Your Alt Text

छत्रपती संभाजीनगर – परभणी व अंबड – पोहरादेवी एसटी बस सेवा सुरू ! ग्रामविकास युवा मंचच्‍या वतीने चालक- वाहकांचा सत्कार

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कुंभार पिंपळगाव तसेच श्रीसमर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान असलेल्या जांबसमर्थ या गावी अनेक भक्तगण दर्शनासाठी या मार्गाने परिसरात येत असतात. परंतू या मार्गावर लांब पल्ल्याची एसटी बस सेवा नसल्यामुळे भक्तगण व प्रवाशी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती, त्यामुळे या मार्गावर छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक ०१ ची छत्रपती संभाजीनगर – परभणी ही एसटी बस सेवा सुरु करुन भक्त गण व प्रवाशी यांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामविकास युवा मंच च्‍या वतीने विभाग नियंत्रक यांच्‍याकडे करण्‍यात आली होती.

छत्रपती संभाजीनगर – परभणी बस सुरू !

प्रवासी व ग्रामविकास युवा मंच यांची मागणी लक्षात घेवून विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी छत्रपती संभाजीनगर विभागा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक ०१ ची छत्रपती संभाजीनगर – परभणी या एसटी बस सेवेचा शुभारंभ करुन या भागातील भक्त गण व प्रवाशी यांची गैरसोय दूर करून दिलासा दिला, त्‍याबद्दल या भागातील भक्तगण व प्रवाशी यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक ०१ चे आगार प्रमुख निलीमा ईसे, विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकारी संतोष घाणे, सहायक वाहतूक अधिकारी संतोष पोपळघट यांचे आभार मानले.

छत्रपती संभाजीनगर – परभणी ही एसटी बस सेवा सकाळी ०८:०० वाजता छत्रपती संभाजीनगर आगार क्र.०१ मधुन सुटेल व मार्गे आडुळ, रोहिलागड, अंबड, घनसावंगी, म.चिंचोली, कुंभार पिंपळगाव, आष्टी, पाथरी, मानवत, परभणी येथे दुपारी ०२:०० वाजता पोहोचेल. त्यानंतर परभणी येथून दुपारी ०३:०० वाजता याच मार्गाने छत्रपती संभाजीनगर येथे संध्याकाळी ०७:०० वाजता पोहोचेल.

सदरील एसटी बस कुंभार पिंपळगांव स्‍थानकात आल्‍यावर ग्राम विकास युवा मंच चे पदाधिकारी यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर – परभणी या एसटी बस चे चालक के.एस. ढगे व वाहक आर.डी. धापसे यांचा सत्कार करण्यात आला.

अंबड – पोहरादेवी बस सुरू !

घनसावंगी विधानसभा चे आमदार हिकमत उढाण यांच्या प्रयत्‍नाने या तालुक्यातील व परिसरातील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता जालना विभाग अंबड आगाराची अंबड – पोहरादेवी एसटी बस सेवा सुरु झाल्‍याने प्रवाशी व भक्तगण यांची सोय झाली आहे. ही एसटी बस अंबड आगारातून सकाळी ०९:३० वाजता घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, आष्टी, परतूर, मंठा, जिंतूर मार्गे पोहरादेवी संध्याकाळी ०६:०० वाजता पोहोचेल. तसेच पोहरादेवी येथून सकाळी ०७:०० वाजता त्याच मार्गे दुपारी ०३:०० वाजता अंबड येथे पोहोचेल.

सदरील एसटी बस सुरू झाल्‍या बद्दल ग्राम विकास युवा मंच च्या वतीने घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिकमत उढाण, जालना विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ, विभागीय वाहतूक अधिकारी सुरेश टकले, अंबड आगार प्रमुख रणवीर कोळपे, कुंभार पिंपळगाव बसस्थानक चे वाहतूक नियंत्रक अधिकारी अरुण घोगरे यांचे आभार मानण्‍यात आले व अंबड आगाराच्‍या अंबड – पोहरादेवी एसटी बस चे चालक डि.एस.मांगुळकर व वाहक एस.एल. बनकर यांचा सत्कार ग्राम विकास युवा मंच चे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आला. या एसटी बस सेवेचा सर्व प्रवाशी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्राम विकास युवा मंच व रा.प.महामंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर आगाराच्‍या बसेस सुरू व्‍हाव्‍यात !

ग्राम विकास युवा मंच यांच्या वतीने माजलगाव, पाथरी, परतूर, जालना या संबंधित आगार प्रमुख यांना प्रत्यक्ष निवेदन देवून तसेच या भागातील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता या परिसरात आपल्या आगाराची एसटी बस सेवा सुरु करुन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संबंधित आगार प्रमुख यांनी या परिसरात लवकरात लवकर आपल्या मागणीचा विचार करून एसटी बस सेवा सुरु करु असे आश्वासन देण्यात आले आहे.

सदरील दोन्‍ही एसटी बसेसच्‍या चालक, वाहकांच्‍या सत्‍कार प्रसंगी जेष्ठ पत्रकार इब्राहिम पठाण तसेच ग्रामविकास युवा मंचचे प्रकाश बिलोरे भागवत राऊत, अंकुश कंटुले, महारुद्र गबाळे, अलकेश व्यवहारे, वैभव कुलकर्णी, अनिल चिलवंत, योगेश सावंत, महारुद्र टेकाळे, सुनिल बजाज यांच्या सह प्रवाशी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!