एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
वर्षानुवर्षे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असेल, बऱ्याचवेळा विकतचे पाणी घ्यावे लागत असेल, माता भगीनींना उन्हातान्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत असेल, तरीही यंत्रणा दुर्लक्ष करत असेल आणि नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत असेल तर यंत्रणेच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा करणे क्रमप्राप्त ठरते. कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे सुध्दा वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न गंभीर असतांना यंत्रणेणे साफ दुर्लक्ष केले. मात्र एल्गार न्यूजने पाणी पुरवठ्याचा विषय लावून धरल्यामुळे कुंभार पिंपळगांव येथील जलजीवन मिशन योजनेचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती एल्गार न्यूजला प्राप्त झाली आहे.
१४ वर्षांचा वनवास संपणार का ?
कुंभार पिंपळगांव येथे सन २०११ मध्ये १ कोटी २५ लाख रूपयांची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना मंजूर झाली होती, परंतू यंत्रणेच्या भ्रष्ट कारभारामुळे योजना पूर्ण होवू शकली नाही किंवा योजनेचे पाणी गावकऱ्यांना मिळाले नाही, अक्षरश: संपूर्ण योजना संबंधितांनी संगणमत करून खाऊन टाकली असेच म्हणावे लागेल. संबंधित गुत्तेदाराने गावाच्या बाहेरील थोडेफार काम करून काम बंद अवस्थेत सोडून दिले, प्राप्त माहितीनुसार जवळपास ७५ लाख रूपयांचे बील काढून गुत्तेदार पसार झाला.
२०११ पूर्वी सुध्दा पाण्याची विशेष काही सोय नव्हती, परंतू २०११ मध्ये योजना मंजूर होवून पाण्याचा प्रश्न मिटेल असे वाटत होते, मात्र यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे सन २०११ ची योजना सुध्दा अर्धवट अवस्थेत बंद पडली आणि गावाला पाणी पुरवठा होवू शकला नाही. अर्थातच १४ वर्षांचा वनवास झालेला असतांनाही कोणत्याच योजनेतून गावाला पाणी मिळू शकले नाही.
जलजीवन मिशन योजना !
कुंभार पिंपळगांव करीता शासनाने जवळपास २ कोटी रूपयांची जलजीवन मिशन योजना मंजूर केली होती. जानेवारी २०२३ मध्ये टेंडर निघून कामही सुरू झाले होते. कामाचा कालावधी ५४५ दिवस म्हणजे दिड वर्षांचा होता, मात्र आज रोजी दोन वर्षे उलटूनही योजनेचे काम अर्धवट अवस्थेत असून अद्यापपर्यंत गावात एक पाईप सुध्दा टाकण्यात आले नाही, त्यामुळे पाणी मिळण्याचा प्रश्नच येत नाही. या योजने अंतर्गत गावातील १०० टक्के नागरिकांना नळ कनेक्शन द्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे आवश्यक होते, मात्र शुद्ध तर सोडा साधारण पाणी सुध्दा गावात पोहोचू शकले नाही.
हर घर जल घोटाळा !
जालना जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये आणि गावातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळत असल्याचे घोषित करून पाणी पुरवठा विभागाने “हर घर जल” गांव प्रमाणपत्र जारी केले आहे. त्यामध्ये कुंभार पिंपळगांवचा सुध्दा समावेश असून गावाला अजून योजनेचे थेंबभर पाणी मिळालेले नसतांना गांव हर घर जल घोषित केलेचे कसे ? असा प्रश्न एल्गार न्यूजने उपस्थित केल्यावर याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून सुरू झाली आहे.
एल्गार न्यूजचा दणका !
एल्गार न्यूजने यापूर्वीही कुंभार पिंपळगांव येथील जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचा विषय वेळोवेळी घेवून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, तरीही कुंभकर्णा प्रमाणे झोपी गेलेल्या भ्रष्ट यंत्रणेला जाग येत नव्हती, मात्र आता एल्गार न्यूजने जलजीवन सह “हर घर जल” महाघोटाळा उघड केल्यानंतर यंत्रणा खळबळून जागी झाली असून यंत्रणेला झोपच लागत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता काय करावं म्हणून प्राधान्याने कुंभार पिंपळगांव येथील जलजीवन चे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
काम एकदम ओकेच हवे !
गांवकऱ्यांनी एकतर १४ वर्षांचा वनवास विनाकारण सहन केलेला आहे, आता पुन्हा जर थातूरमातूर काम करून बिले काढण्याचा प्रयत्न केल्यास गांवकरी सहन करणार नाही. कारण अशी योजना गावाला पुन्हा मिळणार नाही आणि पुन्हा जर गांवकऱ्यांना पाण्यासाठी वनवास सहन करण्याची वेळ येणार असेल तर त्याऐवजी कायदेशीर मार्गाने दोषींचा कार्यक्रम लागेल यात शंका नाही.
गांवकऱ्यांना आवाहन !
कुंभार पिंपळगांवला जलजीवन मिशन योजने अंतर्गत जवळपास २ कोटी रूपये मंजूर असून दिड वर्षात काम पूर्ण होणे आवश्यक असतांना २ वर्षे उलटूनही अद्यापपर्यंत योजनेचे काम अर्धवट अवस्थेत आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत योजनेचे काम पूर्ण करावेच लागणार आहे, त्यामुळे आता जर इस्टीमेट प्रमाणे नियमान्वये काम सुरू होणार असेल तर गावातील प्रत्येक नागरिकाने त्यांच्या गल्लीत आणि घरापर्यंत पाईपलाईन आल्यास हक्काने नळ कनेक्शन घराच्या आत घ्यावे. कुंभार पिंपळगांव शहरात राहणारा एकही कुटुंब पाईपलाईन व नळ कनेक्शनच्या माध्यमातून वंचित राहणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. कारण अशी योजना पुन्हा नाही.
तुट्टी फिरवली की पाणी यावे !
शासनाने चांगल्या हेतूने प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन ही योजना सुरू केली असून कुंभार पिंपळगांवला सुध्दा ही योजना मंजूर आहे. योजने अंतर्गत गावातील प्रत्येक घरात नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा करणे क्रमप्राप्त आहे. फक्त नळ कनेक्शनच नव्हे तर नळाची तुट्टी फिरवली तर पाणी सुध्दा यायला पाहिजे अशी ही योजना आहे.
एल्गार न्यूजचा पाठपुरावा !
जो पर्यंत कुंभार पिंपळगांव शहरातील (१०० टक्के) प्रत्येक नागरिकाच्या घरात नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा होत नाही तो पर्यंत एल्गार न्यूजचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. बाकी जालना जिल्ह्यातील हर घर जल महाघोटाळ्याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून सुरू झालेली असून जो पर्यंत घोटाळ्याची सखोल चौकशी होत नाही तो पर्यंत एल्गार न्यूजचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत. राहिला प्रश्न दबाव वगैरेचा तर एल्गार न्यूज कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही हे सुध्दा तितकेच खरे…