एल्गार न्यूज :-
एखादा कर्मचारी कधी काय करेल सांगता येत नाही, अनेकवेळा तर न घेताही काही जण शुध्दीवर नसतात, आता जो शेतकरी बेजार झाला आहे त्याला तलाठ्याच्या एका चुकीमुळे वारंवार चकरा मारणे भाग पडत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील घोन्सी तांडा नं.1 मधील विनायक सखाराम राठोड यांच्या वडीलांनी त्यांच्या नावावर असलेल्या 1 हे. 50 जमिनीपैकी 80 आर. जमीन सुनेच्या म्हणजेच तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी तुषार गायकवाड यांच्याकडे फेर करण्यासाठी दिले होते.
मात्र सदरील तलाठी शुध्दीवर होते की नाही माहित नाही, पण वाटणीपत्र 1 हेक्टर 50 आर. करण्याऐवजी 0 हे. 50 जमिनीतून 0 हे. 80 आर जमीन वाटून दिली आहे. म्हणजेच फेरवर तशी नोंद झाली आहे. त्यामुळे तक्रारदार यांना वैयक्तिक व कर्जप्रकरणात अडचणी येत आहेत.
आता सर्वांना प्रश्न पडला आहे की, हे कोणते गणित आहे की, 50 आर मधून 80 आर. जमीन कशी वाटून देता येईल ? तलाठ्यांनी नवीन गणित फॉर्म्यूला शोधून काढलाय की काय असा प्रश्न पडू लागला आहे. तलाठ्याच्या एका चुकीमुळे तक्रारदाराला विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
Talathi Mistake in Ferfar
तक्रारदार यांच्या मुलीचे लग्न असून त्यांना बँकेतून कर्ज काढणे आवश्यक झाले आहे मात्र सदरील चुकीमुळे कर्ज मिळेणासे झाले आहे. त्यामुळे बेजार होवून अखेर सदरील तक्रार विनायक राठोड यांनी तहसिलदार घनसावंगी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून सदरील दुरूस्ती तात्काळ करून देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्याला विनाकारण त्रास !
तलाठ्याच्या एका चुकीमुळे सदरील शेतकरी बांधवाला विनाकारण विविध ठिकाणी चकरा माराव्या लागत आहे, सदरील तलाठ्याने कर्तव्य आणि जबाबदारीचे भान ठेवून काम केले असते तर आज या शेतकऱ्याला एवढ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ आली नसती.
त्यामुळे संबंधित प्रकरणात तहसिलदार यांनी तातडीने संबंधित तलाठ्याला झालेल्या चुकीची दुरूस्ती करण्याचे आदेश देवून शेतकऱ्याला दिलासा द्यावा शिवाय झालेल्या चुकीबद्दल संबंधित तलाठ्यावर योग्य ती कार्यवाही सुध्दा करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.