एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
आजच्या काळात पत्रकारिता क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत, वर्षानुवर्षे समाज व देशहित डोळ्यासमोर ठेवून इमाने इतबारे पत्रकारिता करतांना तारेवरची कसरत करावी लागते. अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, बहुतांश पत्रकार तर असे आहेत ज्यांना कुठलाही पगार किंवा लाभ नसतांनाही ते आपले कर्तव्य समजून ही जबाबदारी पार पाडत असतात.
५ मिनिट वेळ देवून शांतपणे वाचा…
असंख्य पत्रकार असे आहेत ज्यांनी आयुष्यातील अनेक वर्षे घर जाळून कोळशे केलेली आहेत. आजही असंख्य पत्रकार असे आहेत जे अंधारातून पाकीट न घेता इमाने इतबारे सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लेखणीच्या माध्यमातून सडेतोड लिखाण करत असतात. पत्रकारिता करत असतांनाच आपल्या छोट्या मोठ्या व्यवसायातून कसा बसा आपला प्रपंच चालवत असतात. आपल्या नि:पक्ष, निर्भीड आणि रोखठोक लिखाणामुळे आजही अनेक पत्रकारांनी समाजामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.
ज्या पत्रकारांना कायम रोखठोक लिखाणाची सवय आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी समाज हित सोडून ते लिखाण करू शकत नाहीत, अर्थातच सत्य निर्भीडपणे मांडतांना ते कचरत नाहीत. जनहितासाठी जे दिसेल ते लिहायचे, परखड लेखणीमळे अशा पत्रकारांना साहजिकच लोकांमध्ये एक वेगळे स्थान प्राप्त होते. स्वत:हून तसे प्रयत्न नाही केले तरी काही प्रमाणात का असेना अशा पत्रकारांचे नाव शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात आणि कधी कधी राज्यात सुध्दा होत असते. विविध क्षेत्रातील मान्यवर असो किंवा सर्वसामान्य जनता असो अशा पत्रकारांना महत्व देत असते. अर्थातच तो त्यांचा मोठेपणा म्हणता येईल. अशावेळी इतर कोणाला सदरील पत्रकाराचे वाढते महत्व खटकणे आपण समजू शकतोत, परंतू जर पत्रकारिता क्षेत्रातीलच कोणाच्या पोटात दुखत असेल, विनाकारण मुळव्याध उठत असेल तर हे चिंताजनकच म्हणावे लागेल.
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही..
सारी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए..
पत्रकारिता क्षेत्रातील शकुनीमामा !
एखाद्या चांगल्या पत्रकाराचे नाव किंवा स्तुती ऐकून दुसऱ्या एखाद्या पत्रकाराला ठीक न वाटणे इथपर्यंत आपण समजू शकतो, परंतू वर्षानुवर्षे पडद्यामागून कट कारस्थान रचण्यात सहभागी होणारा, आपल्याच चांगल्या पत्रकाराचा कार्यक्रम लागावा या जळावू वृत्तीतून चांगल्या पत्रकार बांधवांशी गद्दारी करणाऱ्या कुण्या पत्रकाराचा (?) खरा चेहरा समोर येत असेल तर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. खरं तर असा व्यक्ती पत्रकार म्हणण्याच्या लायकीचाच नाही असेही म्हणता येईल. अर्थातच असेच काही पडद्यामागे लपलेले, कट कारस्थानात सहभागी असलेले पत्रकारिता क्षेत्रातील शकुनीमामा (गद्दार) एक एक करून उघडे पडू लागले आहेत.
हम तो समझते थे की, पीठ पीछे साजिश करनेवाले पराये होते है, लेकीन देर से मालूम पडा की, गद्दारी करनेवाला तो अपनों में से ही कोई एक था !
पत्रकारिता क्षेत्रातील तशा शकुनीमामा उर्फ गद्दार व्यक्तीला पत्रकार म्हणणेच मुळात चुकीचे वाटत आहे. पत्रकारिता क्षेत्रात बहुतांश चागली माणसं आहेत, सहकार्य करणारे अनेक बांधव आहेत, अडीअडचणीत साथ देणारे सुध्दा आहेत, मात्र या क्षेत्रात पडद्यामागे लपलेले काही शकुनीमामा किंवा गद्दार सुध्दा आहेत. अर्थातच या क्षेत्रात गद्दारांची संख्या सुध्दा वाढत आहे हे दुर्दैवाने नमूद करावे लागत आहे. हा विषय कुठल्या एका ठिकाणचा मुळीच नाही. सदरील झारीतले शुक्राचार्य उर्फ शकुनीमामा ऊर्फ गद्दार व्यक्ती जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात आणि गावात सुध्दा असू शकतात.
पडद्यामागे लपलेला व कटकारस्थानात सहभागी असलेला तो शकुनीमामा उर्फ गद्दार व्यक्ती सहजासहजी लक्षात येत नाही. विशेष म्हणजे त्या गद्दार व्यक्तीला इतर चांगल्या पत्रकारांनी कधीही त्रास दिलेला नसतो, कधीही त्याच्या बद्दल कुठे वाईट शब्दही उच्चारलेले नसतात, कधी त्याला कमीपणा वाटेल असेही काही केलेले नसते, एवढंच काय तर त्याला वारंवार सहकार्य केलेले असते परंतू तरीही तो गद्दार व्यक्ती गद्दारी करतो, कारण त्याला वाटत असते की, फक्त मीच भारी पत्रकार, मीच सर्वोत्तम पत्रकार, मलाच सगळं कळतं, सर्वांनी फक्त माझीच उदो उदो करावी आणि जर तसे होत नसेल तर तो इतर चांगल्या पत्रकारांचे खच्चीकरण करण्यात आणि कटकारस्थान रचण्यात सहभागी होतो आणि गद्दारी करतो.
शकुनीमामाचे काही अवगुण !
पत्रकारिता क्षेत्रात अनेक चांगले पत्रकार आहेत ज्यामध्ये सामान्य बातम्या घेणारेही आहेत, तिखट बातम्या घेणारेही आहेत, निर्भीड व रोखठोक बातम्या घेणारेही आहेत, त्यात काही गैर नाही. परंतू गद्दार शकुनीमामाचे तसे नाही, तो फक्त ज्याने अंधारातून पाकीट दिले किंवा खिसा गरम केला त्याच्याच उदो उदो करणाऱ्या अधिक बातम्या घेत असतो किंवा पांचट बातम्यांमध्ये त्याला अधिक रस असते. त्याने लेखणी दुसऱ्याच्या दावनीला बांधलेली असते. तिखट बातमी तर त्याने आयुष्यात लिहीलेली नसते. रोखठोक, निर्भीड बातम्या तर आयुष्यात लिहायच्याच नाहीत हे त्याने जाणीवपूर्वक ठरवलेले असते. कारण सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या रोखठोक, निर्भीड आणि सडेतोड बातम्या लिहीण्यासाठी त्या गद्दाराच्या पृष्ठभागात दमच नसतो.
सदरील शकुनीमामा उर्फ गद्दार जेव्हा त्याच्या मनासारखे होत नाही तेव्हा तो इतर चांगल्या पत्रकारांचा कार्यक्रम कसा करायचा ? काहीही चूक नसतांना चांगल्या पत्रकाराला अडचणीत कसे आणायचं ? त्याला एकटं कसं पाडायचं ? त्याच्या विषयी नकारात्मक वातावरण कसं तयार करायचं ? चक्रव्युहात कसं अडकवायचं ? अशा अनेक गोष्टी व कटकारस्थान रचण्याचा या शकुनीमामा उर्फ गद्दाराचा प्रयत्न असतो.
शकुनीमामाची सवय !
राजकीय नेते असो, लोकप्रतिनिधी असो, अधिकारी असो किंवा इतर क्षेत्रातील व्यक्ती असो त्यांच्याकडे हा शकुनीमामा उर्फ गद्दार चांगल्या पत्रकारांविषयी नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो, इतर चांगले पत्रकार वाईट आणि मीच सर्वात भारी आणि तुमच्या कामाचा पत्रकार आहे असे भासवण्याचा प्रयत्न करत असतो. अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा नेत्याकडे चांगल्या पत्रकाराचा विषय निघाल्यास काहीतरी संशयास्पद वाक्य बोलून काहीही नसतांना संशय निर्माण करण्याचा आणि खच्चीकरण करण्याचा या शकुनीमामा उर्फ गद्दाराचा प्रयत्न करतो. म्हणजेच संबंधित राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, अधिकारी व इतर क्षेत्रारातील मान्यवरांसमोर चांगल्या पत्रकाराचे महत्व कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो.
पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रकार !
सदरील शकुनीमामा हा वर्षानुवर्षे चांगल्या पत्रकारांचे खच्चीकरण करण्यात मग्न तर होताच परंतू आता या शकुनीमामा ने कटकारस्थानाच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. चांगल्या पत्रकारांनी ज्या व्यक्ती किंवा व्यक्तीं विषयी रोखठोक बातमी घेतली आहे आता त्यांच्या बैठकांमध्ये हा शकुनीमामा गुपचुपपणे सामिल होवू लागला आहे, त्यांना चांगल्या पत्रकारांचे वाईट कसे करायचे याचे धडे देवू लागला आहे. स्वत:ही कटकारस्थान रचत होताच परंतू इतरांच्या कटकारस्थानात सुध्दा सहभागी होवू लागला आहे. अर्थातच याबदल्यात समोरच्या व्यक्तीकडून गोडगोड बोलून आणि मी तुमचाच असल्याचे भासवून स्वत:चे खिसे गरम करू लागला आहे.
पडद्यामागून कटकारस्थान !
सदरील शकुनीमामा उर्फ गद्दाराच्या पृष्ठभागात दम नसल्यामुळे तो स्वत:समोर अनेक मोहरे उभे करून त्यांच्या मागे लपलेला असतो, त्यामळे तो सहजासहजी दिसत नाही, कटकारस्थान उघड झालेच तर आपल्या समोर उभे राहिलेले मोहरे किंवा व्यक्तींचे नाव येईल अशी त्याची कपटनिती असते. वर्षानुवर्षे इतर चांगल्या पत्रकारांचे खच्चीकरण आणि त्यांच्या विरूध्द कटकारस्थान रचणाऱ्या अशा शकुनीमामा उर्फ गद्दारांचे पितळ आता उघडे पडू लागले आहेत.
जैसे ज्याचे कर्म…
शकुनीमामा उर्फ गद्दार एक गोष्ट विसरला असावा की, “जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर” म्हणजेच ज्याने जसे कर्म केले आहेत त्यानुसार त्याला फळ मिळेल, मग चांगले कर्म केले असतील तर चांगले होईल आणि वाईट कर्म केले असतील तर वाईट परिणामही भोगावे लागतात.
शकुनीमामाने लक्षात ठेवावं !
चांगल्या पत्रकारांचे कायम वाईट व्हावे अशी मानसिकता ठेवणाऱ्या, नेहमी कटकारस्थान, खच्चीकरण आणि लावालावी करणाऱ्या शकुनीमामा उर्फ गद्दाराने एक गोष्ट लक्षात ठेवावं की, काळ कोणालाही माफ करत नाही, आज जी परिस्थिती आहे ती उद्या राहीलच याची शाश्वती कोणीही देवू शकत नाही. आज शकुनीमामा उर्फ गद्दार आपल्याच पत्रकारांचा कार्यक्रम लागावा ही संकुचित मानसिकता ठेवून गद्दारी करत असेल, आपल्या पत्रकार बांधवांविषयी कटकारस्थान रचत असेल, लावालावी करत असेल, त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी की, खोटा मुखवटा बाजूला होवून खरा चेहरा समोर येण्यास थोडा उशीर लागतो परंतू सत्य समोर येतच असते, पितळ उघडे पडतच असते.
तेव्हा काय करणार ?
ज्या त्या ठिकाणी स्थानिक व परिसरातील पत्रकारांना शकुनीमामा उर्फ गद्दाराचा खरा चेहरा कळेल तेव्हा या गद्दाराला ते माफ करतील का ? शकुनीमामा उर्फ गद्दार अडचणीत सापडल्यावर इतर चांगले पत्रकार मदतीला धावून येतील का ? कुठल्याही चौकात एकटा उभा राहण्याची या शकुनीमामाची हिंमत नाही मग अडचणीच्या काळात कोणाच्या नावाने बोंबलणार ? शकुनीमामाला कपटनिती, खच्चीकरण आणि कटकारस्थानाचा मुळव्याध एवढा भयंकर झाला आहे की, पृष्ठभागात दमच राहिला नाही, त्यामुळे जनतेवर होणाऱ्या अन्यायाचं तर सोडाच स्वत:वरही एखाद्यावेळी अन्याय झाला तर रोखठोकपणे हा शब्दही लिहू शकत नाही.
…तर सहन होणार नाही !
पत्रकारिता क्षेत्रातील शकुनीमामाचा लावालावीसह कटकारस्थानाचा मुळव्याध जास्तच वाढला असेल तर, त्याला तिखट मिरचीची आग सहन होणार नाही ! शकुनीमामा उर्फ गद्दाराने पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्यावी की, दुसऱ्या चांगल्या पत्रकारांचा कार्यक्रम लावण्याच्या नादात स्वत:चाही कार्यक्रम लागू शकतो. शकुनीमामा उर्फ गद्दाराने वेळोवेळी जळावू वृत्तीतून कपटनिती, खच्चीकरण आणि कटकारस्थानाच्या माध्यमातून चांगल्या पत्रकारांना चक्रव्युहात अडकवण्याचा गुप्तपणे प्रयत्न केलेला आहे, परंतू आजच्या काळात इमाने इतबारे काम करणारे निर्भीड पत्रकार हे आधुनिक अभिमन्यू आहेत, एक तर ते चक्रव्युहात अडकत नाहीत आणि अडकलेच तर चक्रव्युहातून बाहेर कसं पडायचं आणि बाहेर आल्यावर कायदेशीर मार्गानेच शकुनीमामाला गार कसं करायचं याचं आधुनिक ज्ञान त्यांना नक्कीच आहे. अर्थातच कितीही कटकारस्थान, खच्चीकरण आणि खोट्याचा बाजार मांडून नकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला तरी विजय हा सत्याचाच होत असतो यात तिळमात्र शंका नाही.
पत्रकारितेला नुकसान !
पत्रकार हे स्वत: साठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत असतात. नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी प्रयत्नशील असतात. परंतू पत्रकारिता क्षेत्रात असलेल्या काही संकुचित वृत्तीच्या शकुनीमामा मुळे चांगल्या पत्रकारांसमोर नाहक अडथळे निर्माण होत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत होण्याऐवजी असल्या शकुनीमामांमुळे कमकुवत होत चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या दृष्टीने सर्वांनी वेळीच असल्या शकुनीमामाला ओळखणे क्रमप्राप्त झाले आहे.
आधीच पत्रकार तापलेले !
वर्षानुवर्षे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे पत्रकार स्वत:च अन्यायग्रस्त झाले आहेत. शासनाचा कुठलाही लाभ नाही, कुठलीही पगार नाही, कुठलाही लाभ नाही. उलट या पत्रकारांना कुटुंबाचा प्रपंच, मुला-बाळांचे शिक्षण, सुख- दु:ख, आरोग्यावर होणारा खर्च अशा अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. छोटा मोठा व्यवसाय करून ते आपला प्रपंच चालवत असतात. तारेवरची कसरत असली तरीही समाजसेवेचा किडा वळवळ करतो म्हणून लेखणीच्या माध्यमातून पत्रकारिता सुरू असते. अशातच जर कुण्या शकुनीमामाचे जळावू वृत्तीचे कारनामे समोर येत असतील तर ते कदापी सहन करण्यासारखे नाही.
चांगले पत्रकार मिंधे नाहीत !
विशेष म्हणजे इमाने इतबारे काम करणारे निर्भीड पत्रकार अंधारातून काही घेतही नाही, त्यामुळे ते कोणाचे मिंधे नाहीत. ही बाब सुध्दा शकुनीमामाला खटकत असते. कारण शकुनीमामा मिळेल तेथे तोंड मारीत असतो. शकुनीमामाला गोड गोड बोलून लुटायची सवय तर असतेच बाकी त्याने कोणाचे पाय चाटायचे ते चाटावे, आणि कोणाला उरावर घ्यायचं ते घ्यावं, पण विनाकारण चांगल्या पत्रकारांच्या नादी लागणार असेल तर तो अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. कारण खोदत राहिल्यास बरंच काही बाहेर निघत असतं.
आग लगानेवालो को
कहां खबर…
रूख हवाओं ने बदला
तो खाक वो भी होंगे…
उघडं करायला वेळ लागणार नाही !
एक तर ओठ पण आपले आणि दात पण आपलेच, म्हणून चांगले पत्रकार हे शकुनीमामाच्या पडद्यामागील कटकारस्थानाकडे दुर्लक्ष करत आलेत, परंतू जर पाणी डोक्यावरून जात असेल तर नाईलाजाने पत्रकारितेतल्या तशा शकुनीमामाला लेखणीच्या माध्यमातून उघडं पाडावं लागेल. वेळ पडली तर नावासह उघडं करायलाही अडचण नाही. बाकी त्या शकुनीमामाचा ब्रॅंड लहान आहे की मोठा आहे किंवा त्याच्या मागे कोणती शक्ती आहे याच्याने चांगल्या व निर्भीड पत्रकारांना काहीही फरक पडत नाही.
उसूलों पे जहाँ आँच आये टकराना ज़रूरी है..
जो ज़िन्दा हों तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है..
पर्याय एकच !
ज्या ठिकाणी असे शकुनीमामा असतील त्यांनी तात्काळ स्वत:ची चूक मान्य करून त्याने ज्या चांगल्या पत्रकारांविषयी कटकारस्थान रचले, लावालावी केली, नकारात्मक वातावरण तयार करण्याचा आणि खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला त्या पत्रकारांची तात्काळ भेट घेवून माफी मागावी आणि भविष्यात चुकूनही असा प्रकार होणार नाही याची हमी द्यावी. कदाचित चांगले पत्रकार या शकुनीमामाच्या माफीचा विचार करतील. नसता त्याने लावालावी, खच्चीकरण, नकारात्मक वातावरण व कटकारस्थानाची आग ज्यांच्या घराला लावण्याचा प्रयत्न केला, आता तीच आग उलट्या दिशेनं वारं फिरल्यामुळे रौद्र रूप धारण करून शकुनीमामाला घेऱ्यात घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की.
परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज
9890515043
पत्रकार बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी हा आर्टीकल शक्य झाल्यास महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांना आणि विविध ग्रुप मध्ये आवश्य शेअर करावा ही विनंती.