एल्गार न्यूज (प्रतिनिधी) :-
घनसावंगी तालुक्यात गोदापात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतुक करणारे वाळू माफीया आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकावर सुध्दा हल्ला करू लागल्यामुळे त्यांना कोणाचाच धाक राहीला नाही का ? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील भादली येथे वाळूचे अवैधरित्या उत्खनन व वाहतुक होत असल्यामुळे अपर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार यांचे पथक बुधवारी रात्री गोदावरी नदी पात्रात कारवाईच्या दृष्टीने गेले होते, यावेळी पथकाने तीन हायवा, ट्रॅक्टरसह एक जेसीबी पकडला, पथक सदरील वाहने घनसावंगी पोलीस ठाण्याकडे घेवून जात असतांना वाळू माफीयांनी पथकावर दगडफेक व लोखंडी रॉडने हल्ला केला.
या हल्ल्यात पथकाच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले तर पथकातील कर्मचारी अक्षय आडेकर हे गंभीर जख्मी झाले आहेत. वाळू माफीयांनी हल्ला करून ताब्यात घेतलेली वाहने पळवून नेली, एक हायवा ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. सदरील प्रकरणात आठ जणांविरूध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील पथकात अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्यासह तहसीलदार योगीता खटावकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी शेख अहमद, अव्वल कारकुन बालाजी पापुलवाड, मंडळ अधिकारी प्रविण गजरे, तलाठी संदिप नरूटे, नितीन काचेवाड, रवी वैद्य, अशोक कमाने, अशोक गायकवाड, अक्षय आडेकर, योगेश कुरेवाड, अनिल बर्डे, जाधव, तांबोळी इत्यादी कर्मचारी होते.
कोणाचाच धाक नाही का ?
ज्या प्रमाणे वाळू माफीया कोणत्याच अधिकाऱ्याला न जुमानता अवैधरित्या बेसुमार वाळू उपसा करून वाहतुक करत आहे ते पाहता वाळूमाफीयांना पोलीस किंवा महसूल प्रशासनाच्या कोणत्याच अधिकाऱ्याचा धाक राहीला नाही का ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. एसपी असो किंवा कलेक्टर आम्ही त्यांना घाबरत नाही उलट सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला घाबरावं जणू याच अविर्भावात ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला करीत असल्याचे दिसत आहे.
खेळ लाखोंचा नव्हे कोटींचा !
गोदापात्रातून अवैधरित्या वाळूचे जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करून हायवा व ट्रॅक्टर इत्यादी लहान मोठ्या वाहनांच्या माध्यमातून वाहतुक करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार हायवा गाडीची एक ट्रीप 20 ते 25 हजारात विक्री होते, एका रात्री एका वाहनाने 2 ट्रीप जरी केल्या तरी जवळपास 50 हजाराची वाळू एक वाहन घेवून जात आहे. म्हणजेच एक वाहन महिन्याला 15 लाखाची वाळू घेवून जात आहे. असे अनेक हायवा व ट्रॅक्टर आहेत, त्यामुळे महिन्याला कोट्यावधीची वाळू अवैधरित्या उत्खनन व वाहतुक केली जात असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिक देत आहेत.
संयुक्त कारवाई का नाही ?
अपर जिल्हाधिकाऱ्यांचे पथक बुधवारी जेव्हा रात्री अंदाजे 11 वाजेच्या सुमारास गोदापात्रात वाळूमाफीयांवर कारवाईसाठी गेले होते त्यावेळेस या पथकासोबत पोलीस का नव्हते ? याआधी जिल्ह्यात घडलेल्या हल्ल्यांच्या घटनांचा विचार करून सुरक्षा का घेण्यात आली नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत घनसावंगी पोलीस ठाण्यास विचारणा केली असता आम्हाला कोणत्याही प्रकारे कारवाईबाबत कळवण्यात आले नव्हते किंवा पोलीस कर्मचारी सोबत द्यावेत म्हणून कल्पनाही देण्यात आली नव्हती असे सांगण्यात आले. त्यामुळे पर्याय असतांनाही पथकाने जीव धोक्यात घालुन कारवाई करण्याचा निर्णय का घेतला ? कारवाई गोपनीय होती तर जिल्हास्तरावरूनच पोलीस कर्मचारी सोबत घेता आले नसते का ? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
प्रशासनाने माहिती लपवली का ?
सदरील घटना 29 फेब्रुवारी रोजी म्हण्जेच बुधवारी रात्री घडली, परंतू माध्यमांना ही माहिती शुक्रवारी आपापल्या स्त्रोतातून मिळाली, यामध्ये तथ्य सुध्दा आहे. त्यामुळे बहुतांश बातम्या शनिवारी प्रकाशित झाल्या. विशेष म्हणजे शनिवारी दिवसभर व रात्री उशीरापर्यंत सुध्दा अनेक अधिकाऱ्यांचे फोन बंद होते तर अनेकांनी फोन उचललेच नाही, मग प्रशासनाकडून पत्रकारांना माहिती देण्यास जाणीवपूर्वक उशीर करण्यात आला का ? आणि जर असे असेल तर का ? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
राजकीय आशिर्वाद आहे का ?
ज्या अविर्वाभावात वाळू माफीया बिनधास्तपणे बेसुमार वाळू उपसा करीत आहेत आणि ज्या प्रमाणे कारवाईची भिती न बाळगता थेट अधिकाऱ्यांवर सुध्दा हल्ले करीत आहेत ते पाहता वाळू माफीयांना कोण्या राजकीय पुढाऱ्यांचा आशिर्वाद आहे का ? राजकीय पुढाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य आहे का ? असा सवालही सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.