Your Alt Text

DJ मुळे अजून किती जीव जाणार ? डीजेमुळे हार्ट अटॅक येवून एकाचा मृत्‍यू तर दुसऱ्या एका घटनेत डोक्‍याची नस फुटून रक्‍त गोठलं !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
विविध सण उत्‍सव, लग्‍न कार्य, वाढदिवस, जयंती किंवा इतर कार्यक्रमात डीजेच्‍या माध्‍यमातून आवाजाची सर्व मर्यादा ओलांडून आपण अजून किती जीव घेणार आहोत हे आपण स्‍वत: ला विचारणे क्रमप्राप्‍त झाले आहे. कारण डीजेच्‍या आवाजामुळे एक नव्‍हे तर वारंवार अनेक घटना घडत आहेत आणि लोकांचे जीव जात आहेत.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, परभणी जिल्‍ह्यात मिरवणुकीत डीजे च्‍या आवाजामुळे हार्ट अटॅक (ऱ्हदयविकार) येवून एकाचा मृत्‍यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती गंभीर असल्‍याची माहिती समोर आली आहे. तसेच दुसऱ्या एका ठिकाणी डीजेच्‍या आवाजामुळे एका व्‍यक्‍तीची नस फुटली आणि त्‍याला ब्रेन हॅमरेज झाला आहे. सदरील व्‍यक्‍तीचीही प्रकृती गंभीर असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे.

घटना एवढ्याच नाहीत !

DJ च्‍या आवाजामुळे हार्ट अटॅक येवून मृत्‍यू झाल्‍याची ही एकमेव घटना नाही, एक आठवडाही असा जात नाही की ज्‍यामध्‍ये डीजेमुळे घडलेल्‍या घटना ऐकू येत नाही, अर्थातच डीजेच्‍या आवाजामुळे हार्ट अटॅक येवून किंवा तत्‍सम कारणांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. अक्षरश: मागील काळात डीजेच्‍या आवाजामुळे नवरदेवाला आपला जीव गमवावा लागला आहे. राज्‍यात आणि देशात वारंवार डीजेमुळे मृत्‍यूमुखी पडणाऱ्यांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्‍ये लहान मुले, तरूण, वयोवृध्‍द अशा सर्वांचाच समावेश आहे.

DJ चे दुष्‍परिणाम !

डीजे मुळे हार्ट अटॅक, चक्‍कर येवून पडने, उलट्या होणे, कानाचा पडदा फाटने, बहीरेपणा येणे, हायपर टेंशन,रक्‍तदाब, ऱ्हदयाची धडधड, कानात शिटी वाजल्‍यासारखा आवाज येणे, चिडचिडेपणा, ड्रिप्रेशन असे अनेक आजार उदभवत असल्‍याचे डॉक्‍टरांचे म्‍हणणे आहे. अर्थातच आतापर्यंत डीजेच्‍या आवाजामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भिंत कोसळून मृत्‍यू !

डीजेचा आवाज अनेक पटींनी वाढवून नियम कायदे पायदळी तुडवले जात आहेत. अक्षरश: ज्‍या प्रमाणे भुकंपाचे हादरे घरांना बसतात त्‍याच प्रमाणे डीजेच्‍या आवाजामुळे आणि कंपनामुळे घरांना हादरे बसत आहेत, मागील काळात एका ठिकाणी डीजेच्‍या आवाजामुळे आणि कंपनामुळे एक भिंत कोसळून लहान मुलांचा जीव गेला होता, डीजेचा आवाज एवढा होता की, मुलांच्‍या रडण्‍याचा आणि ओरडण्‍याचा आवाज सुध्‍दा कोणालाच ऐकू आला नाही, त्‍यामुळे वेळीच त्‍यांना मदत मिळू शकली नाही किंवा तात्‍काळ दवाखान्‍यात घेवून जाता आले नाही.

बहीरेपणामुळे अडचणी !

DJ च्‍या आवाजामुळे बहिरेपणाचे प्रकार खुपच वाढले आहेत, एका युवकाला जास्‍तीच्‍या आवाजामुळे सुरूवातीला बहिरेपणाचा त्रास झाला, त्‍यानंतर तपासणी केली असता एका कानाचा पडदा निकामी झाल्‍याचे सांगण्‍यात आले, तर दुसऱ्या कानाच्‍या पडद्याचे ऑपरेशन करावे लागेल, मात्र खात्री देता येणार नाही असे डॉक्‍टरांनी सांगितले. सदरील युवकाच्‍या कानात कायम शिटी सारखा आवाज येत असून मागील अनेक महिन्‍यांपासून तो घरीच असल्‍याचे समोर आले आहे. म्‍हणजेच तरूणपणात काम धंदा करून कुटुंबाचा प्रपंच चालवणे आवश्‍यक असतांना नाईलाजाने त्‍याला घरी बसावे लागत आहे.

डॉक्‍टरांचे मत !

डीजे किंवा ध्‍वनी प्रदूषणाबाबत डॉक्‍टर सांगतात की, 70 डेसीबल मर्यादेपर्यंत आवाज कान सहन करू शकतात, 80 ते 100 मर्यादेचा आवाज कानावर सतत पडत राहिल्‍यास कानाची ऐकण्‍याची क्षमता कमी होती, तर 100 ते 120 डेसीबल दरम्‍यानच्‍या आवामुळे कानाचा पडदा फाटू शकतो, यामुळे चक्‍कर येवू शकते, सदरील प्रचंड आवाजामुळे कानाची जी नस ऱ्हदयाला जोडलेली असते ती स्टिम्‍युलेट होवून ऱ्हदयाचे ठोके बंद पडू शकतात आणि हार्ट अटॅक येवू शकतो. आश्‍चर्य म्‍हणजे आपल्‍याकडे 150 डेसीबल पेक्षा जास्‍त आवाजात डीजे वाजवला जात आहे.

ध्‍वनी तिव्रतेबाबत मानके :-

दिवसा (सकाळी 6 ते रात्री 10 वाजे दरम्‍यान) औद्योगिक परिसरात 75 डेसीबल आणि रात्री (रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत) 70 डेसीबल पेक्षा तिव्र ध्‍वनी नसावा. व्‍यावसायिक परिसरात दिवसा 65 डेसिबल आणि रात्री 55 डेसिबल पेक्षा जास्‍त तिव्र ध्‍वनी नसावा. तर रहीवासी परिसरात दिवसा 55 डेसीबल आणि रात्री 45 डेसिबल पेक्षा जास्‍त तिव्र ध्‍वनी नसावा. शांत परिसरात म्‍हणजे दवाखाने, शैक्षणिक संस्‍था, न्‍यायालये, धार्मिक स्‍थळे आदींच्‍या आसपास 100 मिटर परिसरात दिवसा 50 डेसिबल आणि रात्री 40 डेसिबल पेक्षा जास्‍त तिव्र ध्‍वनी नसावा अशी मानके उच्‍च न्‍यायालयाने घालून दिली आहेत.

डीजेची चढाओढ !

एकीकडे डीजेमुळे लोकांचे जीव जात आहेत आणि डीजेचे दुष्‍परिणाम समोर येत आहेत तर दुसरीकडे दोन डीजे मध्‍ये कोणाचा आवाज जास्‍त म्‍हणून चढाओढ लागत असल्‍याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तर एकाच जागी 4 – 4 डीजे वाजत असल्‍याचे दिसून येत आहे. म्‍हणजे आपण नेमकं करतोय काय याचं भान आपल्‍याला राहीलेलं नाही आणि कोणाच्‍या आरोग्‍याची किंवा जीवाची पर्वा सुध्‍दा आपल्‍याला राहीली नाही असेच एकूण परिस्थितीवरून दिसत आहे. बहुतांश लोकांचा या डीजेला विरोध आहे पण वाद नको म्‍हणून कोणी समोर येवून बोलत नाही.

वयोवृद्धांसह मुलांना त्रास !

कोणताही कार्यक्रम असो, सण उत्‍सव असो किंवा वाढदिवस असो, डीजे लावून नाचण्‍याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. आवाजाची मर्यादा नियमांपेक्षा कित्‍येक पटीने अधिक ठेवण्‍यात येत असल्‍याने अनेक किलामिटर पर्यंत आवाज जात आहे, प्रचंड आवाजामुळे घरातील वयोवृध्‍द व्‍यक्‍ती, लहान मुले यांच्‍यासह नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे, आवाजाची तिव्रता खूपच जास्‍त असल्‍यामुळे घरात, दुकानात ठेवलेल्‍या वस्‍तू सुद्धा खाली पडून नुकसान होत आहे.

स्‍वत:च्‍या मुलाचा जीव गेला तर !

डीजेच्‍या आवाजामुळे लहान मुले, तरूण, वयोवृध्‍द अशा सर्वांचेच जीव जात आहेत, दुसरे डीजे वाजवत आहेत म्‍हणून आम्‍ही पण वाजवत आहोत, आम्‍हालाच कशाला सांगता, त्‍यांनाही सांगा, इन्‍जॉय कधी करायचा ? असे वाक्‍य आपल्‍याला अधून मधून ऐकायला मिळत असतील. परंतू बेधुंद होवून नाचण्‍यासाठी आपण चुकीच्‍या गोष्‍टीचे समर्थन तर करत नाही ना ? याचा विचार संबंधितांनी करणे अत्‍यंत गरजेचे आहे. कारण आज दुसऱ्यांचे जीव चाललेत, उद़्या तुमचा मुलगा, भाऊ, वडील किंवा नातेवाईक यांचा डीजेमुळे जीव गेला तर तुम्‍ही याचे समर्थन करणार आहात का ? याचाही विचार करणे आवश्‍यक आहे.

घरातील प्रमुख व्‍यक्‍तींनी लक्ष घालावे !

कायद्याने डीजेवर अर्थातच ध्‍वनी प्रदुषण करण्‍यावर बंदी आहे. आतापर्यंत डीजे लावणाऱ्यांवर विविध पोलीस ठाण्‍यात गुन्‍हे सुध्‍दा दाखल झाले आहेत. अनेकदा डीजेच्‍या तालावर नाचणाऱ्यांमध्‍ये तरूणांसह अल्‍पवयीन मुले सुध्‍दा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्‍यामुळे जर आपल्‍या मुलाचा, भावाचा किंवा कुटुंबातील सदस्‍याचा जीव जावू नये असे वाटत असेल तर आत्‍ताच त्‍याला रोखणे आवश्‍यक आहे, कारण जीव गेल्‍यावर पश्‍चाताप करण्‍यात काहीच अर्थ नाही. शिवाय राजकीय नेत्‍यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही कार्यकर्त्‍यांना खुश करण्‍याच्‍या नादात या जीवघेण्‍या गोष्‍टीला समर्थन करू नये एवढीच अपेक्षा नागरिक व्‍यक्‍त करत आहेत.

पोलीसांनी कारवाई करावी !

एखाद्याला डीजे लावणे म्‍हणजे इन्‍जॉय करणे असे वाटत असेल तर पोलीसांनी तो गैरसमज दूर करणे आवश्‍यक आहे. स्‍वत : च्‍या इन्‍जॉय करण्‍याच्‍या गैरसमजामुळे दुसऱ्यांचे जीव जाणार असतील, नागरिकांना विविध आजार होणार असतील तर पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्‍यंत गरजेचे आहे. डीजेवर बंदी असतांनाही कोणी नियम कायद्याची पायमल्‍ली करत असेल, तसेच मा.न्‍यायालयाच्‍या आदेशाचा अवमान करत असेल तर पोलीसांनी संबंधितांवर कारवाई करणे आवश्‍यक आहे, नसता उद्या एखाद्याचा जीव गेल्‍यास ज्‍यांच्‍या हद्दीत घटना घडली त्‍या सन्‍माननीय अधिकाऱ्याने मा.उच्‍च न्‍यायालया समोर उत्‍तर देणे क्रमप्राप्‍त ठरणार आहे.


मुख्‍य पानावरील बातम्‍या वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!