एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
शासनाने रोजगार हमी योजना सुरू करून मोलमजुरी करणाऱ्यांना विविध प्रकारची कामे उपलब्ध करून हाताला काम मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रोजगार हमी योजना फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लागू झालेली आहे. अर्थातच जी कामे रोजगार हमी योजनेतून मंजूर आहे त्या कामांना रोहयोच्या नियमानेच करावे लागते.
परंतू घनसावंगी तालुका याला अपवाद ठरत आहे, कारण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ज्या विहीरी मंजूर करण्यात येत आहेत त्या विहीरी नियमान्वये कुशल आणि अकुशल अशा दोन्ही बाबींचा विचार करून करणे आवश्यक असतांना नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे.
4 लाखांचे अनुदान !
शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, पाण्याची कमतरता दूर व्हावी, शेतकरी सुखी व्हावा यादृष्टीने रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना विहीरीसाठी 4 लाखांचे अनुदान देण्यास सुरूवात केली आहे. रोहयोच्या माध्यमातून म्हणजे मजुराच्या माध्यमातून विहीर होईल जेणेकरून मजुरांनाही हाताला काम मिळेल आणि शेतकऱ्यांनाही विहीरीसाठी खर्च येणार नाही आणि विहीर झाल्यावर शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल असा या योजनेचा उद्देश आहे.
विहीरीच्या कामासाठी पोकलेन !
घनसावंगी तालुक्यात बहुतांश गावांमध्ये ज्या विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत त्या विहिरी रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या माध्यमातून करणे आवश्यक असतांना बहुतांश ठिकाणी सरळ सरळ पोकलेनच्या माध्यमातून विहीर खोदण्यात येत आहेत. रोजगार हमी योजना फक्त नावालाच दाखवण्यात येत असून सर्व काम पोकलेनच्या माध्यमातूनच करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.
जॉबकार्डचा खेळ !
रोहयो अंतर्गत विहीर मंजूर करून 4 लाखाचे अनुदान मिळवण्यासाठी रोहयोच्या नियमांचे पालन होत असल्याचे नावापुरते दाखवण्यासाठी कुटुंबातील किंवा गावातील अनेकांचे जॉबकार्ड बनवले जात आहेत. अर्थातच जॉब कार्ड असणाऱ्या व्यक्तीच्या नावावर मजुरीचे पैसे येतात हे पैसे संबंधित विहीर मंजूर झालेला व्यक्ती काढून घेतो.
एटीएम कार्डचाही वापर !
ज्या व्यक्तीचे जॉबकार्ड वापरण्यात आले आहे त्या व्यक्तीच्या बँक खात्यावर पैसे येतात त्यामुळे अनेकांनी तर वेगळी शक्कल लढवली आहे. बँकेतून संबंधित तथाकथित मजुराचे एटीएम कार्ड बनवण्यात आले आहेत, म्हणजेच शासनाकडून पैसे आले तर थेट कार्ड एटीएम मशीन मध्ये टाकून पैसे काढून घ्यायचे असा काही प्रकार दिसून येत आहे.
अपवादात्मक परिस्थिती वेगळी !
प्रत्यक्ष विहीर खोदतांना Hard Strata लागल्यास आणि ते खोदकाम अंगमेहनतीने करणे शक्य होणार नाही अशी खात्री पटल्यास संबंधित तांत्रिक सहाय्यकाने (मॅनेज न होता) तसा दाखला देणे आवश्यक आहे. मात्र सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून (अपवाद सोडून) सरसकट विहीरी पोकलेनच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
पोकलेन वेटींगवर !
घनसावंगी तालुक्यात विहीरीची कामे मोठ्या प्रमाणावर पोकलेनच्या माध्यमातून सुरू असल्यामुळे तालुक्यातील पोकलेनला 1 ते 2 महिन्याची वेटिंग आहे. याचाच अर्थ सदरील पोकलेनचे काम दिवसरात्र सुरू असूनही विहीरी वेटींगवर आहे. अर्थातच तालुक्यात एक दोन नव्हे तर अनेक पोकलेन सध्या सुरू आहेत.
अधिकाऱ्यांचे खिसे गरम !
विहीर काही सहजासहजी मंजूर होत नाही आणि मंजूरही झाली तर त्याची रक्कम सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी गावापासून पंचायत समितीपर्यंत अनेकांचे खिसे गरम करावे लागतात, ग्रामसेवक, संबंधित अभियंता, बीडीओ इत्यादींना मलाईचा नजराना दिल्यानंतर सर्वकाही सुरळीत होत असल्याचे सांगितले जात आहे.
वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का ?
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर विहीरीचे काम (अपवाद सोडल्यास) सरसकट पोकलेनच्या माध्यमातून करण्यात येत असल्यामुळे विभागीय आयुक्त, जालना जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच रोहयोचे अधिकारी इत्यादी वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून दोषींवर कारवाई करणार का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॅण्डम पध्दतीने कोठेही अचानक भेट दिल्यास सत्य परिस्थिती नक्कीच त्यांच्या समोर येईल.
आम्हाला कळवा…
घनसावंगी तालुक्यातील कोणत्याही गाव / सर्कल मध्ये शासकीय योजना व विकास कामे निकृष्ट दर्जाची होत असल्यास, गैर व्यवहार होत असल्यास किंवा नियमांची पायमल्ली होत असल्यास “एल्गार न्यूज” ला 9890515043 या क्रमांकावर संपर्क साधा… तसेच नियमित बातम्या मिळवण्यासाठी 9890515043 हा क्रमांक आपल्या व्हाट्सअॅप ग्रुप मध्ये अॅड करा…