Your Alt Text

भैय्यासाहेब तुम्‍हाला आमच्‍या गावाचं फक्‍त मतदानच पाहिजे का ? रस्‍ताच नसल्‍याने आजारी महिलेला बैलगाडीत घेवून जाण्‍याची वेळ !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
भैय्यासाहेब वर्षानुवर्षे आम्‍ही तुम्‍हाला मतदान करत आलो आहोत, दर निवडणुकीला आम्‍ही तुम्‍हाला गावातून लीड दिली आहे, परंतू आमचा वापर तुम्‍ही फक्‍त मतदानापुरताच करता का ? जणू 1970 च्‍या दशकात आम्‍ही जगत आहोत, म्‍हणजेच कुठल्‍याच सुविधा नाहीत. आम्‍ही वर्षानुवर्षे विधानसभा असो, जिल्‍हा परिषद पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो तुम्‍हाला पाहुन मतदान केले हाच आमचा दोष आहे काय ? असा सवाल सौंदलगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील नागरिक करत आहेत.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, सौंदलगांव हे गांव तालुका मुख्‍यालय म्‍हणजेच घनसावंगी पासून जवळपास 35 कि.मी. अंतरावर आहे. तर तिर्थपुरी पासून 18 कि.मी. अंतरावर असून सदरील गाव हे गोदावरी नदीजवळ आहे. सौंदलगावातून बाहेर पडून रस्‍त्‍याला लागण्‍यासाठी किमान 2 कि.मी. रस्‍ताच नाही. पावसाळ्यात तर मोटारसायकल किंवा मोठे चार चाकी वाहन जावूच शकत नाही अशी परिस्थिती आहे.

fadfasdfasdfas

गावातून बाहेर पडून सौंदलगाव फाट्यापर्यंत जाण्‍यासाठी रस्‍ताच नसल्‍याने एक जरी पाऊस पडला तरी छोटे किंवा मोठे वाहन जावू शकत नाही. त्‍यामुळे दि.7 रोजी सौंदलगांव येथील आजारी महिलेला बैलगाडीत घेवून जाण्‍याची वेळ कुटुंबातील व्‍यक्‍तींवर आली. बैलगाडीतून या लोकांना सौंदलगांव फाट्यापर्यंत यावे लागते आणि त्‍यानंतर तिर्थपुरीला जाणाऱ्या रस्‍त्‍यावरून वाहन पकडून तिर्थपुरीला जावे लागते.

सौंदलगांव फाट्यापासून सुध्‍दा तिर्थपुरी पर्यंत म्‍हण्‍जेच जवळपास 16 कि.मी. अंतर असलेला रस्‍ता सुध्‍दा खराबच आहे. काही ठिकाणी थातूरमातूर व थोडेफार काम झाले आहे तर अनेक ठिकाणी अजूनही रस्‍ता खड्डेमयच आहे. त्‍यामुळे सौंदलगांव पासून तिर्थपुरी पर्यंत रूग्‍णाला घेवून जाण्‍यास मोठी कसरत करावी लागते.

आरोग्‍य केंद्र नाही !

सौंदलगांव किंवा आसपासच्‍या गावात शासकीय प्राथमिक आरोग्‍य केंद्र नाही, त्‍यामुळे रूग्‍णांना तिर्थपुरीला घेवून जावे लागते. तिर्थपुरीचे अंतर जवळपास 18 कि.मी. आहे. अशा परिस्थितीत एखाद़्या रूग्‍णाला तातडीच्‍या उपचाराची गरज असल्‍यास रूग्‍णाचा जीव धोक्‍यात येतो. अर्थातच मृत्‍यूच्‍या छायेत जगण्‍याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.

शिक्षणापासून वंचित !

गावात 5 वी पर्यंत शाळा आहे. परंतू या शाळेत फक्‍त 2 शिक्षक आहेत, त्‍यापैकी एक शिक्षक हजर असतात तर एक गैरहजर असतात. शाळेची इमारत मोडकळीस आली असून पावसाळ्यात छतावरील पाणी खाली गळते, त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना वर्गात बसणे सुध्‍दा अवघड जाते. 5 वीच्‍या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्‍यांना 3 ते 4 कि.मी. बानेगावला पायी किंवा सायकलवर जावे लागते. मात्र पावसाळ्यात पायी किंवा सायकलवर सुध्‍दा जाणे शक्‍य नाही. विशेष म्‍हणजे या गावाला एस.टी. (बस) नाही.

दुषित पाणी !

गावात सद्यस्थितीत असलेले पाणी दुषित असल्‍यामुळे इतर गावातून पाणी आणावे लागते. मात्र पावसाळ्यात रस्‍ताच नसल्‍याने मोटरसायकलवर किंवा इतर वाहनातुन पाणी आणणे सुध्‍दा शक्‍य नसते. नाईलाजाने अनेकदा दुषित पाणीच प्‍यावे लागत असल्‍याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

पाहुण्‍यांची पायपीट !

काही दिवसांपूर्वी ईदच्‍या वेळेस गावात पाहुणे, नातेवाईक, मित्र मोठ्या संख्‍येने भेटायला आले होते, त्‍यावेळेस अवकाळी पावसामुळे रस्‍त्‍यावर चिखल झाल्‍याने सर्वांना 2 ते 3 कि.मी. पायी गावात यावे लागले व पायीच परत जावे लागले. रस्‍ताच नसल्‍याने लग्‍न कार्य असेल तेव्‍हा सुध्‍दा पाहुण्‍यांना गावात येण्‍यासाठी पायपीट करावी लागत असल्‍याचे नागरिक सांगत आहेत.

मोलमजूरी पासूनही वंचित !

गावात जवळपास सर्वजण हे मोलमजूरी करून आपला प्रपंच चालवतात. मात्र एक जरी पाऊस (अवकाळी असो किंवा पावसाळयातील असो) पडला तर गावातून बाहेर पडता येत नाही. त्‍यामुळे आम्‍हाला मोलमजूरी करणे शक्‍य होत नाही आणि त्‍यामुळे आम्‍हाला आर्थिक नुकसान होते अशी भावना नागरिकांनी व्‍यक्‍त केली आहे.

1970 चे जगणे !

येथील एका नागरिकाने सांगितले की, आजच्‍या काळात इतरत्र अनेक सुविधा निर्माण झाल्‍या असल्‍या तरी आम्‍ही अजूनही 1970 चे जीवन जगत आहोत. कारण आजही आम्‍हाला मुलभूत सुविधाच मिळत नाहीत. आम्‍ही वर्षानुवर्षे भैय्यासाहेबांवर विश्‍वास ठेवला मात्र आमच्‍या पदरी निराशाच आली अशी प्रतिक्रिया येथील बांधवांनी दिली आहे.

भैय्यासाहेब आम्‍ही काय करावे !

वर्षानुवर्षे भैय्यासाहेब (माजी मंत्री तथा सध्‍याचे आमदार राजेश टोपे) आम्‍ही तुम्‍हाला मतदान केले, कायम गावातून लीड दिली, तुमच्‍या शब्‍दापुढे गेलो नाही मात्र आम्‍हाला काय मिळाले ? 15 ते 20 वर्ष झाले आमच्‍या गावाला साधा रस्‍ता नाही, शिक्षणाची सोय नाही, आरोग्‍याची सोय नाही, पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय नाही, एस.टी. बस नाही, रोजगार नाही. आता तर आम्‍हाला रूग्‍णाला बैलगाडीतून दुसऱ्या गावाला घेवून जावे लागत आहे. एवढी आमची दयनीय अवस्‍था झाली आहे. भैय्यासाहेब तुम्‍हीच सांगा आमचा दोष काय ? असा सवाल सौंदलगांव येथील नागरिक करत आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष !

एखाद्या गावातील नागरिक अशाप्रकारे दयनीय अवस्‍थेत जीवन जगत असतांना प्रशासन काय झोपा काढत आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गावात कोणीच अधिकारी येत नसल्‍याचे नागरिक सांगत आहेत. मग पंचायत समिती, जिल्‍हा परिषद, बांधकाम विभाग, आरोग्‍य विभाग, तहसील कार्यालय, जिल्‍हाधिकारी कार्यालय व इतर विभागातील अधिकाऱ्यांनी एवढे वर्ष या गावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!