एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जांबसमर्थ (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील कॅनरा बँक शाखेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने संबंधितांवर कारवाई करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील कॅनरा बँक शाखे अंतर्गत येणाऱ्या गावनिहाय शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत सदर बँकेचे कार्यरत असलेले शाखा व्यवस्थापक पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. नुकतंच मुख्यमंत्री यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेवून सक्त सूचना केल्या होत्या, त्यानुसार सीबील स्कोरची सक्ती करणार नाही अशी ग्वाही संबंधित बँकर्स समितीने दिली होती, त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आदेशीतही केले आहे.
तसेच बँकांना शेतकऱ्यांना कर्ज नाकारता येणार नसल्याचे खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे, तसेच पीक कर्ज न देणाऱ्या संबंधित बँक व्यवस्थापकावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही जांबसमर्थ येथील कॅनरा बँक शाखेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती वहिती करतांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मागील 2 – 3 महिन्यांपासून केवळ 1 लाख रूपये पीक कर्ज मागणीसाठी परिसरातील शेतकरी जांबसमर्थ येथील कॅनरा बँकेचे उंबरठे झिजवत आहेत, आमच्या हातात काहीच ठेवले नसल्याचे सदर शाखा व्यवस्थापका कडून सांगितले जात आहे, अर्थातच टाळाटाळ केली जात आहे. काही ठराविक शेतकऱ्यांचे कर्ज नवे-जुने केले जात आहे म्हणजेच मागील कर्ज भरणा करून घेतला जातो आणि तेवढीच रक्कम वाटप केली जाते, नव्याने वाढीव रक्कम व नव्याने कर्ज दिल्या जात नाही.
वारंवार बँक शाखेत चकरा मारून शेतकरी हैराण झाले असून आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या संबंधित बँक अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत व शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावेत नसता बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सदरील निवेदन कॅनरा बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक यांना देण्यात आले असून निवेदनादनावर छत्रपती संभाजीनगर शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस सुभाष पांडभरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुधीरकुमार वाघ, तुकाराम साबळे, प्रविण भवर, चित्रभुज आव्हाड, सुभाष शुक्ला, जीवन म्हस्के, कैलास वाघ्रुळकर, कांताबाई अहिरे आदींच्या सह्या आहेत. निवेदनाची प्रत प्रशासनालाही देण्यात आल्याचे दिसून येत आहे.