Your Alt Text

जिल्‍हा परिषद यंत्रणा खळबळून जागी ! अशाच शिस्‍तप्रिय आणि कर्तव्‍यदक्ष अधिकाऱ्याची जालना जिल्‍ह्याला होती गरज !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्‍हा परिषदेची कुंभकर्णी झोपेत असलेली यंत्रणा जागी करण्‍याचे काम नव्‍याने जॉईन झालेल्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.एम.मिन्‍नू यांनी केल्‍याचे दिसत आहे. अक्षरश: ज्‍या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पायऱ्या चढता येत नव्‍हते, ज्‍यांना गुडघ्‍याचा त्रास होता, ते सुध्‍दा मागील २ दिवसात एखाद्या खेळाडू प्रमाणे ३ मजली इमारतीच्‍या पायऱ्या पटापट चढतांना दिसून येत आहेत.

बैठकांचा धडाका !

मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.एम.मिन्नू यांनी जॉईन होवून आठवडा उलटत नाही तोच बैठकांचा धडाका लावला आहे, वर्षानुवर्षे फाईलींवर साचलेली धूळ अचानक दिसेनाशी झाली आहे. मिन्‍नू यांनी प्रत्‍येक विभागाची स्‍वतंत्र बैठक घेवून विभागाचा आढावा घेवून संबंधित अधिकाऱ्यांना थप्‍पी लागलेल्‍या फाईलींबद्दल विचारणा केली. अर्थातच अनेकांकडे उत्‍तर नव्‍हते, त्‍यामुळे संबंधितांना कठोर शब्‍दांत कानउघडणी करण्‍यात आली आहे आणि वेळप्रसंगी कारवाईचा इशारा देण्‍यात आला.

शिस्‍तप्रिय आणि कर्तव्‍यदक्ष अधिकारी !

सीईओ पीएम मिन्‍नू जिल्‍हा परिषदेच्‍या मरगळलेल्‍या यंत्रणेला जागं करण्‍याचे काम हाथी घेतल्‍याचे दिसत आहे. दि.२१ रोजी त्‍यांनी जि.प. मधील प्रत्‍येक विभागांना भेटी दिल्‍या. तत्‍पूर्वीच प्रत्‍येक कर्मचाऱ्याला आपले ओळखपत्र सोबत ठेवण्‍याचे आदेश देण्‍यात आले होते, त्‍यानुसार सर्व कर्मचाऱ्यांच्‍या गळ्यात लेस अडकवलेले ओळखपत्र दिसून आले. म्‍हणजे यापूर्वी जिल्‍हा परिषदेत निवांत फिरणारा व्‍यक्‍ती हा अधिकारी, कर्मचारी आहे किंवा सामान्‍य माणूस आहे याचा थांगपत्‍ता लागत नव्‍हता. आधी जिकडे तिकडे पुड्या खावून थुंकलेले दिसत होतं, मात्र आता सगळीकडे स्‍वच्‍छता दिसत आहे, संपूर्ण बिल्‍डींग मध्‍ये कुठेही कचरा दिसून आला नाही. शॉट झालेले किंवा जळालेले बल्‍प अचानक प्रकाश देवू लागले, जळालेल्‍या वायरींग पुन्‍हा नव्‍याने बसवण्‍यात आल्‍याचे दिसले. परिसरातील वृक्षांना पाणी टाकण्‍यासाठी खड्डे नव्‍हते परंतू अचानक झाडाला गोलाकार खड्डे होत असल्‍याचे दिसून आले.

जनतेच्‍या समस्‍या ऐकल्‍या !

दिवसभर बैठका, कार्यालयांची तपासणी, संबंधितांना कानपिचक्‍या दिल्‍यानंतर ४ वाजेच्‍या सुमारास नागरिकांची निवेदने स्विकारली आणि त्‍यांना योग्‍य त्‍या कार्यवाहीचे किंवा दखल घेण्‍याचे आश्‍वासन दिले. पी.एम.मिन्‍नू मुळे यंत्रणा कामाला लागल्‍याचे पाहून जिल्‍हा परिषदेत येणाऱ्या शेतकरी व नागरिकांनी समाधान व्‍यक्‍त केले.

थोडंसं चुकतंय !

पी.एम.मिन्‍नू यांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्‍या बाबतीत योग्‍य ती भूमिका घेणे आणि यंत्रणेला शिस्‍त लावणे नक्‍कीच स्‍वागतार्ह आहे, परंतू भेटीला आलेल्‍या शेतकरी व नागरिकांना बोलतांना थोडा नम्रपणा ठेवावा. ज्‍या प्रमाणे सरसकट सर्वांसाठी त्‍यांची रफ भाषा दिसत होती ते कुठंतरी चुकतंय अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. आपल्‍या बोलण्‍यातून किंवा वागण्‍यातून अहंकार दिसू नये किमान एवढी काळजी त्‍यांनी घ्‍यावी अशी अपेक्षाही त्‍यांच्‍या भेटीला आलेल्‍या शेतकरी व नागरिकांनी दिली आहे.

पीएम मिन्‍नू यांच्‍या बद्दल थोडक्‍यात !

प्राप्‍त माहितीनुसार, पी.एम.मिन्‍नू ह्या केरळ राज्‍यातील आहेत. त्‍यांचे वडील राज्‍यात पोलीस अधिकारी होते, परंतू कर्तव्‍यावर असतांना त्‍यांचे निधन झाले, वडीलांची इच्‍छा होती की, पी.एम.मिन्‍नू सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी व्‍हावी, वडीलांची ही इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी मिन्‍नू यांनी प्रयत्‍न करून त्‍या सुरूवातीला पोलीस विभागात लिपीक पदावर रूजू झाल्‍या. तेव्‍हा त्‍या विवाहीत होत्‍या आणि त्‍यांना एक मुलगी देखील होती. त्‍याच दरम्‍यान त्‍यांनी बायो केमिस्‍ट्री मध्‍ये पदव्‍युत्‍तर पदवी घेतली. अशा परिस्थितीत त्‍यांना UPSC ची तयारी करणे सोपे नव्‍हते.

मात्र त्‍यांनी आपले प्रयत्‍न सुरूच ठेवले, त्‍यांचे पती जे की देशाची महत्‍वपूर्ण संस्‍था ISRO मध्‍ये अधिकारी आहेत. त्‍यांनीही कायम प्रोत्‍साहन दिले. अखेर अनेक वर्षांच्‍या परिश्रमानंतर मिन्‍नू ह्या १५० व्‍या रॅंकसह UPSC परीक्षा उत्‍तीर्ण झाल्‍या. जालना येथे जॉईन होण्‍यापूर्वी पी.एम.मिन्‍नू ह्या अमरावती जिल्‍ह्यात सहाय्यक जिल्‍हाधिकारी या पदावर कार्यरत होत्‍या. अर्थातच मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणून जबाबदारी सांभाळण्‍याची त्‍यांची ही पहिलीच वेळ आहे. पदभार घेवून अवघा आठवडा सुध्‍दा उलटल नसतांना त्‍यांनी आपल्‍या शिस्‍तप्रिय आणि कर्तव्‍यदक्षपणाची चुणूक दाखवत सगळी यंत्रणा कामाला लावल्‍याचे दिसत आहे. अर्थातच यामुळे नागरिकांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे.

घोटाळ्याची चौकशी होणार का ?

जालना जिल्‍हा परिषदेच्‍या पाणी पुरवठा विभागाने जिल्‍ह्यातील शेकडो गावांमध्‍ये केलेला “हर घर जल घोटाळा” एल्‍गार न्‍यूजने यापूर्वीच उघड केला असून त्‍याची माहिती सुध्‍दा नव्‍याने जॉईन झालेल्‍या सीईओ पीएम मिन्‍नू यांच्‍यापर्यंत पोहोचली आहेच. त्‍यामुळे आता या प्रकरणात त्‍या किती कठोर भूमिका घेवून कारवाई करतात हेच पाहणे महत्‍वाचे ठरणार आहे.

जिल्‍हावासीयांना अपेक्षा !

जालना जिल्‍ह्याचा इतिहास पाहता बहुतांश नवीन आलेल्‍या अधिकाऱ्यांना इकडची हवा लवकर लागते आणि अपवाद सोडल्‍यास चांगले अधिकारी सुध्‍दा मरगळलेल्‍या यंत्रणेप्रमाणे वागू लागतात आणि जैसेथेच परिस्थिती ठेवतात असे सांगितले जाते, परंतू पी.एम.मिन्‍नू यांच्‍या कामाची पध्‍दत पाहता त्‍या कायम इमाने इतबारे व कर्तव्‍यदक्षपणे आपली जबाबदारी पार पाडतील, जिल्‍ह्याच्‍या विकासामध्‍ये मोलाची भूमिका निभावतील, सर्वसामान्‍य जनतेचे प्रश्‍न मार्गी लावतील अशी जिल्‍ह्यातील जनतेची अपेक्षा आहे. जनतेची अपेक्षा त्‍या किती प्रमाणात पूर्ण करतात हा येणारा काळच ठरवेल, तो पर्यंत त्‍यांना एल्‍गार न्‍यूजच्‍या वतीने पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्‍छा… अर्थातच येत्‍या काळात काही चुकीचे घडत असल्‍याचे दिसल्‍यास एल्‍गार न्‍यूज आहेच…


इतर बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!