एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
टेलिकॉम कंपन्यांच्या मनमर्जीला आता ट्राय (Telecom Regulatory Authority of India) ने काही अंशी का असेना ब्रेक लावले आहे. ज्या ग्राहकांना इंटरनेटची आवश्यकता नाही अशा ग्राहकांना अतिरिक्त पैसे देण्याची आवश्यकता पडणार नाही. कारण ट्रायने व्हॉईस कॉल आणि एसएमएस साठी स्वतंत्र रिचार्ज प्लान उपलब्ध करून देण्याचे आदेश टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत.
सध्याच्या परिस्थितीत टेलिकॉम कंपन्यांच्या मनमर्जीप्रमाणे कोणताही रिचार्ज करायचा असल्यास त्यात कॉल आणि SMS सोबतच इंटरनेटचाही समावेश असतो, इंटरनेटच्या समावेशामुळे रिचार्जची किंमत वाढते. देशात जवळपास १५ कोटी असे ग्राहक आहेत जे सामान्य बेसिक फोन वापरतात किंवा त्यांना इंटरनेटची आवश्यकता नसते, मात्र तरीही पर्याय नसल्याने त्यांना महागडा रिचार्ज करावा लागतो. मात्र आता कंपन्यांना काही प्रमाणात का असेना चाप बसणार आहे.
स्वतंत्र रिचार्ज !
आता पर्यंत सुरू असलेल्या रिचार्ज प्लॅनच्या व्यतिरिक्त टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांसाठी स्वतंत्रपणे कॉल आणि SMS साठी रिचार्ज प्लान सुरू करण्याचे आदेश ट्राय ने दिले आहेत. (ट्राय ही टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवणारी देशाची महत्वपूर्ण संस्था आहे.) यामुळे ग्राहकांना स्वस्तात परवडणारे रिचार्ज उपलब्ध होणार आहेत. कदाचित इतर रिचार्जचे दर सुध्दा कमी होवू शकतात.
१५ कोटी ग्राहक !
देशात तब्बल १५ कोटी ग्राहक असे आहेत जे अजूनही फिचर फोन वापरतात. यामध्ये असंख्य वयस्कर व्यक्तींचा समावेश आहे. शिवाय अनेकांच्या घरी सुध्दा फक्त कॉलिंगच्या दृष्टीने असे फिचर (सामान्य) फोन असतात. विशेष करून ग्रामीण भागात अशा वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. या ग्राहकांना पर्याय नसल्याने नाईलाजाने इंटरनेटचा समावेश असलेला रिचार्ज करावा लागतो, जो की महागडा असतो. मात्र ट्रायने आता या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली असून या ग्राहकांना आता स्वस्तात फक्त कॉल आणि SMS सुविधा असलेला रिचार्ज प्लान उपलब्ध होणार आहे.
२ सिम वापरणाऱ्यांना दिलासा !
अनेकजण असे आहेत जे २ सिमकार्ड वापरतात, मात्र त्यापैकी एक सिमकार्ड फक्त कॉलिंग किंवा फक्त इंटरनेट या दृष्टीने घेतलेला असतो किंवा पर्सनल क्रमांक म्हणून ठेवलेला असतो. अशा ग्राहकांना दोन्ही सिमकार्डला इंटरनेटसह असलेला महागडा रिचार्ज करावा लागतो, अर्थातच नाहक भुर्दंड सोसावा लागतो, मात्र आता स्वस्तात फक्त कॉल आणि SMS साठी स्वतंत्र रिचार्ज येणार असल्याने अशा ग्राहकांना सुध्दा मोठा दिलासा मिळणार आहे.
जास्त दिवसांची व्हॅलिडीटी !
ट्रायने ग्राहकांना पुन्हा एक दिलासा दिला आहे तो म्हणजे ९० दिवसांची रिचार्ज वरील मर्यादा काढून टाकण्यात आल्यामुळे कंपन्यांना ३६५ दिवसांची (१ वर्ष) व्हॅलिडीटी असलेले प्लान सुध्दा सादर करावे लागणार आहेत. ट्रायने एक वर्षाच्या व्हॅलिडीटी बाबत अधिक स्पष्टता दिलेली नसली तरी या रिचार्जमुळे सिमकार्ड लवकर बंद होण्याची चिंता राहणार नाही.
छोटा रिचार्ज !
ट्रायने ग्राहकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने पुन्हा एक आदेश पारीत केला असून या नुसार किमान १० रूपयांचा एक तरी टॉपअप रिचार्ज असावा असेही नमूद केले आहे. अर्थातच काही वर्षांपूर्वी ज्या प्रमाणे छोटा रिचार्ज उपलब्ध होता तसाच रिचार्ज आता उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामळे सर्वसामान्य ग्राहकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
तातडीने अंमलबजावणी !
सदरील निर्णयाची अंमलबजावणी तातडीने होणार असल्याचे कळते, इंटरनेट शिवाय असलेला आणि फक्त कॉल व SMS ची सुविधा असलेला सदरील स्वस्त रिचार्ज प्लान पुढील महिन्यात लॉन्च होईल अशी माहिती आहे. अर्थातच संबंधित टेलिकॉम कंपन्यांना तसे रिचार्ज प्लान उपलब्ध करावे लागणार आहेत. ट्रायकडून टेलिकॉम कंपन्यांसाठी हा मोठा झटका असला तरी या निर्णयामळे देशातील कोट्यावधी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नियमित बातम्यांसाठी एल्गार न्यूजच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा…. किंवा एल्गार न्यूजचा 9890515043 हा क्रमांक तुमच्या व्हाट्सअॅप ग्रुप मध्ये अॅड करा…
