एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
कुणबी जात प्रमाणपत्रासह मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला यश आले असून शासनाने मागण्यांसंदर्भात जीआर काढून मराठा समाजाला मोठा दिलासा आहे. अर्थातच मागण्या मान्य मान्य झाल्यामुळे मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
राज्य मंत्रीमंडळातील मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत, जयकुमार गोरे इत्यादींनी (दि.02) आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून शासनाच्या वतीने तयार केलेला मसुदा त्यांना दाखवला, त्यानंतर अवघ्या काही वेळात शासनाने जीआर काढून मागण्या मान्य केल्या आहेत. सदरील मागण्यांपैकी काही मागण्या तात्काळ मान्य करण्यात आल्या असून काही मागण्या ठराविक कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.
जिंकलो राजेहो..!
मंत्री तथा उपसमितीच्या सदस्यांनी शासनाच्या वतीने मसुदा दाखवून मागण्या मान्य केल्याबाबत व जीआर काढण्यात येत असल्याबाबत माहिती दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जिंकलो हो, राजेहो तुमच्या ताकदीवर, सरकारने आपल्या मान्य केल्याचे सांगताच, आझाद मैदानावर एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बप्पा मोरया अशा घोषणांनी आझाद मैदानात घोषणा देण्यात आल्या. यानंतर अवघ्या काही वेळातच शासनाचा जीआर मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आला व उपोषण सोडण्यात आले.
परस्परांचे आभार !
राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. तसेच मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. तसेच या सर्व निर्णय प्रक्रियेसाठी पाठीशी उभे असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही आभार व्यक्त केले.
जरांगे पाटील यांचे आनंदाश्रू !
सरकार कडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. यावेळी जरांगे पाटील यांनी आंदोलक समाज बांधवांना गावाकडे जातांना काळजी घेण्याचे आवाहनही केले.
सर्वत्र आनंदोत्सव !
शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यामुळे मुंबईसह राज्यभरात मराठा समाज बांधवांच्या वातीने आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. २९ तारखेला सदरील आंदोलन सुरू झाले होते, आंदोलनाच्या ५ व्या दिवशी अखेर सरकारने मागण्या मान्य केल्या असून जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे हे खूप मोठे यश आहे.