Your Alt Text

समर्थ बँकेच्‍या जिओ टॅगिंगच्‍या नव्‍या फतव्‍यामुळे ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना कर्जासाठी अडचण !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
शक्‍यतो ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना पीक कर्ज देणारी बँक म्‍हणून समर्थ बँक परिचित आहे. बँक शाखेच्‍या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना उसावर आधारीत कर्ज दिले जाते, परंतू सध्‍या बँकेच्‍या एका नवीन फतव्‍यामुळे अनेक शेतकरी त्रस्‍त झाल्‍याचे दिसत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे माजी आरोग्‍यमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्‍या अधिपत्‍याखालील समर्थ सहकारी बँकेची शाखा आहे. या शाखेत असंख्‍य शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे ऊस पीकावर कर्ज दिले जाते, मात्र आता बँकेने नवीन फतवा काढल्‍याचे दिसत असून यानुसार शेतकऱ्यांना कर्जासाठी जीओ टॅगिंग असलेला फोटो फाईल सोबत जोडणे आवश्‍यक असल्‍याचे सांगितले जात आहे.

अडचण काय ?

आजकाल असंख्‍य शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल असले तरी अनेक शेतकरी असे आहेत ज्‍यांच्‍याकडे आजही सामान्‍य बेसिक फोन आहेत. जिओ टॅगिंगचा फोटो काढायचा असल्‍यास स्‍मार्टफोन किंवा अँड्रॉईड (स्‍क्रीनटच) मोबाईल असणे आवश्‍यक आहे. मग ज्‍यांच्‍याकडे साधारण बेसिक फोन आहे त्‍यांनी जिओ टॅगिंगचा फोटो काढायचा कसा ? विशेष म्‍हणजे वयस्‍कर व अशिक्षित किंवा अल्‍पशिक्षित शेतकऱ्यांना जिओ टॅगिंग हा शब्‍द सुध्‍दा नवखाच आहे.

शेतकऱ्यांचे मत काय ?

समर्थ बँकेत कर्ज प्रकरणासाठी एवढे कागदपत्र घेतले जातात की कागदपत्र जमा करून करून माणूस बेजार होवून जातो. स्‍वत:चा 7/12, 8 -अ, आधार, पॅनकार्ड, सातबारावर बोजा व इतर कागदपत्रे तसेच 2 ऊस उत्‍पादक असलेलेच जामिनदार, त्‍यांचे सर्व प्रमुख कागदपत्र यासह अनेक कागदपत्र जमा करून आधीच आम्‍ही हैराण होतो, त्‍यात पुन्‍हा आता नवीनच जिओ टॅगिंगचा फतवा काढण्‍यात आला आहे.

एकतर कर्ज प्रकरण दाखल करे पर्यंत अनेक चकरा होतात, त्‍यात बँक वरच्‍या मजल्‍यावर आहे, वर खाली अनेक चकरा मारून वयस्‍कर शेतकरी बेजार होतात, आता बँकेकडून जिओ टॅगिंग असलेले फोटो आणण्‍यासाठी सांगितले आहे, पण आमच्‍याकडे साधा फोन आहे मग आम्‍ही जिओ टॅगिंगचा फोटो काढायचा कसा ? इतर कोणत्‍या माणसाला शोधून त्‍याला जिओ टॅगिंगचा फोटो काढण्‍यासाठी विनवण्‍या करायच्‍या ? असा सवालही शेतकरी करत आहेत.

बँकेचे मत काय ?

कर्ज प्रकरणासाठी अर्ज केलेल्‍या ऊस उत्‍पादक शेतकऱ्याच्‍या शेतात ऊस आहे किंवा नाही याची शहानिशा करण्‍यासाठी जिओ टॅगिंग फोटो सांगितला जातो, परंतू तरीही काही शेतकऱ्यांना फोटो काढणे किंवा उपलब्‍ध करणे शक्‍य नसेल तर त्‍यांनी आम्‍हाला कळवावे यावर योग्‍य तो मार्ग काढून शेतकऱ्यांना सहकार्य केले जाईल असे समर्थ सहकारी बँकेचे कुं.पिंपळगांव शाखा व्‍यवस्‍थापक कल्‍याण आघाव यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची अपेक्षा !

वर्षानुवर्षे शेतकरी समर्थ बँकेतून ऊस पीकावर कर्ज घेत असतात, जिओ टॅगिंगचा फोटो उपलब्‍ध करणे ज्‍या शेतकऱ्यांना शक्‍य नाही त्‍या शेतकऱ्यांच्‍या शेतात बँकेने आपला कर्मचारी पाठवावा सोबतच कर्मचाऱ्याच्‍या माध्‍यमातून जिओ टॅगिंचा फोटो काढून खात्री करून घ्‍यावी. शिवाय कर्ज प्रकरणासाठी लागणारे अनावश्‍यक कागदपत्रे कमी करावेत आणि कोणत्‍याही शिफारशी विना कमी चकरांमध्‍ये कर्ज प्रकरण मंजूर करावे, एवढीच माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी व्‍यक्‍त केली आहे.

तर जामीनदार कसे मिळणार ?

ज्‍या शेतकऱ्याने कर्ज घेतले आहे त्‍याच्‍या आधी जर त्‍याच्‍या जामीनदाराचा ऊस गेल्‍यास आणि त्‍याचे बील आधी आल्‍यास त्‍याच बीलातून कर्जाची रक्‍क्‍कम बँकेकडून वजा केल्‍या जात असल्‍याची तक्रार अनेकदा ऐकायला मिळत आहे. त्‍यामुळे कर्जासाठी जामीन देण्‍यास सुध्‍दा शक्‍यतो कोणी तयार होत नाही असेही शेतकरी सांगत आहेत. त्‍यामुळे बँकेने शेतकऱ्यांच्‍या अडचणी समजून घेत त्‍या दूर करण्‍याचा प्रयत्‍न करणे क्रमप्राप्‍त आहे. कारण चलतीच्‍या काळात माणसं सांभाळली तर पुढील काळात हीच माणसं अर्थातच शेतकरी किंवा ग्राहक कामी येतील एवढे मात्र नक्‍की.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!