एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील ग्रामपंचायतने नागरिकांना मोफत रहिवाशी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे असंख्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत द्वारे ग्रामनिधी अथवा विकास कामे व योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने विविध कागदपत्रांसाठी नागरिकांकडून काही प्रमाणात शुल्क आकारले जाते, मात्र आता ग्रामपंचायतने नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने दि.13 रोजी एक निर्णय घेतला असून त्यानुसार आता नागरिकांना रहिवाशी प्रमाणपत्र मोफत मिळणार आहे.
ग्रामपंचायत द्वारे मोफत रहिवाशी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना कोणतीही फी देण्याची आवश्यकता नाही. अनेकदा शैक्षणिक कार्यायासाठी, मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी, शाळा कॉलेज प्रवेशासाठी, शासकीय कामासाठी, तसेच विविध शासकीय योजनांसाठी ग्रामपंचायतच्या विविध कागदपत्रांची आवश्यकता असते, त्यापैकी रहिवाशी प्रमाणपत्र हा एक महत्वाचा पुरावा असून सदरील रहिवाशी प्रमाणपत्र आता मोफत मिळणार आहे.
सरपंच सौ.संगीता गंगाधर लोंढे यांनी सर्वसामान्य नागरिकांना मोफत रहीवाशी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांसह महिला व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.