Your Alt Text

कुंभार पिंपळगावात लाखो रूपये खर्चूनही रस्‍त्‍यावरील पेव्‍हर ब्‍लॉक व अंडरग्राउंड नालीचे काम निकृष्‍ट दर्जाचे !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
एखाद्या रस्‍त्‍याच्‍या प्रेमात पडून खड्ड्यांनी रस्‍त्‍यावरच आपले बस्‍तान मांडावं आणि खड्याचं प्रेम पाहून एखाद्या झाडालाही त्‍या खड्यात उगवण्‍याची इच्‍छा व्‍हावी एवढंच नव्‍हे तर हे सर्व पाहून नालीतून वाहणाऱ्या पाण्‍यानेही मला सुध्‍दा या रस्‍त्‍यावर जागा पाहिजे म्‍हणून स्विमिंग पुल सारखे पाणी रस्‍त्‍यावर साचावे असंच काही चित्र सध्‍या कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) येथील विठ्ठल गल्ली ते लहान मारूती मंदिरापर्यंतच्‍या रस्‍त्‍याचे दिसत आहे.

घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे मागील काळात सदरील रस्‍त्‍यावर लाखो रूपये खर्चून गट्टू (पेव्‍हर ब्‍लॉक) बसवण्‍यात आले होते, सदरील काम कोणी केले आहे हे लवकरच स्‍पष्‍ट होईलच, परंतू सदरील काम करणाऱ्यांनी रस्‍त्‍याचे काम एवढ्या निकृष्‍ट दर्जाचे केले आहे की, जेथे तेथे पेव्‍हर ब्‍लॉक (गट्टू) उघडे पडले आहेत, बाजूला पडले आहेत. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्‍या खड्यात झाड उगवले आहे, शिवाय रस्‍ता करण्‍याच्‍या आधी जे अंडरग्राउंड नालीचे काम करण्‍यात आले आहे ते सुध्‍दा अत्‍यंत निकृष्‍ट दर्जाचे झाले आहे, त्‍यामुळे नाली फुटून सदरील पाणी वर साचत आहे.

Paver block and drainage work in KP Gaon has become of poor quality 03

रस्‍त्‍याचे काम झाले का ?

गावांतर्गत रहदारीचा रस्‍ता असल्‍याने पेव्‍हर ब्‍लॉक बसवण्‍या आधी रस्‍त्‍याचे काम करणे आवश्‍यक होते, परंतू पेव्‍हर ब्‍लॉक बसवण्‍याआधी फक्‍त माती उकरून पुन्‍हा टाकण्‍यात आली व नंतर पेव्‍हर ब्‍लॉक बसवण्‍यात आल्‍याचे गांवकरी सांगत आहेत. विशेष म्‍हणजे रस्‍त्‍याच्‍या खाली नाली (अंडरग्राउंड नाली) असतांना वर सिमेंट कॉंक्रीटचे काम करणे आवश्‍यक होते परंतू तसे झाले नाही असेही नागरिक सांगत आहेत.

खड्ड्यांमुळे दुखापत !

सदरील रस्‍त्‍याचे काम निकृष्‍ट झाल्‍याने रस्‍ता जेथे तेथे उखडला आहे, रस्‍त्‍यावर जेथे तेथे खड्डे पडल्‍यामुळे या रस्‍त्‍यावर दुचाकी चालवणे सुध्‍दा अवघड झाले आहे, खड्ड्याचा अंदाज न आल्‍याने दुचाकीस्‍वार पडून त्‍यांना दुखापत होत आहे. एवढंच नव्‍हे तर लहान मुलांना सुध्‍दा खेळतांना या रस्‍त्‍यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्‍याने ते सुध्‍दा पाय अडकून खाली पडत आहेत.

लाखो रूपये खर्च !

सदरील रस्‍त्‍यावर पेव्‍हर ब्‍लॉक बसवण्‍यासाठी व अंडरग्राउंड नालीचे काम करण्‍यासाठी लाखो रूपये खर्च करण्‍यात आले आहेत. मात्र सदरील काम हे निकृष्‍ट दर्जाचे झाल्‍याने सदरील लाखो रूपये वाया गेल्‍याचे नागरिक सांगत आहेत. शासनाकडून लाखो रूपये विकासकामांसाठी येत असतात, परंतू सदरील कामे निकृष्‍ट दर्जाची होणार असतील तर असे काम कितीही वेळा केले तरी त्‍याचा काहीही उपयोग होणार नसल्‍याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

ग्रामसेवकांचे दुर्लक्ष !

कुंभार पिंपळगांवात विकास कामे करतांना इस्‍टीमेट किंवा नियम व अटींचा काही संबंध नसावा. कारण कोणी कसेही काम करायचे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी काहीच बोलायचं नाही असा अलिखित नियम झाल्‍याचं दिसत आहे. त्‍यामुळे कदाचित वर्षानुवर्षे थातूर मातूर काम करा योजना गावात लागू झाली की काय ? असा प्रश्‍न गावकऱ्यांना पडला आहे. विशेष करून स्‍वत:चा खिसा गरम झाल्‍यावर कोणी कसं काम करायचं ते करावं अशी भुमिका ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) यांची दिसत असल्‍याचे नागरिक सांगत आहेत.

कामाची चौकशी होणार का ?

शासनाने गावाच्‍या विकासासाठी आणि चांगल्‍या दर्जाच्‍या कामासाठी लाखो रूपयांचा निधी उपलब्‍ध करून दिलेला असतांना सदरील काम निकृष्‍ट दर्जाचे करण्‍यात आल्‍याचे दिसत आहे. त्‍यामुळे या कामाची सखोल चौकशी करण्‍यात यावी अशी मागणी गांवकऱ्यांनी केली आहे.


अवघ्‍या काही दिवसातच कोणत्‍या रस्‍त्‍याला गेले तडे ते सुध्‍दा लवकरच…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!