Your Alt Text

सौर (सोलर) कृषीपंप योजनेत गैरव्‍यवहार ?शेतकऱ्यांची लूट करून विद्युत कंपनीचा कर्मचारी अवघ्‍या काही महिन्‍यातच झाला करोडपती ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
सौर कृषी पंप हे सौर उर्जेवर चालणारे पंप असून शेतकऱ्यांना दिवसा विहीर, बोअरवेल इ. मधून पाण्‍याचा उपसा करणे शक्‍य असल्‍यामुळे शासनाने सौर कृषी पंप योजना सुरू केली. या योजनेला महाराष्‍ट्रात शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला, आता तर शासनाने मागेल त्‍याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेतून काही एजंटांनी शेतकऱ्यांची प्रचंड लूट करून कोट्यावधी रूपये कमवल्‍याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, शेतकऱ्यांना दिवसा शेती पंप चालवता यावा म्‍हणून केंद्र आणि राज्‍य शासनाने मागील काळात सोलार पंप योजना सुरू केली, सदरील सौर कृषी पंपाच्‍या माध्‍यमातून शेततळे, विहीर, बोअरवेल इ. शाश्‍वत पाण्‍याच्‍या स्‍त्रोतातून दिवसा पाण्‍याचा उपसा करणे शक्‍य असल्‍यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला. राज्‍यभरातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले, सुरूवातीला सौर कृषी पंप मिळण्‍यास उशीर लागत होता, हीच बाब लक्षात घेवून काही एजंटांनी आपले खिसे गरम करून शेतकऱ्यांची लूट केल्‍याचे समोर आले आहे. अर्थातच आज रोजी सुध्‍दा शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे.

गैरव्‍यवहार कसा ?

कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) सर्कल मधील एका गावात विद्युत कंपनीचा ऑपरेटर (Outsourcing) म्‍हणून कार्यरत असलेला कर्मचारी अवघ्‍या एक ते दिड वर्षात शेतकऱ्यांची लूट करून कोट्याधीश झाला आहे. बाह्य यंत्रणेद्वारे का असेना परंतू विद्युत कंपनीत कार्यरत असल्‍याचा फायदा घेवून संबंधित कर्मचाऱ्याने विविध सोलर कंपनीची एजन्‍सी घेवून घनसावंगी तालुक्‍यातील शेतकऱ्यांची प्रचंड लूट केल्‍याचे समोर आले आहे.

सदरील कर्मचाऱ्याने विविध कंपनीची एजन्‍सी घेतली असून शेतकऱ्यांनी सोलर (सौर कृषी पंप) चा ऑनलाईन फॉर्म भरतांना कोणत्‍याही कंपनीची निवड केल्‍यास शक्‍यतो याच कर्मचाऱ्याकडे सोलार पंप देण्‍याचे अर्थपूर्ण नियोजन करण्‍यात आल्‍यामुळे शेतकरी नाईलाजाने या कर्मचाऱ्याकडे जात आहेत. सदरील कर्मचाऱ्याकडे शेतकरी गेल्‍यास ठराविक रक्‍कम दिल्‍यावरच त्‍या शेतकऱ्याचे काम होत आहे. विशेष म्‍हणजे सदरील कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला एक सोलार पंप दिल्‍यावर संबंधित एजन्‍सी (कंपनी) द्वारे मोठी रक्‍कम सुध्‍दा कमिशन म्‍हणून या कर्मचाऱ्याला मिळत असते. म्‍हणजेच दोन्‍ही बाजुने या कर्मचाऱ्याने फायदा उचलला आहे व आज रोजी सुध्‍दा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे.

कुं.पिंपळगावात गोडाऊन !

सदरील कर्मचारी हा मोठ्या प्रमाणावर सौर कृषी पंपाची आयात करत असून सदरील सौर कृषी पंप सेट हे जास्‍त संख्‍येने मोठमोठ्या ट्रक आणि कॅंटर मधून मागविले जात असल्‍याचे दिसत आहे. त्‍यासाठी सदरील कर्मचाऱ्याने कुंभार पिंपळगांवात एका ठिकाणी सौर कृषी पंप ठेवण्‍यासाठी मोठा गोडाउन केला आहे. म्‍हणजेच कोणाला कधी सौर कृषी पंप द्यायचे हे या कर्मचाऱ्याच्‍या मनावर आहे.

कोट्यावधीचा खेळ !

घनसावंगी तालुक्‍यातील बहुतांश गावांमध्‍ये सदरील कर्मचारी सौर कृषीपंप पंप देत आहे, अर्थातच या कर्मचाऱ्याकडे संबंधित शेतकऱ्यांची यादी असल्‍यामुळे एक तर हा कर्मचारी स्‍वत: संपर्क साधत आहे किंवा शेतकरी या कर्मचाऱ्याला संपर्क साधत आहेत, एकदा संपर्क झाला की, देण्‍या-घेण्‍याचं फायनल होत आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार आता पर्यंत विद्युत कंपनीच्‍या या कर्मचाऱ्याने कुंभार पिंपळगांव सर्कल मधील विविध गावांसह घनसावंगी तालुक्‍यात हजारो शेतकऱ्यांना सोलार पंप दिले आहेत.

सदरील विद्युत कंपनीच्‍या कर्मचाऱ्याला सोलर (सौरपंप) कंपनी कडून प्रत्‍येक शेतकऱ्यामागे हजारो रूपयांचे कमिशन मिळत असून शेतकऱ्याकडूनही सदरील कर्मचारी नियमबाह्यपणे हजारो रूपये घेत आहे. याचाच अर्थ या कर्मचाऱ्याने शासनाच्‍या या सौर कृषी पंप योजनेतून कोट्यावधी रूपये कमवले आहेत. सदरील प्रकरणाचा सखोल तपास झाल्‍यास कोट्यावधीचा रूपयांचा गैरव्‍यवहार किंवा भ्रष्‍टाचार समोर येणार आहे.

आशिर्वाद कोणाचा ?

शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन फॉर्म भरल्‍यास सहजासहजी सौर (सोलर) कृषी पंप मिळत नाही, परंतू या कर्मचाऱ्याला दक्षणा दिली की, तातडीने सौर कृषी पंप मिळत असल्‍याचे दिसून येत आहे. केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या या कृषी पंपाच्‍या योजनांची अंमलबजावणी करण्‍यासाठी केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या स्‍वतंत्र यंत्रणा आहेत, ज्‍या यंत्रणेचे कृषी पंप आहे त्‍यांनी मंजुरी दिल्‍यावर सदरील कृषी पंप शेतकऱ्याला मिळत असते.

मात्र या कर्मचाऱ्याचा खिसा गरम केला की, मंजुरी मिळून कृषी पंप काही दिवसातच शेतात फिट होत आहे. मग केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या दोन्‍ही यंत्रणांमधील लोकांपर्यंत या कर्मचाऱ्याने दक्षणा किंवा प्रसाद पोहोचवण्‍याचे नियोजन करून ठेवले आहे काय ? वरील यंत्रणेपर्यंत प्रसाद पोहोचवल्‍या शिवाय हा कोट्यावधीचा गोंधळ असाच सुरू आहे का ? विद्युत कंपनी अधिकाऱ्यांच्‍या आशिर्वादा शिवाय हे शक्‍य आहे का ? एवढंच नव्‍हे तर अशा प्रकारे एखाद्या कर्मचाऱ्याला एजन्‍सी घेवून असा अर्थपूर्ण गोंधळ करता येतो का ? असाही प्रश्‍न यानिमित्‍ताने उपस्थित होत आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!