एल्गार न्यूज :-
मराठा समाजाने सरकारच्या शब्दाचा मान राखला आहे, मात्र सरकारने आमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करू नये, सरकारने कोणाच्याही दबावात येवून आरक्षण देण्यास टाळाटाळ केली तर तुमची गाठ मराठ्यांशी आहे असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जालना येथे दि.1 रोजी आयोजित सभेत ते बोलत होते. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत, सरकारच्या शब्दाला मान देवून मराठा समाजाने तुम्हाला 24 डिसेंबरची तारीख दिली आहे, 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळालेच पाहीजे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणारही नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत, आम्ही आमच्या मागण्या शांततेच्या मार्गानेच शासनापर्यंत पोहोचवल्या आहेत, परंतू शासनाने आमच्या संयमाचा अंत पाहु नये, आमच्याशी दगा फटका केला तर सरकारला महागात पडेल असा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आरक्षण आमच्या हक्काचे !
माझा मराठा समाज 70 वर्षांपासून आरक्षणाचा हक्कदार असतांना त्याला आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे मराठा समाजाची असंख्य मुलं उच्च शिक्षण घेवूनही मोठ्या पदांपर्यंत पोहोचू शकली नाही. सरकारला आता राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे लागेल ते आमच्या हक्काचे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळ किंवा इतरांच्या दबावाखाली येवून मराठा आरक्षण देण्यात कसूर केल्यास तुमची गाठ या महाराष्ट्रातील मराठ्यांशी आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सरकारने मराठा समाजातील लोकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, आमच्या लोकांना विनाकारण अटक करणार असाल तर आम्ही सगळेच्या सगळे अटक व्हायला तयार आहोत असेही त्यांनी सांगितले.
भुजबळांवर प्रहार !
ओबीसींचा नेता म्हणवणाऱ्याने समाजासाठी काही न करता स्वत:चे भले करून घेतले, भुजबळ हे जातीयवाद करत असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाती जातीत तेढ निर्माण करणारा, दंगली भडकवण्याचा काम करणारा, कायदा तुडवणारा मंत्री म्हणजेच छगन भुजबळ असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.