एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
वर्षानुवर्षे एखादे गाव पाणी टंचाईच्या झळा सोसत असेल तर त्याला कोणी एक व्यक्ती जबाबदार असू शकत नाही, वर्षानुवर्षे खालपासून वरपर्यंत अनेक अधिकारी आले आणि गेले परंतू कायमस्वरूपी पाण्याची टंचाई दूर झाली नाही. मागील काही वर्षात जर प्रयत्न झाले असते तर आज घराघरात नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळाले असते आणि सध्याची पाणी टंचाई दिसून आली नसती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे वर्षानुवर्षे विशेष करून उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षीही पाणी टंचाई असल्यामुळे एल्गार न्यूजच्या वतीने वेळोवेळी बातम्या प्रकाशित करून महसूल प्रशासन व ग्रामपंचायतला पाणी टंचाई निदर्शनास आणून देण्यात आली. याची दखल घेवून प्रशासन व ग्रामपंचायतने गावात पाण्याचे टँकर पण सुरू केले. गावातील असंख्य नागरिकांना पाणी मिळत असल्याने नागरिकांनी प्रशासन व ग्रामपंचायतचे आभारही मानले आहेत. परंतू अजूनही गावातील असंख्य नागरिकांना पाणी मिळत नाही ही सुध्दा वस्तुस्थिती आहे.
अर्धे गाव वंचित !
जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांना पाणी मिळावे यासाठी निधीची तरतूद केलेली आहे. त्यानुसार प्रशासन व ग्रामपंचायतने मागील काही दिवसांपासून गावात पाण्याचे मोठे टँकर सुरू करून गावातील विविध भागात पाणी देण्यास सुरूवात केली आहे. यामुळे गावातील असंख्य नागरिकांना लाभ होत आहे यात शंका नाही. परंतू सदरील मोठे टँकर (ट्रक) फक्त मोठे रस्ते असलेल्या भागातच जावू शकतात. त्यामुळे छोट्या गल्ल्यांमध्ये राहणारे असंख्य नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहेत.
आकडेच सांगायचे असतील तर..!
सन 2011 ची जनगनणा झाल्यानंतर पुन्हा जनगणना झालेली नाही. 2011 च्या जनगणनेनुसार कुंभार पिंपळगावात जवळपास 1782 कुटुंब आहेत असे सांगितले जाते. खरं तर हे आकडे सुध्दा परिपूर्ण नाहीत, कमीत कमी 2000 कुटुंब तर त्यावेळेसच होते. कारण त्यावेळेस आसपासच्या गावातील अनेक नागरिकांनी कुंभार पिंपळगांवात राहत असतांनाही आपापल्या गावाची नोंद केली होती, त्यामुळे खरा आकडा समोर येवू शकला नाही असे स्थानिक नागरिक सांगतात. शिवाय मागील 13 वर्षात विभक्त झालेल्या कुटुंबांची संख्या व 13 वर्षात नव्याने स्थायिक झालेल्या कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अर्थातच आजघडीला जवळपास 3000 कुटुंब कुंभार पिंपळगावात राहत आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
प्रशासन किंवा ग्रामपंचायतकडून सांगण्यात आले आहे की, 1,44,000 लिटर पाणी दररोज वाटप करण्यात येत आहे. हे जरी खरे मानले तर प्रत्येक कुटुंबाला ढोबळमानाने 2 दिवसाआड 500 लिटर पाणी जरी गृहीत धरले तरी 1,44,000 लिटर पाणी / 500 लिटर प्रति कुटुंब = 288 कुटुंबाना एका दिवसात पाणी मिळते. दुसऱ्या दिवशी सुध्दा इतर 288 कुटुंबाना पाणी मिळत असेल तर 288 x 2 = 578 कुटुंब होतात. मग ग्रामपंचायत कडून कुंभार पिंपळगावातील 578 कुटुंबानाच पाणी देण्यात येत आहे का ? कुंभार पिंपळगावात 578 कुटुंबच राहतात का ?
आपण सन 2011 या वर्षाच्या जनगणनेनुसार 2000 कुटुंब जरी गृहीत धरले आणि ग्रामपंचायत 578 नव्हे तर 1000 कुटुंबांना पाणी देत असेल असे गृहीत धरले तरी 1000 कुटुंब वंचित राहतात. मग प्रशासन व ग्रामपंचायत फक्त अर्ध्या गावालाच पाणी पुरवत आहे का ? असा सवाल नागरिक करत आहेत.
लोकसंख्या जास्त !
कुंभार पिंपळगावची लोकसंख्या खऱ्या अर्थाने पाहिल्यास 20 हजाराच्या आसपास आहे. ढोबळमानाने प्रत्येक कुटुंबात 6 व्यक्ती जरी धरले तरी 20,000/6 = 3333 कुटुंब होतात. आपण फक्त 2000 कुटुंब संख्या जरी धरली तरी अर्ध्या गावाला सुध्दा पाणी मिळत नाही असे लक्षात येईल. 2000 कुटुंबांपैकी एका दिवशी 1000 व दुसऱ्या दिवशी 1000 कुटुंबांना पाणी द्यायचे असेल तर 5 लाख लिटर पाणी एका दिवसात लागेल, सध्या प्रशासनाच्या वतीने देण्यात येणारे पाणी दर दिवशी 1,44,000 लिटर आहे. मग एवढे पाणी दर दिवशी 1000 कुटुंबाना कसे पुरणार ? असा सवालही नागरिक करत आहेत.
छोटे टँकर असते तर…?
सद्यस्थिती पाहिल्यास प्रशासन व ग्रामपचायत कडून गावातील जवळपास अर्ध्या नागरिकांना पाणी देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. छोट्या गल्ल्यांमध्ये मोठे टँकर जात नसल्याने शिवाय प्रशासनाकडून छोटे (ट्रॅक्टर) टँकरही सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे असंख्य गोरगरीब, मजूर, कष्टकरी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे गावातील किमान अर्धी लोकसंख्या पाण्यापासून वंचित राहत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.
मग आता पुढच्या वर्षी का ?
मोठे टँकर आमच्या गल्ल्यांमध्ये येत नाही मग आम्ही पाण्यापासून वंचित रहायचे का ? खाजगी छोट्या टँकरवाले जसे पाणी पुरवतात त्या प्रमाणे प्रशासनाला छोट्या गल्ल्यांमध्ये पाणी पुरवणे शक्य नाही का ? उन्हाळा तर संपत आलाय, मग आम्हाला पुढच्या वर्षी पाणी देणार का ? असा सवाल वंचित नागरिक करत आहेत. त्यामुळे आता उर्वरित काही दिवसांसाठी का असेना प्रशासन व ग्रामपंचायत वंचित नागरिकांना पाणी देण्यासाठी काही पाऊले उचलते का हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या खाली पहा…
सूचना :-
सर्वांना कल्पना आहेच तरीही ज्यांना माहित नाही त्यांच्या माहितीस्तव सांगण्यात येत आहे की, एल्गार न्यूजचे संपादक परवेज पठाण यांचे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध असले तरी ते कोणत्याही पक्षाचे यापूर्वीही सदस्य नव्हते व आजही नाहीत. शिवाय ते कोणाचेही समर्थक अथवा विरोधकही नाहीत. एवढंच नव्हे तर 15 वर्षांच्या त्यांच्या एकूण पत्रकारितेवर सुध्दा एकही डाग नाही. नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक पत्रकारिता हेच एल्गार न्यूजचे ब्रीद वाक्य आहे… धन्यवाद…