एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
दळणवळणासाठी चांगले रस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे, कमी वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आरामदायी प्रवास करत पोहोचायचे असेल तर चांगले व मजबूत रस्ते असणे नक्कीच गरजेचे आहे यात शंका नाही, परंतू रस्ते चांगले झाले म्हणजे आपल्याला निष्काळजीपणाने वाहने चालवण्याचा परवाना मिळत नाही याचे भान अनेकांना राहीलेले दिसत नाही.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथून अंबड-पाथरी हा महामार्ग गेलेला आहे. मागील काळात या रस्त्याचे काम झाल्यामुळे या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वर्दळ वाढली आहे. अंबडच्या दिशेने अंबडसह छत्रपती संभाजीनगर, जालना, घनसावंगी तालुक्यातील वाहतुक तसेच पाथरी च्या दिशेने पाथरीसह परभणी, पाथरी, नांदेड, माजलगांव, परतूर, आष्टी यासह परिसरातील गावातून मोठ्या प्रमाणावर वाहतुक सुरू आहे.
ऊसाच्या ट्रॉलीमुळे धोका !
सध्या या भागात सर्वात जास्त वर्दळ ही उसाच्या ट्रॅक्टरची आहे, रस्त्यांवर तर ऊसाचे ट्रॅक्टर आहेच सोबतच रस्त्याच्या कडेला जागोजागी ट्रॅक्टर ट्रॉलीसह दिसून येत आहेत. सर्वात घातक म्हणजे ट्रॉलीसह ट्रॅक्टर रात्री रस्त्याच्या कडेला कसेही लावण्यात आहेत. ट्रॅक्टर टॉलीच्या मागील बाजूस रेडियम किंवा लाल पडदा नसल्यामुळे मागील बाजूने येणाऱ्या वाहनांना ट्रॉलीच दिसत नाही.
रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर कुठेही ट्रॅक्टरसह ट्रॉली लावण्यात येत असल्यामुळे याआधी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मोठ्या कर्णकश आवाजात बेजबाबदारपणे ऊसाचे ट्रॅक्टर चालवण्यात येत असल्यामुळेही अपघात वाढत आहेत. ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून नेण्यात येत असून बऱ्याचदा ऊस रस्त्यावर सुध्दा पडत आहे. त्यामुळे अपघताचे प्रमाण वाढत आहे.
वाळूचे ट्रक भरधाव वेगात !
बेकायदेशीरपणे सुरू असलेली वाळूची अवैध वाहतुक राजरोसपणे सुरू आहे. विशष म्हणजे वाळूची अवैध वाहतूक करणारे हायवा किंवा इतर मोठी वाहने भरधाव वेगात जात असल्यामुळे सुध्दा छोट मोठे अपघात घडत आहेत. अक्षरश: निष्काळजीपणा आणि बेदरकारपणे वाहन चालवण्यात येत असल्यामळे नागरिकाना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.
विद्यार्थी व नागरिकांच्या जीवाला धोका !
कोणत्याही प्रकारचे वाहन असो, मग घनसावंगी तालुक्यातून असो किंवा इतर जिल्हा किंवा तालुक्यातून असो, जवळपास सर्वच वाहने भरधाव वेगाने जात आहेत. कुंभार पिंपळगांव शहरातील अंबड पाथरी रोडवर सरस्वती भवन शाळा आहे, तसेच मत्स्योदरी शाळा, महाविद्यालय तसेच शरदचंद्रजी पवार शाळा व इतर शाळा महाविद्यालय याच रोडलगत आहेत.
सदरील शाळा व महाविद्यालयातील हजारो लहान मोठे विद्यार्थी, विद्यार्थीनी याच अंबड पाथरी मार्गावरून शाळेकडे ये-जा करत असतात, मात्र सदरील अंबड पाथरी मार्गावरून 100 किंवा त्यापेक्षा जास्त गतीने वाहने जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
भरधाव वेगाने जाणारी ही वाहने कुंभार पिंपळगांव शहरातून जातांना सुध्दा स्पीड (गती) कमी करत नाहीत, परिणामी नेहमी छोटे मोठे अपघात घडत आहेत, शिवाय विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मागील काळात अनेक नागरिकांना याच रस्त्यावरील वाहनांमुळे जीव गमवावा लागला आहे.
दुचाकी चालकही वेगात !
कुंभार पिंपळगांव शहरातन फक्त मोठी वाहनेच जास्त गतीने जात नाहीत तर काही प्रमाणात दुचाकी किंवा मोटरसायकल सुध्दा भरधाव वेगात जात आहेत. काही युवकांना धुम स्टाईलने वाहने चालवण्यात मजा येत आहे, परंतू त्यांच्या या कृत्यामुळे विदयाथ्र्यांसह इतर नागरिकांच्या जीवाला सुध्दा धोका निर्माण झाला आहे.
गतिरोधक नाही !
कुंभार पिंपळगांवातून भरधाव वेगाने लहान मोठी वाहने जात असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. खरं तर या रस्त्यावर विविध ठिकाणी गतिरोधक असणे आवश्यक आहे, परंतू गतिरोधक बसवण्याबाबत काही नियम असतील तरीही वाहने शहरातून जातांना कमी गतीने जावीत यासाठी काही उपाययोजना करणे नक्कीच गरजेचे आहे.
कारखान्याचे दुर्लक्ष !
ज्या कारखान्यांना ट्रक किंवा ट्रॅक्टर ऊस घेवून जात आहे त्या कारखान्याच्या चेअरमन किंवा संचालकांनी संबंधित ट्रॅक्टर व ट्रक चालकांना क्षमतेपेक्षा जास्त ऊस घेवून जावू नये तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील बाजूस रेडीयम किंवा लांबून नजरेस पडेल असा कपडा लावणे बंधनकारक करणे आणि वेळप्रसंगी कारवाई करणे आवश्यक असतांना तसे होतांना दिसून येत नाही.
यंत्रणेचे दुर्लक्ष !
ट्रॅक्टर मध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची वाहतुक असो, किंवा ट्रॅक्टरच्या मागील बाजूस रेडीयम किंवा लक्षात येईल असा पडदा लावण्याचा विषय असो, कुंभार पिंपळगांव शहरातून 100 किंवा त्यापेक्षा जास्त गतीने वाहने चालवणे असो किंवा नियमांचे पायमल्ली करणे असो, आरटीओ विभाग किंवा घनसावंगी पोलीस ठाण्याच्या वतीने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही.
अनेक बेजबाबदार वाहन चालकांमुळे वारंवार सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे, त्यामुळे आर.टी.ओ. विभाग व घनसावंगी पोलीस ठाण्याच्या वतीने नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे क्रमप्राप्त झाले आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.