एल्गार न्यूज :-
आजकाल मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे भयावह चित्र पहायला मिळत आहे, याच गोष्टीचा फायदा घेवून काही एजंट व त्यांची टोळी लोकांना फसवून लाखो रूपये उकळत असल्याचे वारंवार समोर येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातही अशीच एक फसवणूकीची घटना समोर आली आहे. अजय (नाव बदलेले आहे) हा 6 वर्षांपासून लग्नासाठी मुलगी बघत होता. अजय हा शेतकरी असून त्याचा विवाह जुडण्यास अडचणी येत होत्या.
अशातच लग्न जुळविणाऱ्या विजय गांधी या एजंटचा नंबर त्याला त्याच्या आत्याकडून मिळाला, गांधीने फीस म्हणून 15 हजार रूपये व तसेच मुलीकडील लोकांची जी ऑफर असेल त्यानुसार पैसे द्यावे लागतील असे अजयला सांगितले.
एजंटला होकार दिल्यानंतर एजंटने शारदा चव्हाण व पुंडलिक चव्हाण (मुलीचे मामा मामी) यांचा नंबर देत त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील मिरा अशोक पंडित ही मुलगी बघायचे असल्याचे सांगितले. अजयने आत्यासोबत 20 ऑक्टोबर रोजी मुलगी पाहुन पसंती दिली.
एजंट गांधी व चव्हाण मामा-मामीने 2 लाख रूपये लग्नासाठी द्यावे लागतील असे अजयला सांगितल्यावर अजयने होकार दिला. ठरल्याप्रमाणे 22 ऑक्टोबर रोजी रितीरिवाजा प्रमाणे विवाह संपन्न झाला.
मात्र 28 नोव्हेंबर रोजी पत्नी मिराने मला तुमच्या सोबतच रहायचे नाही, मला आईच्या घरी नेवून सोडा असा तगादा लावला, तुम्ही परत 50 हजार रूपये द्या तर मी तुमच्या घरी नांदते, नाहीतर राहत नाही असे तिने सांगितले. अजयने तिला सांगितले की, मी 2 लाख रूपये दिले आहे, मात्र पत्नीने सांगितले की, ज्या लोकांना तुम्ही पैसे दिले त्यांना माझ्याकडे घेवून या, त्या लोकांनी मला एक रूपयाही दिला नसल्याचे सांगितले.
हा सगळा प्रकार केवळ पैशांसाठी असून सर्वांनी मिळून फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर अजयने थेट वीरगाव पोलीस ठाण्यात धाव घेत आपबिती सांगितली. या प्रकरणी मिरा पंडित, पुंडलिक चव्हाण, शारदा चव्हाण व विजय गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बुधवारी मिरा पंडितला ताब्यात घेत अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संबंधित आरोपींनी कधी रोख तर कधी ऑनलाईन पैसे घेतल्याचे सांगितले जात आहे.
फसवणुकीपासून सावधान !
आजकाल अशा प्रकारची फसवणूकची प्रकरणे वारंवार समोर येत असल्यामुळे लग्नासाठी इच्छुक युवकांनी सावध राहणे आवश्यक आहे. युवकांची फसवणूक करून लाखो रूपये उकळणाऱ्या टोळ्या राज्यात आणि देशात कार्यरत असल्याचे एकूण परिस्थितीवरून दिसत आहे. त्यामुळे वेळीच सावधान होवून आणि योग्य ती माहिती घेवूनच पुढील पाऊल टाकणे योग्य ठरेल.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.