एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
वरपासून खालपर्यंत यंत्रणेला किड लागलेली असल्यावर चांगल्या निर्णयाची आणि इमाने इतबारे कर्तव्याची अपेक्षा तरी कशी करावी ? गोरगरीब व कष़्टकऱ्यांना लुटणाऱ्यांनाही यंत्रणेतील अधिकारी पाठीशी घालणार असतील तर या लोकांनी अपेक्षा तरी कोणाकडून करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी जि.जालना) येथे दलालांकडून कुंभार पिंपळगांव आणि परिसरातील असंख्य गावातील कामगारांकडून नोंदणीसाठी 1000 व त्यापेक्षा जास्त रक्कम घेतली जात आहे. एवढंच नव्हे तर रिनिवल साठी सुध्दा कामगारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जात असल्याचे सांगितले जात आहे.
बहुतांश कामगार हे अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहेत, त्याचा गैरफायदा घेवून सदरील दलाल कामगारांची लूट करत आहेत. विशेष म्हणजे ज्या कामगारांचे रिनिवल करण्यात आले आहे त्याची पावती सुध्दा सदरील दलाल हे कामगारांना देत नाहीत, म्हणजे कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यातून कमिशन किंवा दलाली ठरलेली आहे.
आधे तुम्हारे आधे हमारे ?
कामगारांना शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे सदरील अनेक योजनाचा लाभ कामगारांना दिल्या जातो. मात्र सदरील कामगार हे शक्यतो अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असतात त्यामुळे त्यांच्या या गोष्टीचा गैरफायदा घेवून दलाल त्यांना मिळणाऱ्या लाभातून थेट अर्धे पैसे घेत असल्याचे दिसून येत आहे.
उदाहरणार्थ कामगरांना विवाहासाठी शासनाच्या सदरील कामगार मंडळाकडून जर 30 हजार मिळत असतील तर हे दलाल अर्धे म्हणजेच 15 हजार स्वत: ठेवत आहेत तर अर्धे पैसे म्हणजेच 15 हजार कामगाराला देत आहेत. एवढंच नव्हे तर इतर अनेक योजना अथवा आर्थिक लाभ या मंडळा तर्फे कामगारांना दिला जातो, ज्यामध्ये शिक्षण, उच्च शिक्षण, विविध कोर्स, आरोग्य, डिलीवरीसाठी पैसे, पेंशन, घरकुल, अपंगत्व आल्यास लाभ अशा अनेक योजना या मंडळा अंतर्गत आहेत. सदरील कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास सदरील दलाल अर्धे पैसे घेत असल्याचे सांगितले जात आहे.
घरीच कंप्यूटरवर नोंदणी !
दलालांनी राहत्या घरीच कंप्यूटर आणून त्याद्वारे नोंदणी सुरू केली असून गेल्या काही वर्षांपासून दलालीचा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे या दलालांनी फक्त कुंभार पिंपळगांव हे शहर मर्यादित ठेवले नसून कुंभार पिंपळगांव सर्कल मधील जवळपास 20 ते 30 गावांमधील कामगारांची नोंदणी केली जात आहे. शिवाय रिन्युअल पण दरवर्षी ठरलेले आहेच.
पेट्यांमध्ये सुध्दा घोळ ?
प्राप्त माहितीनुसार कामगारांना शासनाच्या सदरील मंडळाकडून विविध साहित्य असलेल्या पेट्या दिल्या जातात, ज्यामध्ये अनेक वस्तु असतात, मात्र ज्या संख्येने त्या मध्ये वस्तू असतात त्या पूर्ण न देता त्याचे प्रमाण कमी करून सदरील दलाल पेट्या वाटपाचे नियोजन करतात असेही सांगितले जात आहे.
दलालांची चांदी !
कुंभार पिंपळगांवात अनेक दलाल आहेत त्यापैकी मुख्य दलालाने कामगारांच्या या नोंदणी आणि विविध योजनांच्या (50/50) लाभातून RCC घर बांधले असून चार चाकी गाडी घेवून हे दलाल फिरत आहेत. मात्र अद्याप या दलालांकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. कामगार मंडळ या दलालांसाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी ठरत आहे.
कामगार कार्यालयाचा आशिर्वाद !
सदरील दलालांना कामगार कार्यालयाचा आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे. कारण या कार्यालयाच्या आशिर्वादा शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोंदणी, रिन्युअल आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देणे शक्य नाही. अर्थातच कामगार अधिकाऱ्यांची यामध्ये काहीच भुमिका नाही असे म्हणणे हास्यास्पद ठरेल.
कामगार अधिकारी कोणासाठी ?
जालना जिल्ह्याला लाभलेले कामगार अधिकारी हे दलालांसाठी तत्पर असतात अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. इतर सर्वसामान्य कामगारांचा त्यांच्याशी संपर्क होवू शकत नाही, मात्र दलाल मात्र त्यांच्याशी केव्हाही संपर्क साधू शकतात अशी प्रतिक्रियाही अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी लक्ष घालणार का ?
या सर्व प्रकाराबाबत जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनाही विषय लक्षात आणून देण्यात आला आहे. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनीही सदरील प्रकरणाची माहिती घेवून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
पुढील पंचनामा लवकरच…
इतर बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर किंवा खाली दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.