Your Alt Text

घनसावंगी मतदार संघाचा पुढचा आमदार कोण ? | Next MLA of Ghansawangi Constituency

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :-
विधानसभेसाठी अजून काही कालावधी आहे, कारण तत्‍पूर्वी लोकसभेच्‍या निवडणूका होणार आहेत, मात्र सुप्रीम कोर्टाचा निकाल काही वेगळा लागल्‍यास चित्र बदलू शकते आणि विधानसभा निवडणुक मुदतपूर्व सुध्‍दा होवू शकतात.

येत्‍या काळात काहीही घडामोडी घडण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही, ऐनवेळेला धावपळ करण्‍यापेक्षा आधीपासूनच तयारी म्‍हणून विधानसभेसाठी इच्‍छुक उमेदवारांनी आपापल्‍या मतदार संघात संपर्क वाढवल्‍याचे दिसत आहे.

सध्‍या विविध आंदोलने, उपोषणे इत्‍यादीमुळे काही अंशी मर्यादा आलेल्‍या असल्‍या तरी इच्‍छुक उमेदवार प्रिंट, इलेक्‍ट्रॉनिक व डिजिटल मीडियाच्‍या माध्‍यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. लोकांपर्यंत पोहोचण्‍यासाठी विविध उपक्रम सुध्‍दा राबविण्‍यात येत आहेत.

राजकारणातील उलटफेर :-

मागील दिड वर्षाच्‍या कालावधीत घडलेल्‍या घडामोडी राज्‍याच्‍या राजकारणात नक्‍कीच उलटफेर करणाऱ्या आणि सर्वसामान्‍य जनतेला बुचकळ्यात टाकणाऱ्या ठरल्‍या आहेत, कोणत्‍या क्षणी, कोणता नेता कोणत्‍या पक्षात असेल हे सांगणे सध्‍या थोडे अवघड होवून बसले आहे.

घनसावंगी मतदार संघात राजकीय समिकरणे ?

अर्थातच घनसावंगी मतदार संघात पुढचा आमदार कोण हे मतदार ठरवणार आहेत, परंतू मागील पंचवार्षिक पेक्षा यावेळी परिस्थिती वेगळी आहे, कारण शिवसेना सत्‍तेतही आहे आणि विरोधी पक्षातही आहे, तसेच राष्‍ट्रवादी कॉंग्रेस सुध्‍दा सत्‍तेतही आहे आणि विरोधी पक्षातही आहे. अर्थातच दोन्‍ही पक्षाचे दोन गट पडले आहेत.

घनसावंगी मतदार संघासाठी इच्‍छुक दावेदार कोण ?

मागील पंचवार्षिक पेक्षा घनसावंगी मतदार संघात यावेळी इच्‍छुकांची संख्‍या जास्‍त असणार आहे यात शंका नाही, अनेक इच्‍छुक उमेदवार आपापल्‍या परीने वरिष्‍ठांकडे आपली उमेदवारी मजबूत करण्‍यासाठी आतापासूनच प्रयत्‍नशील आहे. ऐनवेळी अनेक नावे समोर येणार असले तरी सध्‍या जे काही दावेदार आणि इच्‍छुक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत ते खालील प्रमाणे :-

माजी मंत्री राजेश टोपे हे सध्‍या घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे रनिंग आमदार आहेत, स्‍वत:चे कारखाने, शैक्षणिक संस्‍था, शाळा, महाविद्यालये तर आहेतच सोबतच मतदार संघातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांवरही त्‍यांची पकड आहे. शिवाय मतदार संघातही सक्रीय कार्यकर्ते कार्यरत आहेत. त्‍यामुळे ते प्रमुख दावेदार आहेत.

पूर्व अधिकारी म्‍हणून प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेले तसेच यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढवलेले हिकमत उढाण सुध्‍दा इच्‍छुक आणि प्रमुख दावेदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्‍या काही मतांनी ते निवडणूक जिंकू शकले नाहीत, त्‍यांनी मतदार संघात नव्‍याने कारखाना उभारला आहे. शिवाय त्‍यांचेही असंख्‍य सक्रीय कार्यकर्ते आहेत.

अंबड-घनसांवगी मतदारसंघाचे 2 वेळा प्रतिनिधीत्‍व केलेले माजी आमदार विलासराव खरात सुध्‍दा इच्‍छुक आणि प्रमुख दावेदार असल्‍याचे दिसून येत आहे. घनसावंगी मतदार संघात त्‍यांचे अनेक चाहते असून अनेक सक्रीय कार्यकर्ते सुध्‍दा आहेत.

माजी उपनगराध्‍यक्ष तथा पक्षाचे नेते सुनील आर्दड हे सुध्‍दा इच्‍छुक आणि प्रमुख दावेदार आहेत, यापूर्वी त्‍यांनी घनसावंगी मतदार संघातून निवडणूक लवढली होती, या मतदार संघात त्‍यांचे असंख्‍य चाहते आणि कार्यकर्ते असून त्‍यांचा असलेला जनसंपर्क त्‍यांना फायदेशीर ठरू शकतो. वरिष्‍ठ नेत्‍यांशी त्‍यांचे असलेले चांगले संबंध सुध्‍दा त्‍यांना उमेदवारी मिळण्‍यात सहाय्यक ठरू शकतात.

माजी आमदार तसेच पक्षाचे जेष्‍ठ नेते शिवाजीराव चोथे सुध्‍दा इच्‍छुक किंवा दावेदार दिसून येत आहेत. शैक्षणिक संस्‍थे अंतर्गत शाळा तसेच घनसावंगी येथे महाविद्यालय सुध्‍दा आहे. मध्‍यंतरी ते सक्रीय दिसून आले नसले तरी ते सुध्‍दा इच्‍छुक किंवा दावेदार असल्‍याचे बोलले जात आहे.

समृध्‍दी कारखान्‍याचे प्रमुख असलेले सतिष घाटगे हे सुध्‍दा विधानसभेसाठी इच्‍छुक असल्‍याची चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून ते मतदार संघात लोकांशी संपर्क साधतांना दिसून येत आहेत.

इतर अनेक इच्‍छुक !

या मतदार संघात इतर सुध्‍दा अनेक इच्‍छुक उमेदवार असून विविध पक्षातून अनेकजण इच्‍छुक आहेत. ज्‍यांना संबंधित पक्षातून उमेदवारी मिळणार नाही ते उमेदवार दुसऱ्या पक्षातून उमेदवारी घेवून निवडणूक लढण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही, बदललेली परिस्थिती पाहता निवडणूकीच्‍या आधी इच्‍छुकांच्‍या संख्‍येत वाढ होवू शकते.

सध्‍याचे राजकारण पाहता येथे इच्‍छुक व्‍यक्‍तींसोबत पक्षाचे नाव देण्‍यात आलेले नाही, आज जे चित्र दिसत आहे ते चित्र काही कालावधीनंतर दिसेलच याची खात्री देता येणार नाही. शिवाय वरिष्‍ठ पातळीवर काही बेरीज वजाबाकीचे गणित झाल्‍यास त्‍याचा परिणाम मतदार संघातील इच्‍छुक उमेदवारांवर सुध्‍दा होवू शकतो.

पुढचा आमदार कोण होणार ?

जो उमदेवार मतदार संघाचा सर्वांगिण विकास करण्‍याची क्षमता असल्‍याचे मतदारांना पटवून देण्‍यात यशस्‍वी ठरेल, तसेच ज्‍या उमेदवारामध्‍ये सर्वसामान्‍य जनतेचे प्रश्‍न सोडवण्‍याची धमक असेल आणि ज्‍याला मतदार आपला माणूस समजून त्‍याच्‍यावर बहुमताने शिक्‍कामोर्तब करतील तोच घनसावंगी मतदार संघाचा पुढचा आमदार होईल यात शंका नाही.

  • परवेज पठाण,
    संपादक, एल्‍गार न्‍यूज
व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!