एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव आणि सर्कलच्या गावांमध्ये अवैधरित्या खाजगी सावकारी सुरू असून सदरील खाजगी सावकार हे शेतकरी, गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांची लूट करत असल्याचे बोलले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार कुंभार पिंपळगांव आणि सर्कल मध्ये गुपचुपपणे अवैध खाजगी सावकारी सुरू आहे. अडचणीत सापडलेल्या गोरगरीब लोकांना व शेतकऱ्यांना बँकेपेक्षा कितीतरी पटीने जास्त व्याजाने पैसे देवून आर्थिक व मानसिक छळ केला जात असल्याचे बोलले जात आहे.
सदरील काही खाजगी सावकार बँकेपेक्षा अनेक पटीने जास्त व्याज वसुल करून कर्जदारांचे आर्थिक शोषण करीत आहेत. गोरगरीब लोकांनी वेळेवर पैसे न दिल्यास चक्रवाढ व्याजाने त्यांचे पैसे वसूल केले जात आहेत. अनेकजण तर त्यांच्याकडे मालमत्ता किंवा इतर कागदपत्रेही गहाण ठेवत असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात विना परवानगी खाजगी सावकारी करणे गुन्हा आहे. मात्र ग्रामीण भागात कायदे, नियमांना धाब्यावर बसवून राजरोसपणे अवैधरित्या खाजगी सावकारी केली जात आहे. खाजगी सावकार हे दमदाटी, गुंडगिरी व धाक दाखवून गोरगरीब व शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असतात.
महिन्याला व्याज !
बँकेने कर्ज दिल्यास द.सा.द.शे. म्हणजेच वर्षाला व्याज लावत असते, परंतू अवैधरित्या कार्यरत सदरील खाजगी सावकार हे महिन्याला प्रचंड व्याज लावून वसुली करत असतात, महिन्याला बँकेपेक्षा अनेक पटीने जास्त व्याज लावून अक्षरश: लूट केली जाते.
अडचणीचा गैरफायदा !
अनेकदा शेतकरी व गोरगरीब जनतेला सहजासहजी आणि वेळेवर बँकेकडून कर्ज मिळत नाही. एखाद्याला अडचणीच्या वेळेत तात्काळ पैशांची आवश्यकता असते अशावेळी लोक खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतात. मात्र सदरील व्याज हे किती जास्त आहे आणि ते किती वाढणार आहे याचा अंदाजही लोकांना नसतो, घेतलेल्या पैशाला चक्रवाढ व्याज सुरू असतो आणि लोक चक्रव्युहात अडकून हतबल होतात.
सावकारी विरूध्द कायदा !
अवैधरित्या खाजगी सावकारी करणाऱ्या विरूध्द राज्य सरकारने 2014 मध्ये खाजगी सावकारी कायद्यात सुधारणा करून कायदा अधिक कठोर केलेला आहे. मात्र तरीही ग्रामीण भागात खाजगी सावकार अनेक पटीने व्याज घेवून शेतकरी व सर्वसामान्यांची पिळवणूक करत असतात.
कोट्यावधींची माया ?
कुंभार पिंपळगांव आणि सर्कल मधील अनेक खाजगी सावकारांनी मागील काही वर्षात गोरगरीब शेतकरी व सर्वसामान्यांची लूट करून लाखोंची अथवा कोटींची माया जमवल्याचे बोलले जात आहे. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडून अनेकदा काहीतरी म्हणजेच घर, जमीन किंवा इतर वस्तू गहाण ठेवली जाते, त्यामुळे नागरिक तक्रार करणे टाळतात.
सावकारांविरूध्द तक्रार करा !
गोरगरीबांनी, शेतकऱ्यांनी अथवा सर्वसामान्य नागरिकांनी जर खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले असेल आणि तो जास्त व्याज लावत असेल तर त्याच्या विरूध्द तालुकास्तरावर तहसीलदार किंवा सहाय्यक निबंधक किंवा जिल्हास्तरावरील जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार करावी. नागरिक पोलीस स्टेशनला सुध्दा तक्रार करू शकतात.
सहाय्यक निबंधक हे पोलीस कर्मचाऱ्यांसह पथक तयार करून संबंधित खाजगी सावकाराच्या घरावर छापा टाकून त्याच्याकडील सर्व कागदपत्रांची छाननी करू शकतात, त्यांना यामध्ये काही चुकीचे आढळून आल्यास अवैधरित्या खाजगी सावकारी करणाऱ्या विरूध्द कारवाई करण्यात येते अथवा गुन्हा सुध्दा दाखल केला जातो.
कायद्याचे राज्य !
कोणी किती मोठा असला, कितीही गुंड प्रवृत्तीचा असला तरी आपण लोकशाही मध्ये जगत आहोत आणि हे कायद्याचे राज्य आहे, त्यामुळे प्रत्येकाला घटनेनुसारच चालावे लागेल, नियम कायदे धाब्यावर बसवून कोणी गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची लूट करत असेल तर त्याची थेट तक्रार करावी आणि सावकाराच्या जोखडातून मुक्त व्हावे असे आवाहन प्रशासनासह समाजसेवकांनी केले आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.