Your Alt Text

3 कोटी रू. पाण्‍यात जाणार का ? जांबसमर्थ ते परतूर तालुका सरहद्द या रस्‍त्‍याचे काम निकृष्‍ट दर्जाचे !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
समर्थ रामदास स्‍वामींचे जन्‍मस्‍थान असलेल्‍या श्रीक्ष्‍ोत्र जांबसमर्थ ते परतूर तालुका सरहद्द पर्यंतचे काम सध्‍या निकृष्‍ट दर्जाचे होत असल्‍याचे प्रथमदर्शनी दिसत असून कामाचा दर्जाचा पाहता शासनाचे 3 कोटी रूपये पाण्‍यात जाणार का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, जांबसमर्थ (ता.घनसावंगी, जि.जालना) ते परतूर तालुका सरहद्द पर्यंत (रा.मा.223) रस्‍त्‍याचे काम सध्‍या सुरू आहे, या कामाचे भुमिपूजन दि.22/07/2022 रोजी माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्‍या हस्‍ते झाले होते. मात्र आता 2 वर्षानंतर या कामाला मुहूर्त लागला आहे, भुमिपुजनाच्‍या फलकानुसार सदरील काम हे 3 कोटीचे आहे. एवढे बजेट असतांनाही सध्‍या जे काम करण्‍यात येत आहे ते अत्‍यंत निकृष्‍ट दर्जाचे होत असल्‍याचे प्रथमदर्शी दिसत आहे.

सदरील कामात रस्‍त्‍याच्‍या रूंदीकरणासह सुधारणा करणे आवश्‍यक असतांना थातूरमातूरपणे काम उरकून घेण्‍याचा प्रयत्‍न दिसत आहे. सद्यस्थितीत आधीच्‍या रस्‍त्‍यावर अर्ध्‍या भागात खडी टाकण्‍यात आली असून थातूरमातूरपणे काम करण्‍यात येत आहे. शिवाय साईड पंखे नियमानुसार योग्‍य प्रकारे भरणे आवश्‍यक असतांना त्‍याकडेही दुर्लक्ष करण्‍यात आले आहे.

निकृष्‍ट दर्जाचे काम !

ज्‍या प्रकारे निकृष्‍ट दर्जाचे सध्‍या काम सुरू आहे ते पाहता हा रस्‍ता जास्‍त दिवस टिकेल याची शक्‍यता कमी आहे. थातूरमातूरपणे एखादे लेयर रस्‍त्‍यावर टाकून काम उरकून बिले काढण्‍याचा हा प्रकार दिसून येत आहे. गेल्‍या अनेक वर्षांपासून चांगल्‍या कामाच्‍या प्रतिक्षेत असलेला हा रस्‍ता दर्जाहीन होत असल्‍याने अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कामाला एवढा उशीर का ?

कामाचे भुमिपुजन होवून 2 वर्षे उलटले परंतू अद्याप हे काम पूर्ण झाले नाही, 3 कोटी रूपयाचे बजेट कमी होते की काय त्‍यामुळे कदाचित बजेट वाढवून घेण्‍यासाठी काम पेंडींग ठेवण्‍यात आले असावे असे नागरिक सांगत आहेत. कसे बसे आता काम सुरू झाले आहे तर ते सुध्‍दा निकृष्‍ट दर्जाचे होत असल्‍याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

आशिर्वाद कोणाचा !

संबंधित गुत्‍तेदाराला थातूरमातूरपणे काम करून 3 कोटी घशात घालण्‍यासाठी एखाद्या अधिकारी किंवा नेत्‍याचा आशिर्वाद आहे का ? टक्‍केवारी घेवून कोणी या निकृष्‍ट दर्जाच्‍या कामाला आशिर्वाद देत आहे का ? सदरील काम इस्‍टीमेट प्रमाणे होत आहे किंवा नाही हे पाहण्‍याची जबाबदारी असणारे अभियंते या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत का ? असे अनेक प्रश्‍न यानिमित्‍ताने उपस्थित होत आहेत.

आमदार लक्ष घालणार का ?

घनसावंगी मतदारसंघाच्‍या ज्‍या आमदारांनी या कामाचे 2 वर्षांपूर्वी भुमीपूजन केले होते ते आ.राजेश टोपे या कामाकडे लक्ष देणार आहेत का ? कामाच्‍या गुणवत्‍तेबाबत तडजोड केली जाणार नाही याची खात्री ते देणार आहेत का ? असे अनेक प्रश्‍न सुध्‍दा या निमित्‍ताने उपस्थित केले जात आहेत.

आत्‍ताच लक्ष द्यावे !

श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथे दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात, सदरील परतूर मार्गानेही असंख्‍य भाविक येत असतात, परंतू रस्‍त्‍याचे होत असलेले काम पाहता हा रस्‍ता जास्‍त दिवस टिकेल असे दिसत नाही, त्‍यामुळे भविष्‍यात सुध्‍दा भाविक भक्‍तांना या रस्‍त्‍याने येतांना तारेवरची कसरत करावी लागू शकते. निकृष्‍ट दर्जाचे काम झाल्‍यावर कागदी घोडे नाचवण्‍यापेक्षा काम सुरू असतांनाच संबंधित अधिकारी अथवा अभियंत्‍यांनी या कामाच्‍या दर्जा आणि गुणवत्‍तेकडे लक्ष दिल्‍यास कोट्यावधी रूपये पाण्‍यात जाणार नाहीत. शिवाय भाविक भक्‍तांसह प्रवाशांचाही प्रवास सुखकर होण्‍यास मदत होईल.

तपासणी करू !

याबाबात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.खोसे यांना विचारले असता त्‍यांनी सांगितले की, सदरील रस्‍त्‍याचे काम जर निकृष्‍ट दर्जाचे होत असेल तर तातडीने त्‍या रस्‍त्‍याच्‍या कामाची पाहणी करण्‍यात येईल व पुढील योग्‍य ती कार्यवाही करण्‍यात येईल असे सांगितले.

jfkjfkslkdfsldkj

इतर बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!