Your Alt Text

महाराष्‍ट्रातील लाखो अंगणवाडी सेविकांसाठी मंजूर केलेल्‍या मोबाईल खरेदीत कोट्यावधींचा घोटाळा ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
राज्‍यातील अंगणवाडी सेविकांना विविध कामे करावी लागतात. महत्‍वाचे म्‍हणजे विविध माहिती संकलीत करून शासनाला पाठवावी लागते, यासाठी शासनाने मागील काळात अंगणवाडी सेविकांना अँड्रॉईड मोबाईल दिले होते, परंतू ते मोबाईल जुने झाले होते व वारंवार हँग होत होते, त्‍यामुळे हैराण झालेल्‍या अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केले होते व नवीन मोबाईल देण्‍याची मागणी केली होती.

अंगणवाडी सेविकांना चांगल्‍या दर्जाचे तसेच आधुनिक व सध्‍याच्‍या तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल मिळणे अपेक्षित होते, जेणेकरून त्‍यांना चांगल्‍या प्रकारे काम करता येईल. शिवाय 5G तंत्रज्ञानाचाही उपयोग घेता येईल. मात्र शासनाच्‍या संबंधित विभागाला अजूनही 5G लॉन्‍च होवून 1 वर्षापेक्षा जास्‍त कालावधी झाल्‍याचे व 5G मोबाईल मार्केट मध्‍ये उपलब्‍ध असल्‍याचे लक्षात राहीले नसावे, त्‍यामुळे कदाचित पुन्‍हा 4G मोबाईलच देण्‍याचा निर्णय झाला आहे.

मोबाईल देण्‍याचा निर्णय !

राज्‍यातील अंगणवाडी सेविका / मुख्‍य सेविका, तांत्रिक मनुष्‍यबळ यांना मोबाईल फोन उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत Gem प्रणालीवर निविदा प्रकाशित करून एका कंपनीचे दर फायनल करून त्‍यास मान्‍यता देण्‍यात आली आहे.

सदरील कंपनीकडून राज्‍यातील अंगणवाडी सेविका / मुख्‍य सेविका, तांत्रिक मनुष्‍यबळ यांना मोबाईल फोन उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दृष्‍टीने Samsung Galaxy A05s या मॉडेलचे 4G नेटवर्क असलेले एकूण 1,14,974 मोबाईल घेण्‍यात येणार असून 13,457.53 प्रति मोबाईल या दराने कंपनीला एकूण 154,72,66,054/- (एकशे चोपन्‍न कोटी, बहात्‍तर लाख, सहासष्‍ट हजार चोपन्‍न रूपये) देण्‍या बाबत शासनाने दि.25 जानेवारी रोजी GR काढून मान्‍यता दिली आहे.

स्‍पष्‍टता नाही !

शासन संबंधित मध्‍यस्‍थ कंपनीकडून जो Samsung Galaxy A05s मोबाईल घेणार आहे, त्‍या एकाच मॉडेचले दोन उपमॉडेल आहेत. शासनाने काढलेल्‍या जीआर मध्‍ये सदरील मोबाईलचे Specification बाबत स्‍पष्‍टता दिलेली नाही. कारण सदरील मोबाईलच्‍या मॉडेल मध्‍ये 2 उपमॉडेल आहेत. ज्‍यामध्‍ये एका उपमॉडेल मध्‍ये 4GB Ram आणि 128 GB स्‍टोरेज आहेत, तर दुसऱ्या उपमॉडेल मध्‍ये 6GB RAM आणि 128 GB स्‍टोरेज आहे. इतर सुविधा दोन्‍ही मध्‍ये सारख्‍यात आहेत. दोन्‍ही पैकी कोणताही उपमॉडेल असेल तरीही अनेक प्रश्‍न अनुत्‍तरीत आहेत.

नेमका घोळ काय ?

शासनाने संबंधित मध्‍यस्‍थ कंपनीला Samsung Galaxy A05s या कंपनीचे प्रति मोबाईल 13457.53 रूपये देण्‍याचे निश्चित केले आहे. मात्र हे दर सध्‍या असलेल्‍या ऑनलाईन दरापेक्षा जास्‍त आहेत. उदाहरणार्थ शासनाने संबंधित कंपनीकडून 4GB Ram आणि 128 GB स्‍टोरेजचे मोबाईल घेतले असतील तर त्‍याचे ऑनलाईन दर 11298 दाखवत आहे, तर 6GB RAM आणि 128 GB स्‍टोरेज असलेल्‍या मोबाईलचे दर 12999 दाखवत आहे.

सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे शासन कोणतीही वस्‍तू खरेदी करतांना मोठ्या संख्‍येने खरेदी करत असते आणि जास्‍त संख्‍या असल्‍यामुळे होलसेल रेट पेक्षाही कमी दरात वस्‍तू मिळत असते. तरीही सदरील मॉडेलच्‍या दोन्‍ही प्रकारातील मोबाईलचे होलसेल दर (DP Rate) जाणून घेतले असता 4GB व 128 मॉडेलचे Approx. दर 10784 असल्‍याची माहिती मिळाली, तर 6GB Ram व 128 स्‍टोरेज असलेल्‍या मॉडेलचे Approx. होलसेल दर 12197 असल्‍याची माहिती मिळाली.

म्‍हणजेच जर शासनाच्‍या संबंधित विभागाने 4GB RAM व 128 स्‍टोरेज असलेला मोबाईल घेण्‍याचा निर्णय घेतला असेल तर तफावत 2673.53 प्रति मोबाईल म्‍हणजेच 114974 मोबाईल x 2673.53 = 307386438.22 (तीस कोटी त्र्याहत्‍तर लाख श्‍याहंशी हजार चारशे अडोतीस रूपये) होतात.

पण आपण असे गृहीत धरू या की शासनाच्‍या संबंधित विभागाने 6GB RAM व 128 GB स्‍टोरेज हा त्‍या मॉडेलचा चांगला हॅण्‍डसेट घेण्‍याचे ठरवले असेल तर सध्‍याचे Approx. होलसेल रेट 12197 आहेत. शासनाने संबंधित कंपनीकडून ज्‍या दरात घेतले आहे ते दर 13457.53 आहे. 13457.53 वजा 12197 = 1260 रूपयाचा फरक येत आहे. म्‍हणजेच 114974 मोबाईल x 1260.53 रूपये = 144928176.22 (चौदा कोटी एकोणपन्‍नास लाख अठ्ठावीस हजार एकशे श्‍याहत्‍तर रूपये) हा फरक येतो, अर्थात प्रथमदर्शनी हा घोळ दिसून येतो.

मध्‍यस्‍थ कंपनीचा फायदा काय ?

वरील दर हे होलसेल रेट आहेत. शासन 1 लाख 14 हजार 974 मोबाईल घेत आहे, त्‍यामुळे एवढ्या संख्‍येने मोबाईल घेतल्‍यास कोणतीही कंपनी होलसेल रेट (DP Rate) पेक्षा किमान 500 रूपये तरी कमी दराने मोबाईलचा पुरवठा करू शकते असे तज्ञांचे मत आहे. मात्र तरीही आपण हा नफा कमीत कमी धरला तरी 500 x 114974 मोबाईल = 5,74,87,000 (पाच कोटी चौऱ्याहत्‍तर लाख सत्‍यांशी हजार) रूपये कंपनीला सर्विस किंवा नफा म्‍हणून मिळू शकतो. त्‍यामुळे वरील होलसेल दरातील फरक सोडून हा वेगळा फरक आहे.

5G ऐवजी 4G मोबाईल का ?

राज्‍यातील लाखो माता भगीनींना चांगल्‍या दर्जाचे व 5G आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत जास्‍त स्‍पीडने चालणारे मोबाईल देणे आवश्‍यक असतांना संबंधित विभागाने 4G मोबाईल ते सुध्‍दा चढ्या दराने घेण्‍याचा निर्णय का घेतला ? विशेष म्‍हणजे ज्‍या किंमतीत मोबाईल खरेदी करण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली त्‍यापेक्षा कमी किंमतीत 5G मोबाईल घेणे शक्‍य होते.

विशेष म्‍हणजे ज्‍या Samsung कंपनीचा Samsung Galaxy A05s हा मोबाईल 13457.53 रूपयात घेण्‍यात आला त्‍यापेक्षा कमी किंमतीत त्‍याच Samsung कंपनीचा Galaxy F14 हा 5G मोबाईल आज रोजी ऑनलाईन 10990 किंमतीत उपलब्‍ध आहे. विशेष म्‍हणजे एकाच वेळी 1 लाखाच्‍या वर मोबाईल होलसेल मध्‍ये घेतल्‍यास हे दर 700 ते 1000 ने कमी होवू शकतात असे तज्ञांचे मत आहे. सदरील मोबाईल मध्‍ये संबंधित मोबाईल पेक्षा कोणत्‍याच सुविधा कमी नाहीत उलट काही सुविधा अधिक आहेत.

सॅमसंग कंपनीचे मोबाईल चांगले असतात असे म्‍हटले जाते, त्‍यामुळे शासनाने सदरील कंपनी निवडली असेल त्‍यासही कोणाची हरकत नाही, परंतू 4G मॉडेल आणि तेही जास्‍त दराने घेणे, विशेष म्‍हणजे प्रथमदर्शनी फरक कोट्यावधी रूपयांचा येत आहे, त्‍यामुळे संगणमत करून एक किंवा अनेकांनी खिसे गरम केल्‍याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

शासनाने जो SAMSUNG Galaxy A05s हा 4G मॉडेल घेण्‍याचे निश्चित केले आहे. त्‍याची थोडक्‍यात माहिती 6GB हा वरचा मॉडेल गृहीत धरून खालील माहिती देत आहोत. ही माहिती पाहील्‍यानंतर यांच कंपनीचा दुसरा मॉडेल व इतर कंपनीचेही काही मॉडेल पाहील्‍यास सर्व काही चित्र समोर येईल.

सॅमसंग सहीत इतरही कंपन्‍यांचे स्‍वस्‍तात 5G मोबाईल !

शासनाने ज्‍या किंमतीत Samsung Galaxy A05s हा मोबाईल 13457.53 रूपयात खरेदी करण्‍यास मान्‍यता दिली आहे त्‍यापेक्षा कमी किंमतीत फक्‍त सॅमसंगच नाही तर इतर अनेक कंपन्‍यांचे 5G मोबाईल स्‍वस्‍तात आज रोजी ऑनलाईन व ऑफलाईन उपलब्‍ध आहेत. आजघडीला ऑनलाईन विविध कंपन्‍यांचे काही 5G मोबाईल, त्‍यांचे दर व इतर माहिती खालील प्रमाणे आहे. विशेष म्‍हणजे खालील दर हे ऑनलाईन किरकोळ दर आहेत, होलसेल दर यापेक्षा बरेच कमी असतात.

SAMSUNG Galaxy F14 – 5G
6 GB RAM | 128 GB ROM | Expandable Upto 1 TB
16.76 cm (6.6 inch) Full HD+ Display
50MP + 2MP
13MP Front Camera
6000 mAh Battery
Online : Rs. 10,990/-


vivo T2x – 5G
6 GB RAM | 128 GB ROM
16.71 cm (6.58 inch) Full HD+ Display
50MP + 2MP Camera
8MP Front Camera
5000 mAh Battery
Online : Rs.12,999/-


POCO X5 – 5G
6 GB RAM | 128 GB ROM | Expandable Upto 1 TB
16.94 cm (6.67 inch) Full HD+ Display
48MP + 8MP + 2MP
13MP Front Camera
5000 mAh Battery
Online : Rs.12,999/-


POCO M6 Pro – 5G
6 GB RAM | 128 GB ROM | Expandable Upto 1 TB
17.25 cm (6.79 inch) Full HD+ Display
50MP + 2MP
8MP Front Camera
5000 mAh Battery
Online : Rs.11,999/-


LAVA Blaze 1X – 5G
6 GB RAM | 128 GB ROM | Expandable Upto 1 TB
16.51 cm (6.5 inch) HD+ Display
50MP + 50MP + 2MP
8MP + 8MP Dual Front Camera
5000 mAh Battery
Online : Rs.11,499/-


REDMI 12 – 5G
6 GB RAM | 128 GB ROM
17.25 cm (6.79 inch) Display
50MP Rear Camera
Front Camera 8 MP
5000 mAh Battery
Online : Rs.13499


LAVA Blaze 2 – 5G
6 GB RAM | 128 GB ROM
16.66 cm (6.56 inch) Full HD+ Display
50MP Rear Camera
8 MP Front Camera
5000 mAh Battery
Online : Rs.11352


घोळ की घोटाळा ?

वर सांगितल्‍या प्रमाणे संबंधित कंपनीच्‍या मॉडेल मधील 4GB/128 आणि 6GB/128 या दोन्‍ही उपमॉडेल पैकी कोणतेही उपमॉडेल घेतले असेल तरीही कोट्यावधींचा फरक येत आहे. एखाद्या छोट्या दुकानदाराने 5 सहा मोबाईल जरी विक्रीसाठी आणले तरी त्‍याला ते होलसेल दरात मिळतात. म्‍हणजेच होलसेल दरात मोबाईल खरेदी केल्‍यावर 4GB/128 मॉडेल घेतले असल्‍यास अंदाजे 30 कोटीपेक्षा जास्‍त व 6GB/128 मोबाईल घेतले असल्‍यास 14 कोटीपेक्षा जास्‍त फरक किंवा घोळ दिसून येत आहे.

सदरील प्रकरणात ऑनलाईन निविदा मागवल्‍या असल्‍या तरी निविदेतील सर्वात कमी दर हे सध्‍या असलेल्‍या होलसेल दरापेक्षा कमी आहेत का हे पाहणे आवश्‍यक नव्‍हते का ? ऑनलाईन निविदा एक किंवा अनेक दाखल करणे खूप मोठी गोष्‍ट आहे का ? निविदा फायनल करतांना मार्केटच्‍या होलसेल दराबाबत माहिती घेण्‍यात आली नाही का ? मोबाईल 4G आहे किंवा 5G आहे हे पाहण्‍यात आले नाही का ? एवढा मोठा घोळ होत असतांना संबंधित अधिकारी काय झोपा काढत होते का ? याचाही तपास होणे आवश्‍यक आहे.

आता शासनाने आणि अंगणवाडी सेविकांसह सर्वसामान्‍य नागरिकांनीच ठरवावे की, हा घोटाळा आहे की घोळ आहे ? संगणमत आहे की कोट्यावधींचा मलिदा लाटण्‍याचा प्रकार आहे ? कोणी एक जण दोषी आहे की अनेकजण दोषी आहेत ? अर्थातच खिसे गरम करण्‍याच्‍या दृष्‍टीने केलेला नियोजनपूर्वक कार्यक्रम दिसून येत आहे… याप्रसंगी CID सिरियल मधील ACP प्रद्युमनचा एक डायलॉग आठवतो… “दया कुछ तो गडबड है…”

प्रकरण गंभीर आहे, त्‍यामुळे शासनाने तात्‍काळ सदरील ऑर्डर थांबवावी व उच्‍चस्‍तरीय चौकशीचे आदेश द्यावेत, यामध्‍ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्‍यक आहे, शिवाय अंगणवाडीच्‍या माता भगीनींना 5G मोबाईलच उपलब्‍ध करून देण्‍याबाबत पुढील कारवाई करणे आवश्‍यक आहे. या बाबतीत तात्‍काळ सखोल चौकशी केल्‍यास अनेक धक्‍कादायक गोष्‍टी समोर येतील यात शंका नाही.

शासनाचा GR पहा…

परवेज पठाण,
संपादक, एल्‍गार न्‍यूज (जालना)

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!