एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कुंभार पिंपळगांव येथे कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे, गेल्या 15 दिवसांपासून घंटागाडी बंद असल्याने घराघरात कचरा साचत असून जागोजागी कचऱ्याचे ढिग सुध्दा दिसत आहेत.
वारंवार कचऱ्याची घंटागाडी बंद पडत होती, मात्र त्याच्याकडे ग्रामपंचायतने लक्ष दिले नाही, आता घंटागाडीचे काम जास्त असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे आता घराघरातील कचरा उचलण्याचे काम बंद आहे. त्यामुळे नागरिक जेथे जागा मिळेल तेथे कचरा टाकत असल्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.
जागोजागी कचरा दिसत असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने कोणत्याही प्रकारची पाऊले उचलली नसल्यामुळे आता कचरा ग्रामपंचायत समोर आणून टाकायचा का ? असा सवाल नागरिक करत आहेत.
2 घंटागाडीची आवश्यकता
कुंभार पिंपळगांवची लोकसंख्या अंदाजे 15 ते 20 हजार आहे. एवढ्या मोठ्या गावाला आतापर्यंत फक्त एकच घंटागाडी आहे, एका वार्डाचा नंबर आज असेल तर त्या वार्डाचा नंबर पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही, कारण गाव खूप मोठे आहे.
गावाचा विस्तार चारही बाजूने होत असतांना ग्रामपंचायत मात्र स्वच्छतेच्या दृष्टीने विशेष असे कोणतेही प्रयत्न करतांना दिसत नाही, ज्या प्रमाणे गावात विकास कामे होणे अपेक्षित आहे ते होतांना दिसत नाही. दरवर्षी केंद्र आणि राज्य शासनाचा कोट्यावधीचा निधी येवूनही हा पैसा जातो कुठे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
ग्रामसेवकाचे दर्शन दुर्लभ !
कुंभार पिंपळगांवला असलेले ग्रामविकास अधिकारी आठवड्यातून फक्त 2 दिवस गावात येत असल्याचे सांगितले जात आहे, तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या गावाला फक्त 2 दिवस ग्रामविकास अधिकारी येत असतील तर गावाचे प्रश्न कसे सुटणार आणि गावाचा विकास कसा होणार ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
समन्वय नाही !
सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. गावात कोणते विकास कामे करायची आहेत ? ग्रामसेवक फक्त 2 दिवस का येतात ? कचऱ्याची समस्या, पाण्याची समस्या, स्वच्छता, योजना व विकास कामे तसेच इतर समस्या सोडवण्याबाबत योग्य तो समन्वय किंवा चर्चा होत नसल्याचेही बोलले जात आहे.
वर्षानुवर्षे पहिला पाढाच सुरू राहणार असेल तर गावाचा सर्वांगिण विकास होणार कसा ? एवढा मोठा गाव असतांना स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी असावा म्हणून साधे प्रयत्न सुध्दा होतांना दिसत नाहीत, शिवाय पंचायत समिती स्तरावरूनही कोणत्याही प्रकारची पाऊले उचलली जात नाहीत. त्यामुळे गावाचा सर्वांगिण विकास खुंटला आहे. इच्छाशक्ती आणि सामुहीक प्रयत्नाशिवाय गावाचा विकास कसा होणार हाच खरा प्रश्न आहे.
स्वतंत्र ग्रामसेवकाची मागणी नाही !
तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कुंभार पिंपळगांवला स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी असणे अत्यंत गरजेचे आहे, कारण त्याशिवाय गावाचा विकास करण्यात मर्यादा येतात, मात्र स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी हवा म्हणून ग्रामपंचायत कडून तशी मागणी नाही, मागणी आल्यास विचार करू असे गटविकास अधिकारी श्री.कदम यांनी सांगितले.
अर्थातच एवढ्या मोठ्या गावाला स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी असावा याचे महत्व बीडीओ यांना सुध्दा लक्षात आलेले नाही. मागणी आली तरच विचार केला जाईल, म्हणजे मागणी आली नाही तर गावाला असेच वाऱ्यावर सोडून द्यायचे कदाचित अशीच त्यांची मानसिकता असावी असे एकूण त्यांच्या बोलण्यावरून दिसत आहे.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.