Your Alt Text

अंगणवाडीच्‍या इमारतीची दुरावस्‍था ! अस्‍वच्‍छता आणि दुर्गंधीमुळे लहान मुलांचे आरोग्‍य धोक्‍यात ? पूरक पोषण आहार रस्‍त्‍यावर देण्‍याची वेळ !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील अंगणवाडी क्र.९ ची अवस्‍था अत्‍यंत बिकट झाली असून सर्वत्र अस्‍वच्‍छता आणि दुर्गंधी पसरली आहे, एखाद्या भूत बंगल्‍याप्रमाणे येथील इमारत झाल्‍याने नाईलाजाने लहान मुलांना पूरक पोषण आहार रस्‍त्‍यावर द्यावे लागत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील (गणपती मंदिराजवळ) अंगणवाडी क्र.९ ची अत्‍यंत दुरावस्‍था झाली असून जिकडे तिकडे घाण व दुर्गंधी पसरली आहे, रस्‍त्‍यापासून आत मध्‍ये छोट्याशा बोळीतून जवळपास 100 फुट जावे लागते, तेथे अंगणवाडी आहे. अंगणवाडी च्‍या समोर अत्‍यंत कमी जागा असून तेथे झाडे व गवत मोठ्या प्रमाणात झाल्‍याने सरपटणाऱ्या प्राण्‍यांपासूनही मुलांना धोका आहे.

अंगणवाडीची दयनीय अवस्‍था !

सदरील अंगणवाडी क्र.९ ची अत्‍यंत दयनीय अवस्‍था झाली असून खिडक्‍या पूर्णपणे तुटल्‍या आहेत, दरवाजे खराब झाले आहेत, शौचालय बंद अवस्‍थेत आहे, भिंती पाहिल्‍यानंतर एखाद्या भूत बंगल्‍याप्रमाणे त्‍या दिसत आहेत, शिवाय या अंगणवाडीची अवस्‍था पाहिल्‍यास येथे कोणीही बालक जावू शकत नाही किंवा थांबू शकत नाही एवढी दयनीय अवस्‍था झाली आहे.

fdfasfadfa

नाल्‍याच्‍या बाजूलाच अंगणवाडी !

सदरील अंगणवाडीच्‍या बाजूनेच मोठा नाला गेलेला आहे, या नाल्‍यामध्‍ये आणि नाल्‍याच्‍या वरच्‍या बाजूला मोठ्या प्रमाणावर घाण व कचरा साचला असून प्रचंड दुर्गंधी येत आहेत, विशेष म्‍हणजे या नाल्‍याच्‍या बाजूलाच २ अंगणवाड्या का करण्‍यात आल्‍या ? एकाच ठिकाणी मागेपुढे २ अंगणवाड्या करून काय साध्‍य करायचं होतं ? घाण व दुर्गंधीमुळे लहान मुला-मुलींचे आरोग्‍य धोक्‍यात आल्‍यास याची जबाबदारी कोणाची ? असे अनेक प्रश्‍न यानिमित्‍ताने उपस्थित होत आहे.

ग्रामपंचायतचे दुर्लक्ष !

सदरील समस्‍यांबाबत अंगणवाडीकडून ग्रामपंचायतला २५/०७/२०१९ व २२/०३/२०२४ असे लेखी व अनेकवेळा तोंडी सुध्‍दा कळविण्‍यात आले होते, परंतू या महत्‍वपूर्ण विषयाकडे लक्ष देण्‍यास ग्रामपंचायतला अजून मुहूर्त सापडलेला दिसत नाही. अर्थातच त्‍यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

तपासणी का नाही ?

घनसावंगी येथील बाल विकास प्रकल्‍प अधिकारी कार्यालयाने कुंभार पिंपळगांव येथील सर्व अंगणवाड्यांची तपासणी केलेली आहे का ? जर सर्व अंगणवाड्यांची तपासणी केली असेल तर त्‍यांना अंगणवाडी क्र.९ च्‍या समस्‍या दिसून आल्‍या नाही का ? जर एवढ्या वर्षांपासून ही समस्‍या प्रलंबित आहे तर संबंधित विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का ? असे अनेक प्रश्‍न यानिमित्‍ताने उपस्थित होत आहेत. अर्थातच लहान बालकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न लक्षात घेता फक्‍त अंणगवाडी क्र.९ ही एकच अंगणवाडी नव्‍हे तर कुंभार पिंपळगांवातील सर्व अंगणवाड्यांची तपासणी करून आवश्‍यक त्‍या उपाययोजना करणे क्रमप्राप्‍त झाले आहे.

आरोग्‍य आणि सुरक्षेचा प्रश्‍न !

सध्‍या ज्‍या ठिकाणी अंगणवाडी क्र.९ आहे त्‍या ठिकाणी इमारतीची तर अत्‍यंत दुरावस्‍था झाली आहेच, शिवाय या भागात घाण व दुर्गंधीयुक्‍त मोठा नाला असल्‍यामुळे आरोग्‍याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे, एवढंच नव्‍हे तर सध्‍या ज्‍या ठिकाणी अंगणवाडी आहे तो भाग अरूंद गल्‍लीतून जावून कंजेस्‍टेड जागेत असल्‍याने शिवाय सदरील भागात सरपटणाऱ्या प्राण्‍यांचा धोका असल्‍याने सुरक्षेचा प्रश्‍नही आहे. त्‍यामुळे सदरील अंगणवाडी इतरत्र स्‍थलांतर करून योग्‍य त्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक असल्‍याचे मत येथील नागरिकांनी व्‍यक्‍त केले आहे.

याबाबत घनसावंगी येथील बाल विकास प्रकल्‍प अधिकारी विनोद डाबेराव यांच्‍याशी संपर्क साधला असता सुपरवायझरला सांगून माहिती घेतो असे त्‍यांनी सांगितले तर घनसावंगी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समीर जाधव यांच्‍याशी संपर्क साधला असता बाल विकास प्रकल्‍प अधिकारी व कुंभार पिंपळगांवच्‍या ग्रामसेवकांशी चर्चा करून सदरील अडचण दूर करण्‍याचा प्रयत्‍न करू असे त्‍यांनी सांगितले.

नक्‍कीच दखल घेतली जाईल !

अंगणवाडी मधील मुला-मुलींच्‍या आरोग्‍याच्‍या आणि सुरक्षेच्‍या दृष्‍टीने योग्‍य ती काळजी घेतली जाईल, सदरील अंगणवाडी ज्‍या ठिकाणी आहे तेथे ठेवणे योग्‍य आहे किंवा इतरत्र स्‍थलांतर करणे आवश्‍यक आहे याबाबत माहिती घेतली जाईल, घनसावंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि बाल विकास प्रकल्‍प अधिकारी यांना तातडीने योग्‍य ते आदेश देवून अंगणवाडीची समस्‍या दूर केली जाईल, याबाबत नक्‍कीच दखल घेवून उपाययोजना केल्‍या जातील.

  • कोमल कोरे (चाटे),
    महिला व बाल कल्‍याण अधिकारी,
    जिल्‍हा परिषद, जालना

इतर बातम्‍या खाली पहा…


नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्‍या नियमित प्राप्‍त करण्‍यासाठी एल्‍गार न्‍यूजच्‍या Whatsapp ग्रुपला जॉईन व्‍हा, किंवा 9890515043 हा क्रमांक तुमच्‍या Whatsapp ग्रुप मध्‍ये अॅड करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!