Your Alt Text

कुंभार पिंपळगांव येथील बैलांच्‍या बाजारात जुगाराच्‍या जाळ्यात ओढून शेतकऱ्यांची प्रचंड लूट करणाऱ्यांना कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीचा आशिर्वाद !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
ज्‍या उद्देशासाठी शासनाकडून कृषि उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांची निर्मिती करण्‍यात आली होती तो उद्देश म्‍हणजे शेतकऱ्यांचे हित आणि शेतकऱ्यांचा फायदा करणे होते, मात्र हा उद्देश बाजुला ठेवून उलट शेतकऱ्यांचीच लूट होत असतांना कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती उघड्या डोळ्याने पाहत असल्‍याचा प्रकार समोर आला आहे.

घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील बैलांच्‍या आठवडी बाजारात शेतकऱ्यांना मायाजाल मध्‍ये फसवून जुगार खेळणारे अक्षरश: हजारो रूपयांची लूट करीत असून या सर्व प्रकाराला कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीचा आशिर्वाद असल्‍याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे बुधवारी आठवडी बाजार असतो, या बाजाराच्‍या दिवशीच बैलांचा बाजार कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या परिसरात भरत असतो, खूप मोठा बाजार भरत असल्‍याने जालना जिल्‍ह्यासह इतर जिल्‍ह्यातील व्‍यापारी, शेतकरी सुध्‍दा या बाजारात येत असतात. सदरील बाजारात हजारो शेतकरी येत असून कोट्यावधींची उलाढाल होत असते.

कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या यार्डात असलेल्‍या या बाजारात फक्‍त बैलांचाच नव्‍हे तर भसार मालाची सुध्‍दा कोट्यावधी रूपयांची खरेदी विक्री होत असते. बैलांचा बाजार आणि भुसार मालाची खरेदी विक्री जवळच आहे. दोन्‍ही बाजारात कोट्यावधी रूपयांची खरेदी विक्री होत असते. याचाच फायदा घेवून जुगार खेळणारे लाल काळी / काळी पिळी, सोरट सारखे विविध जुगार खेळून अक्षरश: शेतकऱ्यांची लाखो रूपयांची लूट करत आहेत.

शेतकऱ्यांना आपल्‍या जाळ्यात ओढण्‍यासाठी जुगार खेळणाऱ्यांची एक टीमच असते, या टीम किंवा टोळी मधीलच काही जण लक्षात न येवू देता सुरूवातीला एक एक करून डावात सामील होतात, शिवाय शेतकऱ्यांसमोर पैसे जिंकण्‍याचा नाटक करतात, अर्थात शेतकऱ्यांना जाळ्यात ओढण्‍यासाठी कटकारस्‍थान रचले जाते, खेळणाऱ्याला अनेक पटीने खूप पैसे येत असल्‍याचा बनाव केला जातो आणि एक एक करून असंख्‍य शेतकऱ्यांना या जाळ्यात ओढले जाते आणि शेतकऱ्यांचे लाखो रूपये लुटले जातात.

शेतकरी बैलांची खरेदी विक्री करण्‍यासाठी व भुसार मालाची खरेदी विक्री करण्‍यासाठी या बाजारात येत असतात, शेतकऱ्यांकडे बैलांची विक्री केल्‍याचे किंवा भुसार मालाचे पैसे असतात, उदाहरणार्थ कोणाकडे 25 हजार, 50 हजार, एक लाख असे पैसे असतात, याचाच फायदा घेवून जुगार खेळणारे लोक हे शेतकऱ्यांना आपल्‍या जाळ्यात ओढून लूट करत असल्‍याचे दिसून येत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी आपले बैल विक्री करून आलेले पैसे या जुगारात गमावल्‍याचे इतर शेतकऱ्यांनी सांगितले. म्‍हणजेच बैलही गेला आणि पैसेही गेले अशी अवस्‍था शेतकऱ्यांची होत आहे. शिवाय भुसार माल विक्री केलेल्‍या शेतकऱ्यांनाही अशाच प्रकारे लुटले जात आहे. हा सर्व प्रकार अनेक महिन्‍यांपासून सर्रासपणे सुरू असून या गंभीर प्रकाराकडे कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती “अर्थपूर्ण” व्‍यवहारामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्‍याचे बोलले जात आहे.

कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीला हप्‍ता बांधलाय का ?

कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या आवारात गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून हा प्रकार सुरू असल्‍याचे शेतकरी सांगत आहेत. मग कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीने शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या अर्थात जुगार खेळणाऱ्यांकडून हप्‍ता बांधून घेतलाय का ? जर हप्‍ता बांधलेला असेल तर कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या कोणापर्यंत हा हप्‍ता जातो ? जर हप्‍ता बांधलेला असेल तर किती हप्‍ता येतो ? असा प्रश्‍न आता शेतकरी बांधव विचारत आहेत.

कृ.उ.बाजार समिती व स्‍थानिक पोलीसांचे संगणमत ?

कुंभार पिंपळगांव येथील बैलांच्‍या आठवडी बाजारात शेतकऱ्यांची अक्षरश: लूट केली जात असतांना कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती आणि स्‍थानिक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्‍यामुळे दोघांचेही संगणमत आहे का ? जुगार खेळणाऱ्यांसोबत दोघांचेही अर्थपूर्ण संबंध आहेत का ? असा सवाल शेतकरी करीत आहेत.

कारवाई कोण करणार ?

एकीकडे शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्‍याच्‍या गोष्‍टी करत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांची लूट होत आहे. स्‍थानिक पातळीवर अर्थपूर्ण संबंधांमुळे जाणीवपूर्वक होत असलेले दुर्लक्ष पाहता पणन विभाग व पोलीस प्रशासनाच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गांभीर्यपूर्वक लक्ष देवून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.


इतरही महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!