एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यात हर घर जल घोटाळा एल्गार न्यूजने उघड केल्यानंतर चौकशीची सुरूवात म्हणून कुंभार पिंपळगांव येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक एल.बी.बारगिरे यांनी भेट देवून पाहणी केली आहे.
[ भाग – ६ ]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यात शेकडो गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने लग्नात बुंदी वाटल्याप्रमाणे हर घर जल प्रमाणपत्र जारी करून संबंधित गावांना कागदोपत्रीच पाणी पाजले आहे. विशेष म्हणजे त्या गावातील नागरिकांना नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा तर सोडाच गावात पाईपलाईनचे पाईपच टाकण्यात आलेले नाहीत, त्यामुळे नळ कनेक्शनचा आणि पाण्याचा प्रश्नच येत नाही.
नियम काय ?
कोणतीही पाणी पुरवठा योजना असो, जो पर्यंत संबंधित गावात प्रत्येक कुटुंबाला (१०० % नागरिकांना) नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा होत नाही आणि इतर नियमांची पूर्तता होत नाही तो पर्यंत अशा प्रकारे “हर घर जल गांव प्रमाणपत्र” देताच येत नाही अर्थातच हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुध्दा स्पष्ट केले आहे. मात्र संबंधित उपअभियंता यांनी (कार्यकारी अभियंत्यांच्या आशिर्वादाने) हर घर जल गांव प्रमाणपत्र असे जारी केले जसे लग्नात सरसकट बुंदी वाटली जाते. आश्चर्य म्हणजे ज्या गावांना सदरील प्रमाणपत्र जारी करण्यात आले त्या गावात नागरिकांना पाणी पुरवठा योजनेतून अद्याप थेंबभर पाणीही मिळाले नाही. एवढं कमी होतं की काय संबंधित पाणी पुरवठा विभागाने हे प्रमाणपत्र शासनाच्या वेबसाईटवर सुध्दा अपलोड करून गावाला हर घर जल घोषित करून टाकले आहे.
कुंभार पिंपळगांवात काम अर्धवट !
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे जलजीवन योजने अंतर्गत जवळपास २ कोटीची योजना मंजूर आहे. या योजने अंतर्गत गावातील प्रत्येक नागरिकाला (१०० % कुटुंबाला) नळ कनेक्शनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. कामाचा कालवधी ५४५ दिवस म्हणजेच दिड वर्षाचा होता, परंतू २ वर्षे उलटूनही सदरील योजने अंतर्गत काम अर्धवट सुध्दा झालेले नाही, गेल्या अनेक महिन्यांपासून काम बंद आहे. योजने अंतर्गत फक्त गावाच्या बाहेरील थोडेफार काम झालेले आहे, गावात अद्याप योजने अंतर्गत १ पाईप सुध्दा टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे नळ कनेक्नशन द्वारे पाणी पुरवठा होण्याचा प्रश्नच येत नाही.
प्रमाणपत्र दिलेच कसे ?
कुंभार पिंपळगांवात अद्याप जलजीवन योजने अंतर्गत थेंबभर पाणीही मिळालेले नसतांना जि.प.पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता यांनी थेट हर घर जल गांव प्रमाणपत्र जारी करून टाकले, एवढं कमी होतं की काय ग्रामपंचायतने सुध्दा संमती देत प्रत्येक घराला पाणी पुरवठा होत असल्याचा ठराव देवून टाकला आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठा विभागाने हर घर जल घोषित करून कागदपत्रे शासनाकडे ऑनलाईन सादर केली आहेत. अर्थातच योजने अंतर्गत कुंभार पिंपळगावाला थेंबभर पाणीही मिळालेले नसतांना किंवा गावात पाईपलाईनचे एक पाईप सुध्दा टाकलेले नसतांना पाणी पुरवठा विभागाने कुंभार पिंपळगांवला हर घर जल गांव घोषित केलेच कसे ? ग्रामपंचायतने सुध्दा प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शनच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत असल्याबाबत ग्रामसभेचा ठराव दिलाच कसा ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
एल्गार न्यूजने घोटाळा केला उघड !
हर घर जल घोटाळा झाल्याबाबत जालना जिल्ह्यात सर्वात प्रथम एल्गार न्यूजने बातमी घेवून हर घर जल घोटाळा उघड केला आहे. यामध्ये कुंभार पिंपळगांवचा देखील समावेश आहे. एल्गार न्यूजने घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील हर घर जल महाघोटाळ्या बद्दल आतापर्यंत ५ भाग प्रकाशित करून सत्य परिस्थिती समोर आणली आहे.
बातम्यांची दखल !
एल्गार न्यूजने रोखठोक शब्दात हर घर जल महाघोटाळा उघड करून सत्य परिस्थिती समोर आणल्यानंतर तसेच कुंभार पिंपळगांव येथील सुध्दा वस्तुस्थिती मांडल्यानंतर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक एल.बी.बारगिरे यांनी दि.७ रोजी गावाला भेट देवून पाहणी केली. एल्गार न्यूजच्या बातमीची दखल घेवून गावाला भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. पाहणी मध्ये आढळून आलेल्या गोष्टी तुर्तास सांगू शकत नाही, परंतू सदरील अहवाल नव्याने जॉईन होणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणार असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
दौऱ्याबद्दल गोपनीयता !
उपमुख्य कार्यकारी अधिकारी एल.बी.बारगिरे यांनी दि.७ रोजी कुंभार पिंपळगावला भेट देवून पाहणी केली, मात्र याबद्दल त्यांनी गोपनीयता ठेवून माहिती घेतली. त्यांच्या दौऱ्याची गावात कोणालाही कल्पना नव्हती. मात्र दौऱ्याबाबत संबंधित उपअभियंता किंवा ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) यांना कल्पना असावी असा अंदाज आहे.
CEO यांच्याकडून अपेक्षा !
नव्याने जॉईन होणारे सीईओ जगदीश मिनीयार यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यात झालेल्या या हर घर जल महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि जिल्ह्यातील लाखो नागरिकांवर झालेला अन्याय दूर करून पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी करावी अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे.