एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
सर्व प्रकारच्या एक्झिट पोलला बाजुला सारून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत एक प्रकारे महायुतीची त्सुनामी आली आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांना राज्यातील जनतेने प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेवर बसण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली असून महायुतीच्या अपेक्षेपेक्षाही जास्त जागा निवडून आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्र सरकारची साथ आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही नेत्यांचा करिश्मा चालल्याचे दिसून येत आहे. मागील साधारण अडीच वर्षात महायुती सरकारने घेतलेले विविध निर्णय जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे आणि भविष्यातही महायुतीच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजना येतील या अपेक्षेने राज्यातील जनतेने महायुतीला भरभरून मतदान केल्याचे दिसत आहे.
जलदगतीने निर्णय !
महायुती सरकारने मागील साधारण अडीच वर्षात ज्या प्रकारे जलदगतीने विविध निर्णय घेतले तसेच विविध विकासकामे आणि योजनांची अंमलबजावणी केली ते पाहता राज्यातील जनतेने महायुती सरकारवर प्रचंड विश्वास दाखवत त्यांना पुन्हा सत्तेवर बसण्याचा मार्ग मोकळा केल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
जालना जिल्ह्यातही वर्चस्व !
जालना जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात महायुतीच्याच उमेदवारांचा विजय झाला आहे. जालना मतदारसंघातून माजी मंत्री तथा शिवसेनेचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांचा विजय झाला आहे. घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे डॉ.हिकमत उढाण यांनी विजयश्री खेचून आणला आहे. परतूर मतदारसंघात भाजपचे बबनराव लोणीकर विजयी झाले आहेत तर भोकरदन मतदारसंघात संतोष दानवे विजयी झाले आहेत. तसेच बदनापूर मतदारसंघात भाजपचे नारायण कुचे यांचाही विजय झाला आहे. जालना जिल्ह्यात शिवसेना व भाजपच्या अर्थातच महायुतीच्या सर्व उमेदवारांवर विश्वास टाकत मतदारांनी या उमेदवारांना संधी दिली आहे.
घनसावंगी मतदारसंघात अटीतटीचा सामना !
गेल्या 25 वर्षांपासून घनसावंगी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार) चे राजेश टोपे हे आमदार होते, राजेश टोपे हे यापूर्वी अनेकदा मंत्री राहिलेले आहेत. घनसावंगी मतदारसंघात त्यांचे वर्चस्व 25 वर्षे पहाला मिळाले परंतू यंदा शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ.हिकमत उढाण यांनी अटीतटीच्या सामन्यात राजेश टोपे यांचा पराभव करून राजेश टोपे यांच्या वर्चस्वाला खिंडार लावले आहे.
राज्यात ज्या प्रमाणे सर्व समाज घटकांनी महायुतीला मतदान केले त्याच प्रमाणे घनसावंगी मतदारसंघात देखील सर्वच जाती धर्माच्या मतदारांनी डॉ.हिकमत उढाण यांना मतदान करून आशिर्वाद दिल्याने त्यांचा विजय सुकर झाला. डॉ.हिकमत उढाण यांच्या विजया बद्दल महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी मतदारसंघात विविध ठिकाणी फटाके फोडून आणि जल्लोष करून आनंद साजरा केला.