एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
एकीकडे रस्ते चांगले असावेत ही साहजिकच नागरिकांची मागणी असते, परंतू रस्ते चांगले झाल्यावर अनेक वाहनधारकांकडून भरधाव वेगाने वाहने चालवण्यात येत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. विशेष करून महामार्गांवर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने अनेकांचा जीव जात आहे तर अनेकजण जख्मी होत आहेत.
पाचोड- अंबड – घनसावंगी – आष्टी हा महामार्ग कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) या शहरातून गेलेला आहे. रस्ता झाल्यापासून अंबड ते आष्टी या मार्गावर आतापर्यंत अनेक अपघात होवून अनेकांचा जीव गेला असून अनेकजण जख्मी झाले आहेत. या रस्त्यावर कुंभार पिंपळगांव सह अनेक छोटी गावे आहेत, परंतू सदरील रस्त्यावर कोठेही गतिरोधक नसल्याने वर्दळ असतांनाही वाहने भरधाव वेगाने जात आहेत. त्यामुळे किमान रोडवरील चौक किंवा टी पॉईंट असलेल्या ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) असणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
कुंभार पिंपळगावातून दुसरा महामार्ग हा रांजणी ते राजाटाकळी हा गेलेला आहे. या रस्त्याचे कुंभार पिंपळगावातील डिव्हाईडर वगळता बहुतांश काम झालेले आहे (गावाच्या पुढे काम सुरू आहे) रस्ता चांगला झाला म्हणजे वर्दळीच्या ठिकाणीही वाहने भरधाव वेगाने पळवायची नसतात याचा विसर अनेक वाहनधारकांना पडला आहे. गावातून जाणाऱ्या महामार्गावर मार्केट कमिटी ते अरगडे गव्हाण चौफुली प्रचंड वर्दळ किंवा गर्दी असते. या मार्गावर शेकडो दुकाने, बॅंका, पतसंस्था असून पायी जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते, शिवाय अनेक शाळा असल्यामुळे शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी असते. मात्र अनेक वाहनधारक कशाचाच विचार न करता भरधाव वेगाने वाहने चालवित आहेत. यामध्ये सर्वच प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.
भविष्यात अधिक वर्दळ वाढणार !
कुंभार पिंपळगावातून गेलेला रांजणी ते राजाटाकळी हा महामार्ग पुढे गोदावरी नदीवर पुल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई व माजलगांव या दोन तालुक्यांना कनेक्ट होणार आहे. त्यामुळे येत्या काळात बीड जिल्ह्यातील वाहतुकही याच मार्गाने मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होवू शकते.
त्याकरीता मा.न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून व नियमान्वये शक्य तेवढ्या लवकर दोन्ही महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावेत, शिवाय गावातून जाणाऱ्या राजाटाकळी महामार्गावर भरधाव वेगाने वाहने चालवून नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी कुंभार पिंपळगांवसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गावात गतिरोधक केले जातील !
मुख्य हायवेवर गतिरोधक टाकण्याबाबत मा.उच्च न्यायालयाकडून निर्बंध असून परवानगी घेणे आवश्यक आहे. गतिरोधक टाकण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे नागरिक मागणी करू शकतात. कुंभार पिंपळगावातून गेलेला अंबड – आष्टी हायवे हा वर्ल्ड बॅंकेच्या माध्यमातून झालेला असून सदरील रस्ता छत्रपती संभाजीनगर येथील बांधकाम विभागा अंतर्गत येतो. त्यांच्याकडे नागरिक मागणी करू शकतात. मात्र कुंभार पिंपळगावातून गेलेल्या राजाटाकळी महामार्गाचे काम आमच्या अंतर्गत येत असल्याने सदरील रस्त्यावरील गावांतर्गत डिव्हाईडरचे काम झाल्यावर गावात (रबर) गतिरोधक टाकण्यात येईल अशी माहिती घनसाावंगी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता श्री.खोसे यांनी दिली आहे.