एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
शासन कोणतेही असो, सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवित असते. विविध योजनांच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. शासन सदरील योजनांसाठी कोट्यावधी रूपये खर्च करत असते परंतू जर योजनेशी संबंधित लोकंच जर भ्रष्टाचार करून योजनेचा मुडदा पाडत असतील तर योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळणार कसा ? हा खरा प्रश्न आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील समस्त नागरिकांना नळ कनेक्शन द्वारे शुद्ध पाणी पुरवठा व्हावा म्हणून सन 2011 साली 1 कोटी 17 लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली होती. सदरील योजना आज रोजीपर्यंत पूर्ण झाली नाही. अर्थातच योजनेचा अर्धवट अवस्थेत मुडदा पाडण्यात आला व गुत्तेदाराने अनेकांना हाताशी धरून बिले उचलली व गायब झाला.
कुंभार पिंपळगांवातील सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या या योजनेचा मुडदा पाडण्यात आला मात्र दुर्दैव म्हणजे 13 वर्षे उलटूनही या योजनेचे काम पूर्ण का झाले नाही याबाबत ना लोकप्रतिनिधींनी भ्र शब्द काढला ना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यावर काही कारवाई केली. गांव ते जिल्ह्यापर्यंत संबंधित गुत्तेदाराने अनेकांना मॅनेज केल्याचे अर्थातच अनेकांचे खिसे गरम केल्याचे सांगितले जाते.
कायम टंचाईचा सामना !
कुंभार पिंपळगांवात कायम पाणी टंचाई असते, त्यामुळे 2011 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली होती, परंतू सदरील योजना अर्धवट अवस्थेत संपली. त्यामुळे मागील अनेक वर्षात गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. यावर्षी सुध्दा प्रचंड प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली होती. प्रशासन व ग्रामपंचायतने बऱ्याच प्रमाणात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला व दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही छोट्या गल्ल्यांमध्ये राहणाऱ्या असंख्य नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. अनेकांना तर वारंवार विकतचे पाणी घ्यावे लागले. जर कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना असती तर ही समस्या आलीच नसती.
आता नवीन योजना !
कुंभार पिंपळगांवातील नागरिकांसाठी मागील वर्षात जलजीवन मिशन अंतर्गत जवळपास 2 कोटी रूपयांची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली व त्याचे कामही सध्या सुरू आहे. या योजने अंतर्गत गावातील प्रत्येक घरात नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. संबंधित गुत्तेदाराच्या म्हणण्यानुसार गावाबाहेरील जवळपास काम संपतही आले आहे, आता गावातील अंतर्गत पाईपलाईन व नळ कनेक्शनचे काम करायचे आहे. सदरील काम चांगल्या दर्जाचे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर सरपंच (प्र.) यांनीही सदरील नळ योजनेच्या कामावर लक्ष असल्याचे सांगितले.
नागरिकांनो तुमचीही जबाबदारी !
जलजीवन मिशन योजने अंतर्गत कुंभार पिंपळगावातील प्रत्येक घरात नळ कनेक्शनद्वारे पाणी पोहोचवले जाणार आहे. कारण ही योजना काही लाखांची नव्हे तर जवळपास 2 कोटींची आहे. या योजने अंतर्गत प्रत्येकाच्या घरात नळ कनेक्शनद्वारे पाणी देणे बंधनकारक आहे. त्यामुळे जेव्हा तुमच्या गल्लीमध्ये पाईपलाईन टाकली जाईल आणि नळ कनेक्शन दिले जाईल त्यावेळेस न विसरता चांगल्या प्रकारे पाईपलाईन टाकून घेणे व घरात नळ कनेक्शन घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आणि हक्क आहे.
विनाकारण अडवू नका !
कुंभार पिंपळगांवात घरोघरी प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शनद्वारे पाणी देण्याच्या दृष्टीने असलेल्या जलजीवन मिशन योजनेचे काम सध्या सुरू आहे. काम चांगले, दर्जेदार व टिकाऊ होणे आवश्यक आहे यात शंका नाही, त्यासाठी आपल्या सर्वांना लक्ष देवून काम करून घ्यावे लागणार आहे. मात्र विनाकारण कोणीही काम अडवता कामा नये. गल्ल्यांमध्ये पाईपलाईन टाकतांना योग्य तो मार्ग काढून चांगल्या प्रकारे पाईपलाईन टाकून घेणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. घरोघरी नळ कनेक्शनद्वारे पाणी मिळवण्याची ही एकप्रकारे शेवटची संधी समजावी. त्यामुळे एखाद्याने स्वत:चे खिसे गरम करण्यासाठी विनाकारण काम अडवू नये.
एल्गार न्यूजचे प्रयत्न !
कुंभार पिंपळगांवातील कोणतीही गल्ली सुटता कामा नये किंवा गल्लीतील कोणतेही कुटुंब नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठ्यापासून वंचित राहू नये यासाठी “एल्गार न्यूज” प्रयत्न करणार आहे. एवढंच नव्हे तर सदरील जलजीवन मिशन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे तर होत नाही ना ? यावरही लक्ष राहणार आहे. त्यासाठी नागरिकांनीही काही चुकीचे किंवा निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यास एल्गार न्यूजला कळवावे. कारण कुठल्याही परिस्थितीत “एल्गार न्यूज” राष्ट्रीय पेयजल योजनेप्रमाणे या जलजीवन मिशन योजनेचा मुडदा पाडू देणार नाही.
इतर बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर किंवा खाली दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.