एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील व्यापारी व नागरिकांकडून काही तृतीयपंथीयांनी दि.21 रोजी अरेरावीची व अपमानास्पद भाषा वापरून बळजबरीने हजारो रूपयांची वसूली केली होती, सदरील वसुली अंदाजे 50 हजारापेक्षा जास्त झाल्याची चर्चा होती. याबाबत एल्गार न्यूजने दि.22 रोजी बातमी प्रकाशित केल्यावर आता सदरील व्यक्तींवर कारवाई करणार असल्याचे घनसावंगी पोलीस ठाण्याकडून कळविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे दि.21 रोजी काही तृतीयपंथीय व्यक्तींनी संपूर्ण मार्केट मध्ये फिरून 100 ते 500 रक्कम वसुल केली होती. कोणी 10 किंवा 20 रूपये दिल्यास त्याला अपशब्द वापरणे, गलीच्छ भाषा वापरणे, अपमानास्पद बोलणे, दुकानात ढोल वाजवणे, इतरांसमोर अपमान करणारी भाषा वापरणे असे प्रकार या तृतीयपंथीयांनी केले.
किती पैशांची वसूली ?
कुंभार पिंपळगांवात सदरील तृतीयपंथीय व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर पैशांची वसूली केली. कोणाकडून 500, 300, 250, 200, 100, 150, 100 आणि किमान 50 रूपये घेतल्याचे नागरिकांनी सांगितले. कुंभार पिंपळगावात 1000+ दुकाने आहेत, शिवाय त्यांनी रस्त्यावर ये-जा करणाऱ्या लोकांकडूनही पैसे घेतले. उदाहरणार्थ कुंभार पिंपळगावातील 1000 दुकानांपैकी 800 दुकानावरून तसेच नागरिकांकडून मिळून प्रत्येकी किमान 50 रूपये जरी गृहीत धरले तरी या तृतीयपंथी लोकांनी अंदाजे 40 ते 50 हजार रूपये वसूल केल्याचे बोलले जात आहे.
बळजबरीने वसुली !
दान धर्म म्हणून दुकानात कोणीही व्यक्ती आले तर व्यापारी त्यास पैसे देत असतात, परंतू सदरील तृतीयपंथीयांची टोळी जेव्हा दुकानात पैसे मागायला आली तेव्हा अमुक एवढेच पैसे पाहीजेत म्हणून बळजबरी करताना दिसून आले. दि.21 रोजी प्रत्येक दुकानात जावून 500 द्या नाहीतर किमान 200 किंवा 100 तर हवेच अशी बळजबरी सुरू केली. व्यापारी बांधवांनी एवढे पैसे नाही म्हटले की, त्यांच्या दुकानासमोर ढोल वाजवून अपशब्द वापरणे, गलीच्छ भाषा वापरणे, अममानास्पद बोलणे, खिशातून पैसे काढणे असे प्रकार केले, आणि पैसे घेतल्याशिवाय ते पुढे गेलेच नाहीत असे अनेकांनी सांगितले.
व्यापाऱ्यांमध्ये संताप !
एक तर दिवसभरात दुकानाचे भाडे सुध्दा निघणे मुश्किल असतांना या लोकांना 500 किंवा 200 रूपये प्रत्येक व्यापाऱ्याने का द्यायचे ? स्वखुशीने 10 – 20 रूपये कोणी दिले तर या लोकांनी का घेवू नये ? बळजबरीने ही हप्ता वसुली कशामुळे ? कायद्याने अशा प्रकारची बळजबरीने वसुली करण्याला परवानगी आहे का ? या लोकांचा विनाकारण त्रास का सहन करायचा ? असा सवाल व्यापारी व नागरिकांनी उपस्थित केला आहे.
व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया !
एल्गार न्यूजने दि.22 रोजी रोखठोक बातमी प्रकाशित केल्यानंतर कुंभार पिंपळगावातील अनेक व्यापारी बांधवांनी प्रत्यक्ष अथवा कॉल करून व मॅसेज करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. कोणी सांगितले आमच्याकडून 500 घेतले, कोणी सांगितले आमच्याकडे 250 घेतले तर कोणी सांगितले आमच्याकडून 100 रूपये घेतले. आमच्याकडून बळजबरीने आणि अपमानास्पद व अरेरावीची भाषा वापरून पैसे घेवून गेल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय एल्गार न्यूजने स्वत:हून बातमी घेवून व्यापारी व नागरिकांची बाजू मांडल्याबद्दल एल्गार न्यूजचे आभारही व्यक्त केले.
पोलीस कारवाई करणार !
स्वखुशीने व्यापारी कोणाला काही पैसे देत असतील तर अडचण नाही, परंतू बळजबरीने कोणी व्यापारी व नागरिकांकडून हवे तेवढे पैसे मागून वसुली करू शकत नाहीत, कायद्याने असे मुळीच करता येणार नाही. कुंभार पिंपळगांवात बळजबरीने ज्या तृतीयपंथीयांनी वसुली केली आहे त्यांची चौकशी केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, शिवाय भविष्यात असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असे घनसावंगी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक आनंद साबळे यांनी कळविले आहे.