Your Alt Text

घनसावंगी पोलीस ठाणे प्रमुखांचे दुर्लक्ष ! अवैध धंदे तर सुरू होतेच आता चोरांनाही धाक राहिला नाही ! कुं.पिंपळगांवात विविध ठिकाणी चोरी !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
एकतर सर्वसामान्‍य व्‍यापारी हे धंदे नसल्‍यामुळे हैराण आहेत आणि दुसरं म्‍हणजे आता चोऱ्या सुरू झाल्‍या आहेत, त्‍यामुळे व्‍यवसाय सुरू ठेवायचा की बंद करायचा असा प्रश्‍न अनेक व्‍यापारी बांधवांसमोर निर्माण झाला आहे. कारण यापूर्वी झालेल्‍या बहुतांश चोऱ्यांचा तपास अद्याप लागलेला नाही हे विशेष.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे रविवारी पहाटे २ च्‍या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ३ दुकानामध्‍ये चोरी तर एका दुकानामध्‍ये चोरीचा प्रयत्‍न केल्‍याचे समोर आले आहे. सदरील चोरी झालेल्‍या दुकानातील जवळपास २ लाख रूपयापेक्षा जास्‍त किमतीचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरी झालेल्‍यांमध्‍ये न्‍यू जनता वेल्‍डींग वर्कशॉप या दुकानातील वेल्‍डींग केबल, कटर, इतर साहित्‍य व स्‍क्रॅप असा १ ते दिड लाखांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे तर माऊली मोटार रिवायडींग यांचा मोटार रिवायडींग वायर व स्‍क्रॅपचा अंदाजे ५० ते ६० हजाराला माल चोरट्यांनी चोरून नेला आहे.

तसेच अरगडे गव्‍हाण चौफुली येथील नाना काका कृषि सेवा केंद्राच्‍या शटरचे कुलुप तोडून काही रोख रक्‍कम व काही औषधाच्‍या बाटल्‍या चोरट्यांनी लंपास केल्‍या आहेत. तसेच समर्थ सोलर सर्व्हिसेसचे दुकान फोडून चोरीचा प्रयत्‍न झाल्‍याचे समोर आले आहे. प्राप्‍त माहितीनुसार आजुबाजूच्‍या सीसीटीव्‍हीत चोरटे दिसत असल्‍याचे सांगितले जात आहे.

तपास केला तर !

कुंभार पिंपळगावात झालेल्‍या चोरीचा तपास मनातून केल्‍यास आरोपी नक्‍कीच पकडले जावू शकतात. कारण चोरी ही मुख्‍य रस्‍त्‍यावर असलेल्‍या दुकानात झाली असून मुख्‍य रस्‍त्‍यावर अनेक दुकानांमध्‍ये सीसीटीव्‍ही कॅमेरे लागलेले आहेत, शिवाय स्‍थानिक पोलीसांकडे बरीच गोपनीय माहिती असते. चोरट्यांना वाचवायचं नसेल तर पोलीस निरीक्षकांनी एखाद्या कर्मचाऱ्याकडे तपास सोपवून मोकळं न होता, वेगवेगळ्या पातळीवर सखोल तपास केल्‍यास चोरीचा तपास नक्‍कीच लागू शकतो अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

रात्रीचे राऊंड आवश्‍यक !

चोऱ्यांचे सत्र सुरू झाल्‍यामुळे यापुढे चोऱ्या होणार नाही याची शाश्‍वती देता येणार नाही. त्‍यामुळे यापूर्वी ज्‍या प्रमाणे रात्रीची गस्‍त सुरू होती त्‍या प्रमाणे राउंड सुरू करणे आवश्‍यक झाले आहे. व्‍यापारी वर्गात भितीचे वातावरण असून वरिष्‍ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चोरीचा तपास करण्‍याबाबत व रात्रीची गस्‍त सुरू करण्‍याबाबत योग्‍य ती कार्यवाही करावी अशी मागणी व्‍यापारी वर्गातून होत आहे.

धाक राहिला नाही !

कुंभार पिंपळगांव व परिसरात अवैध धंदे तर राजरोसपणे सुरू होतेच परंतू आता चोरट्यांनाही घनसावंगी पोलीस ठाण्‍याचा किंवा ठाणे प्रमुखांचा धाक राहिला नाही असे म्‍हटल्‍यास चुकीचे ठरणार नाही. गेल्‍या वर्षी घनसावंगी पोलीस ठाण्‍यात जॉईन झालेले पो.नि. केतन राठोड हे आल्‍यानंतर काही तरी चित्र बदलेल, अवैध धंदे बंद होतील, चोऱ्या होणार नाही अशी अपेक्षा जनतेतून व्‍यक्‍त करण्‍यात येत होती. परंतू बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असाच काही प्रकार झाल्‍याचे नागरिक सांगत आहेत.

जाणीवपूर्वक दुर्लक्ष !

घनसावंगी पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड हे जॉईन झाल्‍यापासून कुंभार पिंपळगावात केव्‍हा आले हे कोणालाही सांगणे थोडे अवघड झाले आहे. कारण अनेक नागरिकांना विचारल्‍यास घनसावंगी पोलीस ठाण्‍याला पोलीस निरीक्षक म्‍हणून कोण आले आहेत हे आम्‍हाला माहित नाही, आम्‍ही त्‍यांना पाहिलं सुध्‍दा नाही असे नागरिकांनी सांगितले.

घनसावंगी तालुक्‍यातील सर्वात मोठे गांव (शहर) हे कुंभार पिंपळगांव आहे. २० हजारापेक्षा जास्‍त लोकसंख्‍या आहे, जवळपास १ हजाराच्‍या आसपास व्‍यापारी दुकाने आहेत. बॅंका, पतसंस्‍था, शाळा, महाविद्यालय आहेत. तरीही पोलीस निरीक्षकांचे या गावाकडे दुर्लक्ष का आहे ? ते या गावाला सावत्र आई सारखी वागणूक का देत आहेत ? जसं चाललंय तसं चालू द्या अशी भुमिका दिसत असल्‍यामुळे त्‍यांनाही विशिष्‍ट वातावरणाची हवा लागली आहे का ? असे अनेक प्रश्‍न नागरिकांना पडले आहेत.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!