एल्गार न्यूज :-
ऑनलाईन च्या जमान्यात अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत मात्र या सुविधांचा दुरूपयोग सुध्दा वाढत असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन फसवणूकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने केंद्र सरकार या बाबतीत लवकरच महत्वपूर्ण पाऊल उचलणार आहे.
आजघडीला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केल्यावर क्षणात ते पैसे समोरील व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर होतात, मात्र जर समोरची व्यक्ती ऑनलाईन घोटाळा किंवा फसवणूक करणारी असेल आणि पाठविणाऱ्याच्या ते लक्षात आले तर काहीही करता येत नाही.
फसवणूक झाल्यावर पोलीसांत तक्रार देणे, फसवणूक करणाऱ्याचा शोध घेणे किंवा तपास करणे या वेळखाऊ आणि डोकेदुखी ठरणाऱ्या प्रक्रिया कराव्या लागतात, इतके करूनही गेलेले पैसे परत मिळतीलच याची शाश्वती देता येत नाही. हा सर्व प्रकार रोखण्यासाठी ऑनलाईनच्या प्रक्रियेत केंद्र सरकार महत्वपूर्ण असे पाऊल उचलणार आहे.
पैसे पाठवायला किती वेळ लागणार !
पहिल्यांदा कोणाला पैसे ट्रान्सफर करणार असाल तर सदरील प्रक्रिया पूर्ण होण्यास आता 4 तासांचा कालावधी लागणार आहे. या दरम्यान जर पैसे परत घ्यायचे असतील किंवा व्यवहार रद्द करायचा असेल तर तशी मुभा मिळणार आहे. म्हणजेच पैसे पाठवल्याबरोबर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत.
अनेकदा असे प्रकार समोर येत आहेत जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवतो आणि पैसे पाठवल्यावर तो व्यक्ती किंवा संस्था फसवी असल्याचे लक्षात येते, मात्र केंद्र सरकार जो निर्णय घेणार आहे त्यानुसार पैसे ट्रान्सफर केल्यानंतर 4 तासांचा वेळ लागणार आहे, जर या दरम्यान आपल्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे हा व्यवहार रद्द करता येणार आहे.
फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये 90 टक्के व्यवहारांमध्ये आपली फसवणूक झाल्याचे तासाभराच्या आत संबंधिताच्या लक्षात येते, पण तो पर्यंत व्यवहार पूर्ण झालेला असतो आणि पैसे समोरच्या व्यक्तीच्या खात्यात गेलेले असतात, शिवाय ते पैसे फसवणूक करणाऱ्याकडून तातडीने खात्यातून काढूनही घेतले जातात. त्यामुळे चोर पकडला तरी पैसे मिळतीलच याची शाश्वती नसते.
किती रक्कमेसाठी नियम !
सध्या केंद्र सरकार हे नियम 2000 रूपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यवहारासाठी लागू करणार असल्याचे कळते, म्हणजेच यापेक्षा लहान व्यवहार सुरळीतपणे सुरू राहतील, फसवणूक झालीच तर ती फार मोठ्या रक्कमेची होणार नाही. या योजनेला अंतिम स्वरूप मिळताच आयएमपीएस, आटीजीएस आणि युपीआय या यंत्रणांसाठी ती लागू केली जाणार आहे.
हजारो कोटींचे घोटाळे !
रिझर्व बँकेच्या सन 2022-23 च्या वार्षिक अहवालातील माहितीनुसार सदरील वर्षात ऑनलाईन फसवणुकीच्या 13 हजार 530 घटना देशभरात घडल्या असून यामध्ये 30,252 कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यापैकी 49 टक्के घटना म्हणजेच 6659 घटना डिजिटल किंवा कार्ड पेमेंट या प्रकारातून घडल्याचे समोर आले आहे. दर वर्षी अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार कडून उचलण्यात येणारे पाऊल महत्वाचे मानले जात आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.