एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
ग्रामविकासा मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष महत्व आहे. विशेष करून गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच व उपसरपंच यांना विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आतापर्यंत सरपंच व उपसरपंच यांना शासनाकडून पगार (मानधन) देण्यात येत होते, मात्र ते कमी होते, परंतू आता शासनाने सदरील मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सरपंच व उपसरपंच यांना मानधन वाढीचा व इतर निर्णयाबाबत काहीदिवसांपूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता, आता शासनाने सदरील निर्णयाचा GR काढला असून सरपंच व उपसरपंच यांना पगार (मानधन) वाढीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्थातच या निर्णयाचे सरपंच व उपसरपंच यांनी या स्वागत केले आहे.
पगार किती झाली ?
शासनाने काढलेल्या GR नुसार सरपंच व उपसरपंच यांना पगार (मानधन) वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार 0 ते 2000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंचाला 6 हजार रूपये मानधन मिळणार असून उपसरपंच यांना 2000 रूपये मिळणार आहेत. तसेच 2001 ते 8000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत सरपंचांना 8000 तर उपसरपंच यांना 3000 रूपये मानधन मिळणार आहे. तसेच ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या 8001 पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाला 10,000 तर उपसरपंच यांना 4000 रूपये मानधन मिळणार आहे.
शासन किती टक्के देणार !
शासनाने काढलेल्या GR नुसार सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणाऱ्या पगार (मानधन) मध्ये शासन 75% रक्कम देणार आहे तर उर्वरित 25% रक्कम ही ग्रामपंचायत स्वनिधीतून देण्यात येणार आहे. सदरील निर्णय सर्व ग्रामपंचायतींना लागू असणार आहे.
ग्रामसेवक नव्हे तर…!
ग्रामीण भागात गाव पातळीवर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे पद महत्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील सर्वांगिण व शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांना जोडणारे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे हे महत्वाचे पद व घटक आहे. ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव व ग्रामसभेचे पदसिध्द सचिव म्हणून कामकाज पाहतात.
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदांच्या कामाचे स्वरूप एकच असल्याने सदर दोन्ही पदे एकत्रित करून एकच पद निर्माण करण्याचा निर्णय आता शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करून नवीन नाव निश्चित केले आहे, आता यापुढे ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांना “ग्रामपंचायत अधिकारी” असे संबोधण्यात येणार आहे.