Your Alt Text

सर्व शाळांना विशेष खबरदारीचे आदेश ! खाजगी शाळांनी एका महिन्‍यात CCTV कॅमेरे बसवावेत, नसता शाळेची मान्‍यता रद्द !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
बदलापूर मधील शाळेत लहान मुलींवर झालेल्‍या अत्‍याचाराचे पडसाद देशभर उमटले असून सर्वत्र हळहळ व्‍यक्‍त होत आहे. विद्यार्थ्‍यांची सुरक्षा धोक्‍यात आल्‍याचे दिसत असल्‍याने पालक वर्गातून संताप व्‍यक्‍त होत आहे. विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने उपाययोजना करणे अत्‍यंत आवश्‍यक आणि क्रमप्राप्‍त झाले आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, विद्यार्थ्‍यांच्‍या विशेष करून लहान विद्यार्थी व विद्यार्थीनींच्‍या सुरेक्षेच्‍या दृष्‍टीने शाळांमध्‍ये सीसीटीव्‍ही कॅमेरे शाळांमध्‍ये बसवणे शासनाने बंधनकारक केले आहे. खाजगी शाळांना तर एक महिन्‍याचा कालावधी देण्‍यात आलेला आहे, या कालावधीत खाजगी शाळांनी CCTV कॅमेरे बसवले नाही तर प्रसंगपरत्‍वे शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्‍यता रद्द करण्‍याचा देखील मार्ग अवलंबिला जाणार आहे. याबाबत शासनाने दि.21 रोजी जीआर काढला आहे.

तर शासकीय व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या ज्‍या शाळांमध्‍ये सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविण्‍यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्‍याने कॅमेरे बसविण्‍याबाबत कार्यवाही करावी, यासाठी जिल्‍हा वार्षिक (सर्वसाधारण) योजना (DPC) अंतर्गत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाशी संबंधित योजनांची पुर्नरचना करून त्‍यासाठी किमान 5 टक्‍के निधी राखीव ठेवण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली आहे. त्‍यातून सीसीटीव्‍ही बसवण्‍यासाठी निधीचा वापर करता येणार असल्‍याचे पत्रकात नमूद करण्‍यात आले आहे. सीसीटीव्‍ही बसवण्‍याचा व इतर उपाययोजनांबाबतचा जीआर दि.21 रोजी काढण्‍यात आला आहे.

फक्‍त CCTV बसवणे पुरेसे नाही !

शासन निर्णयानुसार शाळा व परिसरात फक्‍त सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवणे पुरेसे नसून, ठराविक अंतराने त्‍याचे फुटेज तपासणे देखील आवश्‍यक आहे. सदरील फुटेज मध्‍ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्‍यास त्‍यावर कार्यवाही करण्‍याची जबाबदारी विशेषत्‍वाने मुख्‍याध्‍यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्‍यवस्‍थापन समितीची राहणार आहे. सदरील फुटेज मध्‍ये आक्षेपार्ह बाबी आढळून आल्‍यास स्‍थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्‍य ती कार्यवाही करण्‍याची जबाबदारी मुख्‍याध्‍यापकाची राहणार आहे.

शिक्षकेत्‍तर कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती !

शाळेतील शिक्षकेत्‍तर कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करतांना विशेष काळजी घेणे व कार्यरत कर्मचाऱ्यांच्‍या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपायोजना करणे आवश्‍यक आहे. नियमित कर्मचाऱ्यांबरोबर बाह्यस्‍त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पध्‍दतीने ज्‍या नेमणुका केल्‍या जातात जसे सुरक्षारक्षक, सफाईगार, मदतनीस, स्‍कुल बसचे चालक इ. बाबतीत संबंधित व्‍यक्‍तीच्‍या पार्श्‍वभुमीची काटेकोर तपासणी शाळा व्‍यवस्‍थापना मार्फत होणे आवश्‍यक आहे.

यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्‍थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्‍त घेणे आवश्‍यक राहणार आहे. नेमणुकीनंतर संबंधित व्‍यक्‍तीच्‍या छायाचित्रासह त्‍याची सर्व तपशीलवार माहिती स्‍थानिक पोलीस यंत्रणेकडे देणे आवश्‍यक आहे, तसेच शाळामध्‍ये बाह्यस्‍त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पध्‍दतीने शिक्षकेत्‍तर कर्मचारी नियुक्‍त करतांना 6 वर्षांपर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी प्राधान्‍याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्‍यात यावी असेही आदेश शासनाने काढले आहे.

इतर उपाययोजना !

शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षितते बाबत करावयाच्‍या उपाययोजनांचा भाग म्‍हणून सर्व माध्‍यमांच्‍या व सर्व व्‍यवस्‍थापनाच्‍या शाळांमध्‍ये तक्रार पेटी बसविण्‍याबाबत यापूर्वीच शासन परिपत्रक काढण्‍यात आले आहे, तसेच तक्रारींवर कार्यवाही करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या असून तरतुदींचे पालन न करणाऱ्या मुख्‍याध्‍यापकावर शिस्‍तभंगाची कारवाई करण्‍यात येणार आहे.

यासह सखी सावित्री समितीचे गठन करणे, विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करणे आवश्‍यक करण्‍यात आले आहे. संबंधित शाळेमध्‍ये विद्यार्थ्‍यांसोबत काही अनुचित प्रकार घडल्‍याचे उघड झाल्‍यानंतर संबंधित शाळा व्‍यवस्‍थापन / मुख्‍याध्‍यापक / शिक्षक / शिक्षकेत्‍तर कर्मचारी यांनी सदर बाब चोवीस तासाच्‍या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवणे आवश्‍यक आहे, अशी अनुचित घटना कोणत्‍याही प्रकारे दडवून ठेवण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍याचे निदर्शनास आल्‍यास संबंधित व्‍यक्‍ती / संस्‍थांवर कारवाई करण्‍यात येणार आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!