्यात आले आहे, त्‍यामुळे संबंधित आगारांनी कोणतेही कारण न देता प्रवाशांची अडचण व जनतेचे हित लक्षात घेवून सर्व मार्गांवर बसेस सुरू कराव्‍यात अशी मागणी माता भगीनींसह प्रवाशांनी केली आहे.

मागणीचा विचार करू !

सदरील मार्गांवर बसेस सुरू कराव्‍यात अशी प्रवाशांची मागणी असेल तर यावर नक्‍कीच विचार करू, या मार्गांवर यापूर्वी बसेस सुरू होत्‍या का याचीही माहिती घेण्‍यात येईल, संबंधित आगार प्रमुखांना बसेस सुरू करण्‍याबाबत सूचना देण्‍यात येतील आणि प्रवाशांची अडचण दूर करण्‍यात येईल अशी प्रतिक्रिया विभाग नियंत्रक जालना यांनी दिली आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!