Your Alt Text

सतिश घाटगे तसा माणूस चांगलाय, पण थोड्याशा कारणांमुळे त्‍यांचा कार्यक्रम बिघडू राहिलाय !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
ज्‍या काळात घनसावंगी तालुक्‍यात किंवा मतदारसंघात उसाचा प्रश्‍न गंभीर होता, त्‍या काळात सतिश घाटगे पाटील यांनी घनसावंगी तालुक्‍यात समृध्‍दी शुगर्स लि. (साखर कारखाना) सुरू करून तालुक्‍यासह घनसावंगी मतदारसंघ व तालुक्‍याबाहेरील सुध्‍दा असंख्‍य शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्‍याचे काम केल्‍याचे शेतकरी मान्‍य करतात.

सतिश घाटगे यांनी फक्‍त कारखान्‍यापुरते मर्यादित न राहता घनसावंगी मतदारसंघात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पांदन रस्‍ते करून दिले आहेत. काहींना मदतही केली आहे. भविष्‍यात मोसंबी उत्‍पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्‍याच्‍या दृष्‍टीने ते मोसंबी फळप्रक्रिया उद्योग सुध्‍दा सुरू करणार असल्‍याचे कळते. म्‍हणजे तसा माणूस चांगला आहे पण थोड्याशा कारणांमुळे कार्यक्रम बिघडू राहिलाय अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.

एखाद्या नेत्‍याविषयी १००% सकारात्‍मकच ऐकायला मिळेल अशीही अपेक्षा करता येत नाही. सतिष घाटगे यांच्‍यावर सध्‍या उसाच्‍या संदर्भात काही आरोप केले जात आहेत, याबाबत कदाचित ते स्‍वत: स्‍पष्‍टीकरण देतीलही. मात्र याव्‍यतिरिक्‍त सतिष घाटगे यांच्‍यावर काही नकारात्‍मक सुध्‍दा चर्चा ऐकायला मिळत आहे.

काही नागरिकांचे मत !

काही सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी व शेतकऱ्यांशी चर्चा केली असता त्‍यांनी असे सांगितले की, माणूस चांगला आहे, पण त्‍यांच्‍या बोलण्‍यात किंवा वागण्‍यात अहंकार दिसून येतो. त्‍यांच्‍या भाषेत किंवा बोलण्‍यात नम्रता दिसून येत नाही. कारखाना एक व्‍यवसाय आहे, चेअरमन किंवा मालक म्‍हणून धकून जाते परंतू जेव्‍हा समाजकारणासह राजकारणात आपण येतोत तेव्‍हा सेवक म्‍हणून लोकांमध्‍ये मिळून मिसळून रहावे लागते.

अनुशासन (Discipline) असणे चांगले आहे पण आपल्‍या बोलण्‍या वागण्‍यातून आपलेपणा दिसणेही तेवढेच महत्‍वाचे आहे. जेव्‍हा कोणी काही प्रश्‍न किंवा समस्‍या घेवून आपल्‍याकडे येत असतो तेव्‍हा नम्र भाषेत त्‍यांचे समाधान करावे लागते. उदाहरणार्थ सतिषरावांनी भैय्यासाहेबांचे इतर गुण बाजुला ठेवावेत पण एक गुण लक्षात घ्‍यावा तो म्‍हणजे, वाघा सारखा माणूस कितीही रागाच्‍या भरात आपल्‍याकडे आला तरी त्‍याला प्रेमाने (?) बोलून आणि पाठीवरून हात फिरवून (?) शांत कसे करायचे… यावरही विचार करावा अशीही प्रतिक्रिया शेतकरी बांधव देत आहेत.

आपल्‍याला हरभऱ्याच्‍या झाडावर चढवून गोडगोड बोलणाऱ्या आसपासाच्‍या चार चौघांनी जे सांगितले ते सगळेच खरे नसते. उदाहरण भैय्यासाहेबांचं घेता येईल, त्‍यांनी असंच चार चौघांवर अतिविश्‍वास ठेवला आणि त्‍यांचा कार्यक्रम झाला, अशीही प्रतिक्रिया काही बांधवांनी दिली आहे. बाकी सतिषरावांकडून काही चुकत असेल पण माणूस चांगला आहे आणि त्‍यांनी अनेक चांगली कामे सुध्‍दा केली आहेत त्‍यामुळे अनुभवातून भविष्‍यात त्‍यांच्‍यात नक्‍कीच सकारात्‍मक बदल होतील अशीही अपेक्षा अनेक शेतकरी बांधवांनी व्‍यक्‍त केली आहे.


हे पण वाचा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!