जेव्हा एखादा व्यक्ती लोन अॅप वरून कर्ज घेत असतो, तेव्हाच त्याचा मोबाईल हॅक होत असतो, त्यामुळे त्यातील संपर्क, फोटो, व्हिडीओ, गोपनीय माहिती सर्वकाही अॅप कंपनीकडे जाते. कर्जदार अनेक पटीत असलेल्या वाढीव व्याजासह पैसे भरण्यास तयार नसल्यास, त्याला आधी वारंवार फोन करून हैराण केले जाते, मानसिक छळ केला जातो.
अपशब्द वापरले जातात, शिवीगाळ केली जाते, महिलांबाबत अनुदगार काढले जातात. शिवाय मोबाईल मध्ये असलेल्या कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार, शेजारी इत्यादी लोकांना फोन करून त्यांचाही छळ करण्याची धमकी दिली जाते आणि प्रत्यक्षात ते केले सुध्दा जाते.
त्यानंतर पुढचा भयंकर पर्याय वापरला जातो, सदरील कर्जदाराचे मॉर्फ केलेले नग्नावस्थेतील फोटो त्याच्या क्रमांकावर पाठवून इतर ठिकाणी वायरल करण्याची धमकी दिली जाते, मॉर्फ केलेले फोटो म्हणजे चेहरा तुमचा परंतू शरीर दुसऱ्यांचे असते, तुमच्या चेहऱ्याचा वापर करून अत्यंत आपत्तीजनक, अपमानजनक फोटो बनवले जातात आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली जाते.
आतापर्यात आत्महत्या झालेल्या बहुसंख्य प्रकरणात हेच मुख्य कारण आहे. सदरील कंपन्या ह्या विदेशी असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास तपास यंत्रणा कमी पडतात, अॅप कंपन्या विदेशी असल्या तरी त्यांचे एजंट मात्र स्थानिकच असतात, कर्जदारांना ब्लॅकमेल करण्याचे कामही सदरील एजंट करत असतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या या रॅकेटपर्यंत पोलीस किंवा इतर यंत्रणा पोहोचू शकत नाही, त्याचाच फायदा या अॅप कंपन्या घेतात, असंख्य अॅप कंपन्याची तर आरबीआयडे नोंदच केलेल्या नाहीत. मुंबई पोलीसांनी काही अॅप बंद करण्याची कारवाई केली असली तरी इतर अनेक अॅप्स सुरूच आहेत.
अतिशय नियोजनपूर्वक चालणाऱ्या या डिजीटल लोन रॅकेट विरोधात तपास यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यांना संगठीत गुन्हेगारीचाही कायदा लावणे आवश्यक आहे. सरकारनेही अशा अॅप्सवर तात्काळ बंदी आणण्याबाबत आणि स्थानिक एजंटासह कंपनीविरोधात कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे.
एकूणच झालेल्या आत्महत्या आणि होणारे संतापजनक प्रकार लक्षात घेवून तरूणांसह नागरिकांनी अशा अॅपच्या अमिषाला बळी पडू नये, कोणत्याही कंपनीने तात्काळ कर्ज देण्याचे अमिष दिले तरी घेवू नये किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती शेअर करून नये किंवा त्यांचा अॅप मोबाईल मध्ये घेवू नये. कारण प्रश्न आपल्या जिवाचा आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.