Your Alt Text

कुंभार पिंपळगावात विद्युत खांबावर टाकण्‍यात आलेली नवीन तार पुन्‍हा तुटून रस्‍त्‍यावर पडली ! गुत्‍तेदाराला नागरिकांचा जीव घ्‍यायचा आहे का ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
मराठीत एक म्‍हण आहे “आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास” या म्‍हणीप्रमाणेच सध्‍या विद्युत वितरण व्‍यवस्‍थेचे झाल्‍याचे दिसत आहे. विद्युत क्षेत्रात अनेक सुधारणा होणे आवश्‍यक असतांना अनेक ठिकाणी गुत्‍तेदारांकडून निकृष्‍ट दर्जाचे काम होत असल्‍याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्‍यय कुंभार पिंपळगांव येथे येत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे गावातून महामार्गाचे काम सुरू आहे. सदरील महामार्गालगत विद्युत पोल व विद्युत तारा टाकण्‍याचे काम ज्‍या गुत्‍तेदाराने घेतले आहे. त्‍यांनी विद्युत तारा ह्या निकृष्‍ट व हलक्‍या दर्जाच्‍या टाकल्‍या आहेत. त्‍यामुळे सदरील विद्युत तारा वांरवार तुटून रस्‍त्‍यावर पडत आहेत.

दि.22 रोजी सुध्‍दा बस स्‍थानक रोडवर नव्‍याने टाकण्‍यात आलेली विद्युत तार तुटून रस्‍त्‍यावर एका मुलीच्‍या पायाजवळ पडली, सुदैवाने जिवीत हानी झाली नाही, परंतू सदरील गुत्‍तेदाराला लोकांचे जीव घ्‍यायचे आहे का ? यापूर्वीही अनेकवेळा तार तुटून रस्‍त्‍यावर पडली होती, तरीही गुत्‍तेदाराने चांगल्‍या दर्जाच्‍या विद्युत तारा टाकलेल्‍या नाहीत. विद्युत तारा टाकून अवघे काही दिवसच झाले आहेत तरीही विद्युत तारा तुटून पडत आहेत.

जिवीत हानीची शक्‍यता !

सदरील गुत्‍तेदाराला वारंवार कल्‍पना देवूनही गुत्‍तेदाराने चांगल्‍या दर्जाच्‍या विद्युत तारा टाकलेल्‍या नाहीत. आतापर्यंत 4 ते 5 वेळा विद्युत तार तुटून रस्‍त्‍यावर पडली आहे. सुदैवाने जिवीत हानी झालेली नाही, परंतू सदरील गुत्‍तेदार, बांधकाम विभाग व महावितरण कंपनी एखाद्याचा जीव जाण्‍याची वाट पाहत आहे का ? असा सवाल सर्वसामान्‍य नागरिक करत आहेत.

गांवकऱ्यांचा इशारा !

मुख्‍य रस्‍त्‍यावर गुत्‍तेदाराकडून टाकण्‍यात आलेल्‍या विद्युत तारा ह्या निकृष्‍ट व हलक्‍या दर्जाच्‍या असून तात्‍काळ चांगल्‍या दर्जाच्‍या नवीन विद्युत तारा टाकण्‍यात याव्‍यात व संबंधितावर योग्‍य ती कारवाई करण्‍यात यावी अशा मागणीचे निवेदन सुध्‍दा गांवकऱ्यांच्‍या वतीने विद्युत कंपनीला देण्‍यात आले आहे. चांगल्‍या दर्जाच्‍या तारा न टाकण्‍यात आल्‍यास विद्युत कंपनीच्‍या कार्यालया समोर उपोषणाचा इशारा सुध्‍दा देण्‍यात आला आहे. भविष्‍यात जिवीत हानी किंवा इतर हानी झाल्‍यास गुत्‍तेदार व संबंधित विभागासह महावितरण कंपनी जबाबदार राहील असेही निवेदनात म्‍हटले आहे.

गुत्‍तेदाराचा मोबाईल बंद !

सदरील घटना घडल्‍यानंतर गावातील अनेकांनी गुत्‍तेदाराला फोन केला परंतू सदरील गुत्‍तेदाराने फोन बंद करून ठेवला आहे. सदरील गुत्‍तेदाराने विद्युत तारा व खांब बसवण्‍याचे काम घेवून अनेक महिने उलटले आहेत परंतू अद्याप काम पूर्ण झालेले नाही. शिवाय तारा निकृष्‍ट व दर्जाच्‍या टाकलेल्‍या आहेत. एवढंच नव्‍हे तर सदरील गुत्‍तेदार गावात सुध्‍दा येत नसल्‍याचे नागरिक सांगत आहेत. त्‍यामुळे वरिष्‍ठांनी या प्रकरणी लक्ष देणे आवश्‍यक आहे.

काही झाले असते तर…

माझी मुलगी व मी मुख्‍य रस्‍त्‍यावरून जात असतांना मुलीच्‍या पायाजवळ विद्युत तार तुटून पडली, सुदैवाने काही झाले नाही. परंतू काही बरेवाईट झाले असते याची जबाबदारी कोणाची ? तात्‍काळ सदरील विद्युत तारा जास्‍त क्षमतेच्‍या व चांगल्‍या दर्जाच्‍या टाकण्‍यात याव्‍यात. भविष्‍यात काही दुर्घटना घडल्‍यास याची सर्वस्‍वी जबाबदारी गुत्‍तेदार, बांधकाम विभाग व महावितरणची राहील अशी प्रतिक्रिया येथील सामाजिक कार्यकर्ते अनुरथ (चाचू) गाढे यांनी दिली.

…तरच परवानगी देवू !

याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता (जालना) श्री.मठपती यांच्‍याशी संपर्क साधला असता सदरील काम हे सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येते, चांगले काम करण्‍याबाबत त्‍यांना सूचना करण्‍यात येईल असे त्‍यांनी सांगितले. तर कुंभार पिंपळगांवचे सहाय्यक अभियंता श्री.कांबळे यांना विचारले असता संबंधित गुत्‍तेदाराला चांगल्‍या दर्जाच्‍या तारा टाकण्‍याबाबत कळविले आहे, लवकरच ते तारा घेवून येणार आहे. सदरील तारा (केबल) ची तपासणी केली जाईल, जर चांगल्‍या दर्जाच्‍या व जास्‍त क्षमतेच्‍या तारा असतील तरच त्‍या तारा बसवण्‍याची परवानगी दिली जाईल असे त्‍यांनी सांगितले.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!