एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
डीजे व ध्वनी प्रदूषणाबाबत यापूर्वीच मा.सर्वोच्च न्यायालय व मा.उच्च न्यायालय यांनी आदेशही देवूनही काही लोक न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत डीजे वाजवत आहेत. मा.उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिले आहेत की, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड हे दि.22 रोजी परतूर येथून आष्टीकडे येत असतांना दुपारी 3 च्या दरम्यान आष्टी ते परतूर रोडवरील श्रीष्टी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ येत असतांना राहुल चव्हाण नावाचा व्यक्ती टेम्पोमध्ये मोठे साउंड बसवून डीजे वाजवत असल्याचे दिसून आले. सदरील आवाज कर्णकश व अत्यंत जास्त असल्यामुळे आसपासाच्या नागरिकांना विनाकारण त्रास झाला.
सदरील व्यक्तीने डीजे वाजवून मा.सर्वोच्च न्यायालय, मा.उच्च न्यायालय व जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे सदरील व्यक्तीवर आष्टी (ता.परतूर, जि.जालना) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो. उपनिरीक्षक बी.डब्ल्यू. मुंढे करीत आहेत.
डीजेमुळे नागरिकांना त्रास !
आजकाल कोणताही कार्यक्रम असला तर डीजे लावण्याचे प्रकार वाढले आहे. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कारणांसाठी सर्रासपणे डीजे लावून अक्षरश: हैदोस माजवला जात आहे. ध्वनी प्रदुषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे.
कारवाई होणार !
मा.सर्वोच्च न्यायालयाने डीजे वाजवणाऱ्यावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे कोणालाही डीजे लावून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देता येणार नाही. श्रीष्टी येथे डीजे वाजवणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापुढील काळातही कोणी डीजे लावून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास नियमान्वये कारवाई केली जाईल असा इशारा आष्टी (ता.परतूर) पोलीस ठाण्याचे स.पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांनी दिला आहे.
डीजेमुळे अनेकांचा मृत्यू !
डीजे वाजवल्याने फक्त ध्वनी प्रदुषणच होत नाही तर यामुळे हार्ट अटॅक व तत्सम कारणांमुळे मृत्यू सुध्दा होवू शकतो. अर्थातच अशा अनेक घटना यापूर्वी राज्यात घडल्या आहेत. एवढंच नव्हे तर अति आवाजामुळे किंवा ध्वनी प्रदुषणामुळे बहिरेपणा, चिडचिडेपणा, उच्च रक्तदाब, स्मृतिभ्रंष, तणाव, निद्रानाश, राग तसेच डिप्रेशनसारखे आजार जडतात. दुसऱ्याने डीजे लावला म्हणून आपणही डीजे लावायचा हीच मानसिकता धोकादायक ठरत आहे. त्यामुळे डीजे लावण्यापूर्वी लहाने मुले, वयोवृध्द व आजारी लोकांचाही विचार व्हावा एवढीच माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.