Your Alt Text

संपादकांच्‍या कुटुंबियांवर दबाव आणि धमकी ! मला मारहाण करण्‍याची धमकी देणाऱ्यांनो, मी दुकानावर एकटाच आहे, ….दम असेल तर या ! वाट पाहतोय ! – परवेज पठाण

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
सोनेरी दुनियेच्‍या काळ्या बाजारा बाबत बातम्‍या घेतल्‍याने सोनेरी दुनियेतील काही अज्ञात लोकांनी कुटुंबावर प्रचंड दबाव टाकून धमक्‍या दिल्‍या असून बातम्‍या थांबल्‍या नाही तर आम्‍ही तुमच्‍या मुलाला (संपादकांना) मारहाण करू ! अशीही धमकी दिली आहे. त्‍यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील सोनेरी दुनियेच्‍या काळ्या बाजाराबाबत आणि GST चे नियम कायदे पायदळी तुडवले जात असल्‍या बाबत एल्‍गार न्‍यूज मध्‍ये बातमी प्रकाशित करण्‍यात आली होती. (दि.22 रोजीच्‍या सविस्‍तर बातमीची लिंक खाली दिली आहे.) मागील 1 ते दिड महिन्‍यात जेव्‍हा जेव्‍हा खात्रीलायक माहिती मिळत गेली तेव्‍हा बातमी घेण्‍यात आली. मात्र दि.22 रोजी ब्‍लॅक मनी संदर्भात बातमी घेतल्‍यानंतर काही लोकांनी संपादक परवेज पठाण यांच्‍या कुटुंबियांना दबाव टाकून धमकी दिली आहे. सदरील व्‍यक्‍ती कोण हे कुटुंबियांनी सांगितले नसले तरी तपास सुरू आहे.

संपादकांचे मत काय ?

मागील जवळपास 18 वर्षांपासून माझी (परवेज पठाण) कुंभार पिंपळगांव येथे मल्टिसर्व्हिसचे दुकान आहे. तर पत्रकारितेची पदवी (BMCJ) घेतल्‍यानंतर मागील 15 वर्षांपासून विविध सन्‍माननीय दैनिकात काम केल्‍यानंतर मागील वर्षी स्‍वत:चे एल्‍गार न्‍यूज (ऑनलाईन पोर्टल) सुरू केले आहे. सुरूवातीपासूनच रोखठोक बातम्‍यांची सवय असल्‍यामुळे अर्थातच सर्वसामान्‍य जनतेला दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न असतो तर बातमीमुळे ज्‍यांची पाचनसंस्‍था बिघडते अशा लोकांना वाईट वाटणे किंवा मळमळ होणे साहजिक असून त्‍याची आता सवय झाली आहे.

मी पण एक सामान्‍य व्‍यापारी असून कायम व्‍यापाऱ्यांचे हित पाहिले आहे. एवढंच नव्‍हे तर छोट्या व्‍यापाऱ्यांना बँकेने कर्ज पुरवठा करावा म्‍हणून तसेच इतर प्रश्‍नांबाबतही वेळोवेळी बातम्‍याही घेतल्‍या आहेत. माझ्या 18 वर्षांच्‍या दुकानाच्‍या कारकिर्दीत कोणत्‍याही व्‍यापाऱ्याला किंवा ग्राहकाला कुठल्‍याच प्रकारे त्रास झालेला नाही. कोणाशीही भांडण नाही, अरेरावी नाही, दबाव नाही. तसेच 15 वर्षांच्‍या पत्रकारितेच्‍या कारकिर्दीत जाहिरात वगळता कोणाच्‍याही एक पैशांचा मिंधा नाही, मागील 15 वर्षाच्‍या निष्‍पक्ष, निर्भीड आणि रोखठोक पत्रकारितेत कोणाकडूनही 1 पैसाही फुकटचा घेतला असेल तर कोणी सांगावे, आज पत्रकारिता सोडायला तयार आहे.

मी कोणत्‍याही पक्षाचा यापूर्वीही सदस्‍य नव्‍हतो आणि आजही नाही, शिवाय मी कोणाचाही समर्थकही नाही आणि विरोधकही नाही. माझी पत्रकारिता नि:पक्ष, निर्भीड आणि रोखठोक आहे हे सर्वपक्षीय नेत्‍यांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना, विविध क्षेत्रातील मान्‍यवरांना, जिल्‍ह्यासह राज्‍यातील पत्रकार बांधवांना आणि कुंभार पिंपळगांवसह परिसरातील नागरिकांना नक्‍कीच माहित आहे.

मागील 15 वर्षांत माझ्या पत्रकारितेवर एकही डाग लागलेला नाही. गैरमार्गाने पैसा कमवण्‍याची कधीही इच्‍छा झाली नाही, तशी मानसिकता असती तर कुंभार पिंपळगांवात माझी किमान एखाद्या कोटीची स्‍वत:ची बिल्‍डींग असती. कारण सुरूवातीपासूनच सर्वसामान्‍य जनतेचे हित लक्षात घेवूनच पत्रकारिता केलेली आहे. लॉकडाउनच्‍या काळात तर खूप आर्थिक अडचणीत सापडलो होतो, सर्व काही संपल्‍यासारखं दिसत होतं, परंतू तरीही कोणाला फोन केला नाही किंवा त्रास दिला नाही, एवढंच नव्‍हे तर कुटुंबियांना सुध्‍दा कळवले नाही. आता हे सर्व काही सांगायची आवश्‍यकता नाही, परंतू पूर्व पार्श्‍वभूमी लक्षात यावी म्‍हणून आवश्‍यक वाटले.

आता मुळ प्रश्‍न हा आहे की, दबाव आणि धमकी कशामुळे तर मागील महिनाभरात कुंभार पिंपळगांव येथील सोन्‍या चांदीच्‍या दुनियेत गैरव्‍यवहार कशाप्रकारे होत आहे याबद्दल बातम्‍या प्रकाशित करण्‍यात आल्‍या. सुरूवातीच्‍या 2 बातम्‍या प्रकाशित केल्‍यानंतर मित्रासारख्‍या 2 प्रतिष्‍ठीत नागरिकांनी स्‍वत:हून मला संपर्क साधून बातम्‍या घेवू नये अशी विनंती केली, परंतू मी त्‍यांना नम्रपणे सांगितले की, मला तुमचा आदर आहे, परंतू मी तुम्‍हाला कुठलाही शब्‍द देवू शकत नाही असे सांगून विषय टाळला. एका मित्राच्‍या माध्‍यमातून जाहिरातीचे सुध्‍दा अमिष दाखवण्‍यात आले परंतू तरीही मी दुर्लक्ष केले. विशेष म्‍हणजे मी कोणालाही कधीही संपर्क साधला नाही. तसेच बातम्‍यांमध्‍ये कोणालाही वैयक्तिक टार्गेटही केले नाही.

त्‍यानंतर मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे सदरील बातम्‍यांचा भाग 3 प्रकाशित केला, त्‍यानंतर दि.22 रोजी भाग 4 प्रकाशित केला, सदरील बातमीमध्‍ये GST सह विविध मुद्दे व नियमांच्‍या पायमल्‍ली कशी होत आहे तसेच ब्‍लॅक मनीचा मुद्दा मांडण्‍यात आला होता, यातील GST आणि “ब्‍लॅक मनी” हे शब्‍दच सोनेरी दुनियेसह इतर क्षेत्रातील 2/4 व्‍यावसायिकांच्‍या जिव्‍हारी लागल्‍याचे आणि अनेकांना अस्‍वस्‍थ करणारे ठरल्‍याचे दिसत आहे. विशेष म्‍हणजे बातमी मध्‍ये फक्‍त चौकशी व्‍हावी एवढाच विषय होता, जर कोणी चूक केली नसेल तर चिंता करण्‍याची आवश्‍यकता नव्‍हती, परंतू म्‍हणतात ना जेथे आग लागलेली असते तेथूनच धूर निघत असतो, असंच काही एकूण परिस्थितीवरून दिसत आहे.

दि. 22 रोजी बातमी प्रकाशित केल्‍यानंतर संबंधित लोकांनी माझ्या कुटुंबियांवर प्रचंड दबाव आणला असून घरात भांडणे लावण्‍याचा प्रयत्‍नही केला आहे, एवढंच नव्‍हे तर कुटुंबात वाद निर्माण करून मी पत्रकारिताच सोडावी असा प्रयत्‍न केला आहे. कुटुंबातील सदस्‍यांना असे सांगितले आहे की, मला नीट समजावून सांगा, तुमच्‍याकडे पाहून आम्‍ही शांत बसलो नाही तर त्‍याला मारहाण केली असती. आम्‍ही वेळ पडल्‍यास गांव बंद ठेवू आणि तुमचे सर्वांचे चालणे फिरणे मुश्किल करू अशी धमकी दिली आहे. खरं तर कुटुंबातील ज्‍या सदस्‍याकडे माझ्या विषयी धमकीवजा इशारा देण्‍यात आला आहे त्‍यांच्‍याशी तर माझा अनेक दिवसांपासून संभाषणच नाही, काहीही असो, मात्र बातमीमुळे कुटुंबापर्यंत विषय घेवून जाण्‍याचा प्रश्‍नच नव्‍हता.

एवढंच नव्‍हे तर मित्रांकडे माझ्यावर खोटा गुन्‍हा दाखल करून अडकवू अशी भिती दाखवण्‍यात आली आहे. आता माझे म्‍हणणे आहे की, मला मारहाण करण्‍याची इच्‍छा ठेवणाऱ्यांनो, मी दुकानात एकटाच आहे, शिवाय माझ्या घरचे कोणीही येणार नाही, त्‍यामुळे तुमची खुमखुमी असेल तर तुम्‍ही येवू शकता. मागील 15 वर्षांत कोणी मारहाण तर सोडाच बोट पण दाखवलेला नाही, त्‍यामुळे आता माझ्या सारख्‍या पत्रकाराला मारहाण करण्‍याची कोणाची इच्‍छा आहे हे मला पण पहायचे आहे.

माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास होणार असेल आणि मला घरातून बाहेर पडण्‍याची वेळ यावी अशी कोणाची इच्‍छा असेल तरी माझी तयारी आहे. तशी वेळ आल्‍यास गावात कोठेतरी भाड्याने रूम करून राहण्‍यास माझी काहीही हरकत नाही, परंतू कुटुंबापासून बाजुला गेल्‍यावर माझ्या लेखणीची धार यापेक्षा किती तिव्र होईल हे मी सांगू शकत नाही.

राहीला प्रश्‍न चालणे फिरणे मुश्किल करण्‍याचा तर माझा जन्‍म याच मातीत आणि याच गावात झालेला आहे. शिवाय जे मला (इतरांकडे) खोट्या गुन्‍ह्यात अडकवण्‍याची भाषा बोलत आहेत, त्‍यांना एवढंच सांगणे आहे की, तुम्‍ही खोटा गुन्‍हा दाखल केल्‍यावर मी स्‍वत: जामीन पण घेणार नाही आणि कुटुंबालाही घेवू देणार नाही. बाकी कोणी प्रेम करणारा जामीन घेणार असेल तर माहिती नाही. एवढंच होईल की, सर्वसामान्‍य जनतेच्‍या हितासाठी माझ्या सारख्‍या पत्रकाराला जेल मध्‍ये जावे लागेल, तरी हरकत नाही. बाकी सदरील विषय सन्‍माननीय पोलीस प्रशासना पर्यंत गेला असेल आणि माझी ही बाजू त्‍यांनाही लक्षात आली असेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

मी यापूर्वीही सांगितलं होतं आणि आताही सांगत आहे, की माझ्याकडे गमवण्‍यासारखं काहीही नाही आणि त्‍यामुळे कुठल्‍याही संकटाचा विचार करण्‍याची आवश्‍यकता नाही. कदाचित धमकी देणाऱ्यांना याचा विसर पडला असावा की, जिनके घर शिशे के होते है वो दुसरो के घर पर पत्‍थर मारा नही करते…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!