Your Alt Text

सतिश घाटगे यांच्‍या योगदानामुळे उसाचं त्रासदायक राजकारण उध्‍वस्‍त झालंय का ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्‍ह्यातील घनसावंगी मतदारसंघात असलेल्‍या समृध्‍दी साखर कारखान्‍याचे चेअरमन सतिष घाटगे पाटील यांच्‍या बद्दल उसाच्‍या दृष्‍टीकोणातून सध्‍या टिका टिप्‍पणी ऐकायला मिळत आहेत, त्‍यात किती तथ्‍य आहे हे पहावे लागेल परंतू घनसावंगी मतदारसंघातील ऊसाचे त्रासदायक राजकारण उध्‍वस्‍त करण्‍यात त्‍यांचे योगदान विसरता येईल का ? असा सवाल काही ऊस उत्‍पादक शेतकरी उपस्थित करत आहेत.

एक काळ होता की, जेव्‍हा घनसावंगी मतदारसंघात ऊस लावावा किंवा नाही हा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडत होता. त्‍या काळात तर अनेक शेतकऱ्यांनी ऊस न गेल्‍यामुळे हतबल होवून एक तर ऊस जाळून टाकला किंवा तोडून बांधावर फेकून दिला, अर्थातच लाखो रूपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. त्‍या काळात ऊस न गेल्‍यामुळे अक्षरश: अनेक शेतकऱ्यांच्‍या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले.

समर्थ कारखान्‍याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीकडे घेवून जाण्‍यात हातभार लावला आहे याला कोणी नाकारू शकणार नाही. सागरने सुध्‍दा बऱ्याच अंशी दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. मात्र जेव्‍हा ऊसाचे क्षेत्र वाढल्‍यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर होत गेली. त्‍या काळात म्‍हणजेच साधारण १५ वर्षांपूर्वी ऊसाचे क्षेत्र वाढत असतांना मर्जीतल्‍या किंवा समर्थक लोकांचाच ऊस जात असल्‍याचा आरोप होवू लागला. शेतकरी अडचणीत असल्‍याचे लक्षात आले, तेव्‍हा शेतकऱ्यांची हतबलता आणि मानसिक त्रास लक्षात घेवून (व्‍यावसायिक दृष्‍टीकोणातून का असेना) या काळात सतिश घाटगे यांनी समृध्‍दी शुगर्स लि. या खाजगी साखर कारखान्‍याची सुरूवात करून ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला.

असे म्‍हटले जाते की, व्‍यवसायात स्‍पर्धा निर्माण झाल्‍यास ग्राहकांचा फायदा होतो, तशीच काही परिस्थिती समृध्‍दी शुगर्स लि. (साखर कारखाना) ची सुरूवात झाल्‍यानंतर झाली. शेतकऱ्यांना पर्याय निर्माण झाल्‍याने मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवडही झाली, ऊसही जावू लागला आणि ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना उसाच्‍या माध्‍यमातून फायदा होत असल्‍याने त्‍या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्‍यातही मोठा हातभार लागला.

ऊसाचे राजकारण उध्‍वस्‍त !

कितीही नाही म्‍हटले तरी राजकीय दृष्‍ट्या घनसावंगी मतदारसंघात ऊसाचे राजकारण होत आले आहे, ज्‍या नेत्‍याकडे ऊसाचा कारखाना त्‍या नेत्‍याच्‍या मागे इच्‍छा असो किंवा नसो जनतेला जावे लागत होते. ज्‍या नेत्‍याकडे आधीपासून कारखाना आहे त्‍या नेत्‍याच्‍या विरोधात जायचे म्‍हटले की, आपला ऊस जाणार नाही अशी भिती असंख्‍य शेतकऱ्यांच्‍या मनात होती, संबंधित नेत्‍या विरूध्‍द उघडपणे कोणी बोलण्‍यासही कचरत होते.

तरीही गांवनिहाय निवडणुकांमध्‍ये झालेले मतदान, लावालावी करणाऱ्या खबऱ्यांनी दिलेली माहिती या आधारावर कोणत्‍या शेतकऱ्यांचे ऊस घेवून जायचा किंवा टाळायचे याचे नियोजन व्‍हायचे. शेवटी या राजकारणात जो शेतकरी अडकला त्‍याचा ऊस अडचणीत सापडला समजावे लागायचे. अशा काळात समृध्‍दी कारखाना सुरू करून सतिश घाटगे यांनी या उसाच्‍या त्रासदायक राजकारणालाच उध्‍वस्‍त करून ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना मोकळा श्‍वास घेण्‍याची सोय उपलब्‍ध करून दिली अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली आहे.

डॉ.हिकमत उढाण यांचाही हातभार !

घनसावंगी मतदारसंघात समर्थ आणि समृध्‍दी साखर कारखान्‍याच्‍या नंतर डॉ.हिकमत उढाण (आमदार) यांनी ब्‍लयू सफायर हा कारखाना सुरू करून उसाच्‍या राजकारणातून मतदारसंघातील जनतेला बऱ्याच अंशी बाहेर काढण्‍यास हातभार लावला. डॉ.हिकमत उढाण यांनी कारखाना सुरू केल्‍यावर असंख्‍य शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. आता तर डॉ.हिकमत उढाण यांनी कारखान्‍याचे दुसरे युनिट सुरू करण्‍याचे घोषित केले असून वर्षभरात ते सुरू होईल असे सांगितले जात आहे. त्‍यामुळे अर्थातच गाळप क्षमता वाढणार आहे. नुकतंच डॉ.हिकमत उढाण हे आमदार म्‍हणून निवडून आले आहेत, त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून मतदारसंघातील उसाच्‍या प्रश्‍नांसह जनतेच्‍या इतर प्रश्‍नांबाबत नक्‍कीच अपेक्षा आहेत.


हे पण वाचू शकता…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!