एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या द्वारे सुरू असलेल्या लढ्याला यश आले असून सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याने समाजात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
सरकारने मागण्या मान्य केल्या बाबत तसेच अध्यादेशाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराट सभेत मनोज जरांगे पाटील यांना दिली. यावेळी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. सगळीकडे एक मराठा लाखा मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेले होते, मराठा समाज बांधवांनी यावेळी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी बोलतांना सांगितले की, आरक्षणासाठी 300 पेक्षा जास्त बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. अनेक महिने मराठा बांधवांनी संघर्ष केल्यानंतर हा विजय झाला आहे. शासनाकडून नियुक्त समितीला 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. शासनाने 1884 चे गॅझेट शिंदे समितीकडे देवून त्या दृष्टीने ते सुध्दा लागू करावे.
गेल्या साडेचार महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. सरकारने शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ द्यावी. जेणेकरून गोरगरीब मराठ्यांचं चांगलं होईल. मुख्यमंत्र्यांनी सग्यासोयऱ्या बाबत अध्यादेश काढल्याने त्यांचे आभारही मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी वाद होवू देणार नाही असेही सांगितले.
सरकारने आंतरवाली सराटीसह राज्यातील मराठा समाजावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ओबीसी समाजाला सवलती आहेत त्या मराठा समाजाला देण्याचे सरकारने मान्य केले आहे. मराठ्यांनी उधळलेल्या गुलालाचं अपमान होवू देवू नका अशी मुख्यमंत्र्यांना विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केली.
शपथ पूर्ण केली – शिंदे
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम सर्व मराठा बांधवांचे अभिनंदन केले, तसेच आरक्षणासाठी आपण घेतलेली शपथ पूर्ण केल्याचे प्रतिपादन केले. मराठा समाजाने शांततेत आंदोलन केले, संपूर्ण देशाचे लक्ष या आंदोलनाकडे होते.
आज हा ऐतिहासिक क्षण आहे. आमचे मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय आहे. मनोज जरांगे हे संघर्षयोद्धा आहेत. समाजाने गालबोट न लागता आंदोलन केले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. आजचा दिवस मराठा बांधवाच्या विजयाचा दिवस आहे. सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
इतरही महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.