Your Alt Text

कुंभार पिंपळगावात बाल कामगार ! शिक्षणाच्‍या आणि खेळण्‍याच्‍या वयात लहान मुले हॉटेल मध्‍ये कामावर !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
अल्‍पवयीन मुलांसाठी अनेक नियम कायदे करण्‍यात आलेले आहेत, लहान मुलांना कामावर ठेवणे गुन्‍हा आहे, बालकांना बालमजुरीपासून रोखण्‍यासाठी देशात बाल कामगार कायदा 1986 लागू करण्‍यात आलेला आहे. तसेच बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम सुध्‍दा लागू आहे. तरीही अनेकजण लहान किंवा अल्‍पवयीन मुलांना कामावर ठेवत आहेत.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील अनेक हॉटेल मध्‍ये अल्‍पवयीन मुलांना कामावर ठेवण्‍यात आले आहे. शिक्षणाच्‍या आणि खेळण्‍याच्‍या वयात या लहान किंवा अल्‍पवयीन मुलांना कामावर ठेवून नियम कायदे पायदळी तुडवले जात आहेत. 14 वर्षापेक्षा कमी वयाच्‍या मुलांना कामावर ठेवणे हा गुन्‍हा आहे, तरीही लहान अथवा अल्‍पवयीन मुलांना कामावर ठेवण्‍यात येत आहे.

कुंभार पिंपळगांव येथील बस स्‍थानक परिसरात असलेल्‍या काही हॉटेल मध्‍ये तसेच इतर काही ठिकाणी बाल कामगार दिसून आले आहेत. सदरील मुले ही 14 वर्षापेक्षा कमी वयाची आहेत. सदरील कामगार कायदा 1986 अन्‍वये 14 वर्षापेक्षा कमी वयाच्‍या मुलांना हॉटेल असो किंवा त्‍यांच्‍या आरोग्‍यासाठी चांगले नसेल अशा कोणत्‍याही कामावर ठेवता येत नाही.

बालमजुरीचे कारण !

बालमजुरीचे विविध कारणे समोर येत असले तरी प्रामुख्‍याने कुटुंबाची आर्थिक स्थिती वाईट किंवा हलाखीची असणे हे एक प्रमुख कारण दिसून येते. अनेकदा असेही दिसून येते की, कुटुंबातील कर्ता व्‍यक्‍ती काम करत नसल्‍यामुळे लहान किंवा अल्‍पवयीन मुले काम करताना दिसून येतात.

परंतू तरीही मुलांना कायद्यान्‍वये जन्‍मताच काही अधिकार प्राप्‍त होतात, ज्‍यामध्‍ये सक्‍तीचे शिक्षण, चांगले आरोग्‍य, स्‍वच्‍छ पाणी, निरोगी राहण्‍यासाठी स्‍वच्‍छ वातावरण इत्‍यादी सुविधाही मिळवण्‍याचा त्‍याला अधिकार आहे. अर्थातच या मुलांना अथवा मुलींना त्‍यांचे अधिकार मिळवून देण्‍याची जबाबदारी शासन आणि प्रशासनावर असते. देशातच नव्‍हे तर जगभरात 12 जून हा बालकामगार विरोधी दिन म्‍हणून पाळला जातो.

काय शिक्षा होवू शकते ?

प्राप्‍त माहितीनुसार अल्‍पवयीन मुलांना कामावर ठेवल्‍यास 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत कारावास किंवा 20 हजार ते 50 हजार रूपयापर्यंत दंड किंवा दोन्‍हीही शिक्षा होवू शकते. त्‍यामुळे बाल मजुरी रोखण्‍यास कार्यरत असलेल्‍या संबंधित विभागासह घनसावंगी पोलीस ठाणे किंवा कुंभार पिंपळगांव पोलीस चौकीने कुंभार पिंपळगांवात विविध ठिकाणी अल्‍पवयीन किंवा लहान मुले कुठे काम करत आहेत याची तात्‍काळ माहिती घेवून योग्‍य ती कारवाई करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!