एल्गार न्यूज :-
Pomegranate Farming Success Story : आजकाल अनेक तरूण करिअर म्हणून शेतीकडे वळू लागले आहेत, पारंपारिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शिवाय अनेकदा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल होतात, मात्र जर शेतीचे योग्य ते नियोजन करून आधुनिक पध्दतीने शेती केल्यास नक्कीच फायदा होवू शकतो.
मागील काळात जे फळं फक्त मोजक्याच ठिकाणी येत होती, ती फळे आता आपल्याकडे सुध्दा घेण्यात येत आहेत. जसे की, स्ट्रॉबेरी, सफरचंद आणि इतर फळे सुध्दा आपल्याकडे घेवून चांगला नफा शेतकऱ्यांना मिळू लागल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
आज येथे ज्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत त्या शेतकऱ्याने खडकाळ जमिनीमध्ये डाळिंबाच्या शेतीतून लाखो रूपयांचा नफा मिळवला आहे, अर्थातच काही वेगळं करण्याची जिद्द, योग्य ते नियोजन, आधुनिकतेची जोड आणि मार्केटचा थोडा अभ्यास केल्यास नक्कीच फायदा होवू शकतो.
3 एकर डाळिंब बागेतून 31 लाख नफा…
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दिपक सोनवणे या तरूण शेतकऱ्याने 4 वर्षांपूर्वी 3 एकर खडकाळ जमिनीमध्ये 1000 डाळिंबाच्या झाडांची लागवड केली होती, आधुनिक पध्दतीने केलेल्या या शेतीमध्ये उत्तम व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर आणि नियोजन करून डाळिंबाची बाग फुलवली.
श्री.सोनवणे यांनी टिशू कल्चर नर्सरीच्या माध्यमातून भगवा या डाळिंबाच्या जातीची 1000 रोपांची खरेदी केली व शेतामध्ये लागवड केली, लागवड करतांना अंतराला खूप महत्व दिले, दोन झाडांमध्ये 13 बाय 9 फुटांचे अंतर ठेवले.
Pomegranate Farming Success Story
पावसाळ्याच्या कालावधीत डाळिंब रोगाला बळी पडण्याचा धोका असतो शिवाय बाजारभाव देखील चांगला मिळत नाही, त्यामुळे त्यांनी एप्रिल महिन्यात आंबे बहार धरला. बहार नियोजन करण्यापूर्वी सर्व डाळिंब फळ पिकाला बेसल डोल टाकले, त्यासोबत लेंडी खत टाकून चार एप्रिलला पहिले पाणी दिले.
तसेच खत व औषधांचे योग्य पध्दतीने नियोजन करून सदरील झाडांची छाटणी देखील वेळेवर केली, किटकनाशकांची फवारणी, जैविक बॅक्टेरियांचे संतुलन योग्य पध्दतीने केले, या सर्व व्यवस्थापनामुळे फळांची फुगवण देखील चांगली झाली, रंग आणि आकार देखील चांगला आला.
श्री.सोनवणे यांच्या डाळिंब बागेत 1000 झाडे असून त्यांना यावेळेस 174 रूपये प्रति किलोचा दर मिळाला व एकूण उत्पन्न 21 टन मिळाले. यामध्ये त्यांचा 7 लाख रूपये खर्च होता व खर्च वजा जाता त्यांना 31 लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला.
अशा पध्दतीने श्री.सोनवणे यांनी आधुनिक पध्दतीने व योग्य ते नियोजन करून डाळिंबाची शेती केली आणि लाखो रूपये कमवले. त्यांची यशोगाथा इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.