एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या अमानुष कृत्यानंतर भारताने घेतलेल्या अत्यंत कठोर आणि आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची अक्षरशः झोप उडाली असून, भारत कधीही लष्करी कारवाई करेल या भीतीने इस्लामाबाद मधील सत्ताधारी धास्तावले आहेत.
पाकचा नापाक उद्देश !
पर्यटनासाठी काश्मीरच्या नंदनवनात गेलेल्या निष्पाप नागरिकांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अत्यंत निर्दयीपणे लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी धर्म विचारून नागरिकांना गोळ्या घातल्या. या क्रूर हत्याकांडात २७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. भारतात धार्मिक तेढ निर्माण करणे, जातीय दंगली भडकावणे आणि देशात अस्थिरतेचे वातावरण तयार करणे हा या हल्ल्यामागील पाकिस्तानचा कुटील डाव होता, मात्र, भारतातील जनतेने कमालीचा संयम आणि समजूतदारपणा दाखवत पाकिस्तानचा हा नापाक मनसुबा उधळून लावला. देशवासीयांनी शांतता राखत हे कृत्य पाकिस्तान पुरस्कृत असल्याचे ओळखले आणि एकजूट दाखवली.
दहशतवाद्यांसह सुत्रधारांना इशारा !
या भ्याड हल्ल्यामुळे देशभरात संतापाचा उद्रेक झाला असून, पाकिस्तानला सडेतोड आणि कायमचा धडा शिकवावा, अशी तीव्र भावना जनतेतून व्यक्त होत आहे. या भ्याड हल्ल्यामुळे भारत सरकारने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील एका सभेत बोलताना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, “या हल्ल्यातील दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना त्यांच्या कल्पनेपलीकडची मोठी शिक्षा दिली जाईल.” हा इशारा केवळ शाब्दिक नसून भारताने कृतीतूनही पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानची कोंडी !
भारताने तातडीने १९६० सालचा सिंधू पाणी वाटप करार स्थगित केला आहे. या करारामुळे पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्यावर मोठे निर्बंध येणार असून, आधीच आर्थिक गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यासोबतच भारताने इतरही अनेक निर्बंध पाकिस्तानवर लादले आहेत. इतकेच नव्हे, तर भारतातील एका प्रमुख व्यापारी संघटनेने पाकिस्तान सोबतचा आयात-निर्यात व्यापार तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर आणखी ताण येणार आहे.
भारताने नुकतेच घेतले हे ५ निर्णय !
- सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला.
- पाकिस्तानातील भारतीय दुतावासातील अधिकारी परत बोलावले.
- पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश.
- वाघा – अटारी सीमा बंद करण्यात आली.
- भारतातील अनेक पाकिस्तानी अधिकाऱ्यांची हकालपट्टी.
पाक संरक्षणमंत्र्यांची कबुली !
एका ब्रिटनच्या टिव्हीला मुलाखत देतांना पाकिस्तानी संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ याने कबुली दिली की, पाकिस्तान गेली ३० वर्षे दहशतवाद पोसतोय. त्याला जेव्हा चॅनलच्या मुलाखतकाराने विचारले की, पाकिस्तान अनेक दशकांपासून दहशतवादी संघटनांचे समर्थन, सहाय्य आणि त्यांना निधी पुरवण्याचे काम करत होता हा दीर्घ इतिहास राहिला आहे, हे तुम्ही स्विकारता का ? असा सवाल केल्यावर संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफने सांगितले की, हो, गेली ३० वर्षांहून अधिक काळ पाकिस्तान हा अमेरिका आणि ब्रिटनसाठी हे काम करत आहे. आता याच कबुलीजबाबामुळे पाकिस्तान पुन्हा जगभरात टिकेचा धनी ठरत आहे. अर्थात पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.
सर्व पक्षांचा पाठींबा !
नुकतीच सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती, यामध्ये सर्व पक्षांनी दहशतवाद्यांसह पाकिस्तान विरूध्द करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कारवाईसाठी सरकारला पाठींबा दिल्याचे सांगण्यात आले. अर्थातच सरकारने सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेवून पुढील कारवाईचे नियोजन सुरू केल्याचे बोलले जात आहे.
पाक सरकारला धास्ती !
भारताने घेतलेली ही कठोर भूमिका, कारवाईसाठी सर्व पक्षांचा पाठींबा, पंतप्रधानांचा इशारा आणि संभाव्य लष्करी कारवाईची शक्यता यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारताकडून होणारी चौफेर कोंडी आणि युद्धासारखी तयारी पाहता पाकिस्तानची झोप उडाली असून भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानची पाचावर धारण बसली आहे. पाकिस्तानने पेरलेल्या दहशतवादाचे विषारी पीक आता त्यांनाच भोगावे लागत असून, भारताच्या कठोर पवित्र्यामुळे ते पुरते भेदरले आहेत. पहलगाम मधील निष्पाप नागरिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, हे भारताने आपल्या कृतीतून स्पष्ट केले असून, लवकरच पाकिस्तानला त्यांच्या कृत्याची मोठी किंमत चुकवावी लागेल यात शंका नाही.